दररोज लागतात तेथे वाहनांच्या रांगा
By admin | Published: May 25, 2015 02:13 AM2015-05-25T02:13:44+5:302015-05-25T02:13:44+5:30
मध्य रेल्वेच्या मुंबई-नागपूर या मुख्य लाईनवर असलेल्या शहरात सध्या वाहतुकीचा पचका झाला आहे.
पुलगाव : मध्य रेल्वेच्या मुंबई-नागपूर या मुख्य लाईनवर असलेल्या शहरात सध्या वाहतुकीचा पचका झाला आहे. उखडलेले रस्ते, बंद राहणारे रेल्वे गेट आणि वाढलेली रहदारी यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. रेल्वेगेटची डोकेदुखी तर अतोनात वाढली आहे. दररोज सकाळी या मार्गावर वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. यामुळे वाहतुकीचा पचका होतो आणि प्रवश्यांचीही चांगलीच ताटकळ होते. रेल्वे प्रशासन, बांधकाम विभाग आणि पालिका प्रशासनही याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांच्या समस्यांमध्ये भर पडत असल्याचेच दिसून येत आहे.
शहरातून नागपूर ते औरंगाबाद हा एक्स्प्रेस वे गेला आहे. या पाठोपाठ भोपाळ ते हैद्राबाद हा नजीकचा महामार्गही मंजूर झाला आहे. दोन्ही जलदगती मार्गांमुळे शहरातील रहदारीत अतोनात वाढ झाली आहे. यातील भोपाळ ते हैद्राबाद मार्गावर रेल्वेगेट असल्याने दररोज अवजड वाहनांच्या रांगा लागतात. शहरात स्टेशन चौक व पूढे भाजी मंडईपर्यंत ट्रक उभे असतात. हा प्रकार दररोज सकाळी १०.३० पर्यंत शहरात पाहावयास मिळतो. शहरातच थांबणाऱ्या या वाहनांमुळे अन्य वाहतुकही विस्कळीत होते. शिवाय रेल्वेगेटच्या पलिकडेही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. यामुळे नागरिकांसह प्रवाश्यांना ताटकळावे लागते. कधीकाळी तर रात्री एखादी मालगाडी रेल्वेगेटजवळ बंद पडली तर रात्रभर गेट बंद असते. यामुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्थाच विस्कळीत होते. याबाबत अनेकदा रेल्वे प्रशासनाशी चर्चा करण्यात आली; पण अद्याप तोडगा निघालेला नाही.
शहरात रेल्वे उड्डाण पूल मंजूर करण्यात आला होता; पण नवीन शासन सत्तेवर आल्यानंतर त्या पुलाचे काय झाले, हे कळण्यास वाव नाही. अद्याप कुठलेही काम सुरू न झाल्याने पूल रद्द तर होणार नाही ना, अशी शंका नागरिक उपस्थित करीत आहेत. रेल्वेगेटमुळे शहराचे दोन भाग झाल्याने रेल्वे उड्डाण पूल अत्यंत गरजेचा आहे; पण त्याकडे लोकप्रतिनिधींसह रेल्वे प्रशासनही लक्ष देत नसल्याचेच दिसून येत आहे. सातत्याने बंद राहणाऱ्या रेल्वे फाटकामुळे वाहन धारकांनाही त्रास सहन करावा लागतो. दुचाकी चालक आणि पादचारी गेट बंद असल्यानंतरही ये-जा करतात. यामुळे अपघाताचा धोकाही वाढला आहे. रेल्वे सोयीची असली तरी पूल तितकाच गरजेचा झाला आहे. लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन आणि रेल्वे प्रशासनाने रेल्वे उड्डाण पुलाचा गंभीर प्रश्न मार्गी लावण्याकरिता पुढाकार घ्यावा, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.(प्रतिनिधी)
बांधकाम विभागासह पालिका व रेल्वे प्रशासनाचाही कानाडोळा
शहरातील रेल्वेगेटजवळील रस्त्याचीही अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे त्यात वाहने रूतून बसतात. पावसाळ्यात हा धोका अधिक असतो. यामुळे कित्येक तास वाहतूक विस्कळीत राहते. मागील वर्षीही पावसाळ्यात गेटजवळच टँकर, ट्रक फसला होता. यामुळे तब्बल दहा तास वाहतूक विस्कळीत झाली होती. बांधकाम विभागाच्यावतीने रस्त्याची तात्पूरती डागडुजी करण्यात येते; पण कायम उपाययोजना केली जात नाही. यामुळे तो खड्डा पुन्हा जैसे थे होतो. या रस्त्याखालून मोठी पाईपलाईन गेलेली आहे. बांधकाम विभागाने डांबरीकरण केले आणि पाईपलाईन लिक झाली तरी रस्त्याची वाट लागते. यासाठी दोन्ही विभागांनी चर्चा करून उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे; पण त्याकडे दुर्लक्षच होतान दिसते.
रेल्वे रूळाखालून काढण्यात आलेल्या वळण मार्गावरील रस्त्याचीही अत्यंत दयनिय अवस्था झाली आहे. रस्त्यावर डांबर बेपत्ता झाले असून गिट्टी उघडी पडली आहे. सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने वाहने चालविताना तारेवरची कसरतच करावी लागते. शिवाय परिसरात झुडपेही वाढली आहेत. पालिका, रेल्वे प्रशासन व बांधकाम विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.