सहकारी बँकेत दस्तावेजासाठी आलेले वाहन दुसऱ्यांदाही परतविले
By admin | Published: January 23, 2017 12:41 AM2017-01-23T00:41:53+5:302017-01-23T00:41:53+5:30
सहकारी बँकेने नागरिकांचा विश्वास संपादन करीत कोट्यवधीच्या ठेवी स्वीकारल्या.
विहिंप, बजरंग दलाचे आंदोलन : नागरिकांनीही घेतला सहभाग
गिरड : सहकारी बँकेने नागरिकांचा विश्वास संपादन करीत कोट्यवधीच्या ठेवी स्वीकारल्या. सध्या ती डबघाईस आल्याने येथील शाखेचे ३१ डिंसेबर रोजी समुद्रपूर येथे स्थलानंतर करण्याचा निर्णय बँकेने घेतला. या निर्णयाविरूद्ध विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने आंदोलन पुकारले. यापूर्वी दस्तावेज घेऊन जाण्यास आलेले वाहन परत पाठविले. शुक्रवारी पुन्हा तसा प्रयत्न झाला तर तोही हाणून पाडण्यात आला.
बँक स्थलांतराच्या निर्णयामुळे ठेवीदारांत भीती निर्माण झाली आहे. याविरूद्ध समुद्रपूर तालुका विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने एल्गार पुकारला. जोपर्यंत ठेविदारांना त्याचे पैसे व्याजासह परत केले जात नाही, तोपर्यंत येथील एकही वस्तू वा दस्तावेज बाहेर जाऊ देणार नाही, असे निवेदन देण्यात आले. असे असताना दस्तावेज नेण्याकरिता समुद्रपूर येथून वाहन पाठविणे सुरूच आहे. पहिले वाहन परत पाठविल्यानंतर शनिवारी दुसऱ्यांना वाहन आल्याची माहिती पदाधिकाऱ्यांना मिळाली. यावरून विहिंप प्रमुख मंगेश गिरडे व पदाधिकाऱ्यांनी बँक गाठली. दरम्यान, वाहनामध्ये काही फाईल ठेवण्यात आल्या होत्या. पदाधिकाऱ्यांनी त्या सर्व फाईल पुन्हा बँकेत ठेवून वाहन परत पाठविले.
१२ डिसेंबर रोजी विहिंपच्या कार्यकर्त्यांनी गिरड येथील बँक व्यवस्थापक पांडुरंग फिंरगे यांच्यामार्फत जिला निबंधकांना निवेदन दिले होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही सर्वात जुनी असून या बँकेशी प्रत्यक व्यक्ती जुळला होता. शेतकरी, गरीब व नोकरदाराचे याच बँकेतून व्यवाहर चालत होते. गिरड येथे ३६०० ठेवीदारांचे ३ कोटी २१ लाख रुपये जमा आहेत. ५१९ कर्जदारांवर ४ कोटी ६८ लाख रुपये थकित आहेत. चुकीच्या निर्णयांमुळे बँक डबघाईस आली. काही दिवसांपूर्वी ग्राहकांना थोळे पैसे मिळू लागल्याने ग्राहकांच्या आशा उंचवल्या होत्या; पण इमारतीचे भाडे, विद्युत व दूरध्वनी देयक वाचविण्यासाठी गिरड, नंदोरी, मांडगाव येथील शाखा समुद्रपूर येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे बँक बंद तर होणार नाही ना, अशी भीती ग्राहकांमध्ये निर्माण झाली. यामुळे ग्राहकांनीही आंदोलनात सहभाग घेतला.
ठेवी परत करूनच साहित्य न्या
गिरड : ठेवीदारांचे पैसे परत केले जात नाही, तोपर्यंत येथील बँकेतून कुठलेही साहित्य नेऊ देणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली. शुक्रवारी वाहन क्र. एमएच ०६/८०६२ हे काही फाइल घेऊन जाण्याकरिता आले. शाखा व्यवस्थापकांच्या कपाटातील अर्ज फाईल, सुविधा कर्ज फाईल, वेतन संबधित फाईल, पगार बिल फाईल, हजेरी रजिस्टर फाईल, लेबर फंड फाईल आदी फाईल वाहनात टाकण्यात आल्या होत्या.
माहिती मिळताच गिरडे व पदाधिकाऱ्यांनी वाहन अडविले. याप्रसंगी पी.बी. फिंरगी, एम.डब्ल्यू. मोघे, मुंजेवार यांच्यासमोर सर्व फाइल वाहनातून काढून बँक व्यवस्थापक पांडुरंग फिंरगे यांच्या स्वाधीन करण्यात आल्या. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे निर्भय पांडे, किशोर नौकरकर, गणेश धात्रक, उमेश श्रीरामे, किशोर शेंडे व ग्रामस्थ उपस्थित होते.(वार्ताहर)