खरांगणा ते कोंढाळी मार्गावर चिखलात रूतून बसतात वाहने
By admin | Published: July 16, 2016 02:26 AM2016-07-16T02:26:24+5:302016-07-16T02:26:24+5:30
एकेरी वाहतुकीचा मार्ग असलेल्या खरांगणा ते कोंढाळी या मार्गावर धावणारी अनेक जड वाहने मातीत रूतली आहे.
प्रकार झाला नित्याचाच : सर्वत्र खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळणी, अपघाताच्या घटनांत वाढ
आकोली : एकेरी वाहतुकीचा मार्ग असलेल्या खरांगणा ते कोंढाळी या मार्गावर धावणारी अनेक जड वाहने मातीत रूतली आहे. काही वाहने नादुरूस्त झाल्याने रस्त्याच्या कडेला उभी आहे. या प्रकारामुळे इतर वाहनांना समोरची वाट शोधताना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
खरांगणा येथून कोंढाळीपर्यंत जाण्याकरिता असलेला मार्ग हा एकेरी वाहतुकीचा आहे. हैदराबाद ते भोपाळ जाणारी वाहने या मार्गावरून धावतात. क्षमतेपेक्षा जास्त वजन वाहून नेणाऱ्या वाहनांची या मार्गावर नेहमी गर्दी असते. तसे पाहता हा मार्ग घाटाचा आहे. मार्गाची अवस्थाही दयनीय आहे. तरीदेखील नागपुरातून निघणारी अनेक वाहने याच मार्गाने हैदराबादकडे जाण्याकरिता वर्धा जिल्ह्यात प्रवेशित होतात. हैदराबादकडून भोपाळला जाण्याकरिता आडमार्गाने आलेली वाहने याच मार्गाने राष्ट्रीय महामार्गावर निघण्याचा प्रयत्न करतात. सदर मार्गामुळे अंतर कमी होत असले तरी मनस्ताप वाढत आहे. नुकत्याच झालेल्या पावसाने या मार्गाच्या दुतर्फा चिखल तयार झाला आहे. त्यामुळे दोन वाहने एका मार्गावरून समोरासमोर आल्यास एका वाहनाला रस्त्याखाली उतरावे लागते.
जे वाहन खाली उतरेल ते वाहन मातीत रूतल्याशिवाय राहत नाही. कित्येकदा एकमेकांच्या समोर आलेली वाहने समोर जाण्याच्या नादात मातीत रूतल्याचे पाहावयास मिळते. त्यातील काही ट्रक तांत्रिक बिघाडामुळे बंद पडल्याचे या मार्गावर वारंवार दिसतात. अर्धे वाहने रस्त्यावर तर अर्धे वाहन रस्त्याखाली असाच प्रकार या सर्व ट्रकांचा आहे.
येथून समोर जाताना लहान वाहनांना जपून वाहन काढण्याची वेळ येते. सदर मार्गावर प्रवासी वाहनांची संख्या कमी असताना जड वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या अधिक आहे. पावसानंतर रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यातच जड वाहने या मार्गावर धावत असल्याने रस्ता दिवसेंदिवस खराब होत आहे. जड वाहतूक लक्षात घेता या मार्गावरील खड्डे तातडीने बुजविणे गरजेचे झाले असून तशी मागणी या मार्गावरील प्रवासी वारंवार करीत आहेत. (वार्ताहर)