शासकीय रुग्णालयांमधील व्हेंटिलेटर ठरताहेत शोभेची वस्तू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 05:00 AM2021-04-05T05:00:00+5:302021-04-05T05:00:16+5:30
रविवारी दुपारी ३.२० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड युनिटमध्ये दाखल असलेल्या रुग्णांची माहिती जाणून घेतली असता या ठिकाणी एकूण आठ कोविड बाधित असल्याचे सांगण्यात आले. या आठ रुग्णांपैकी ऑक्सिजन रुग्ण खाटांवर तीन तर साध्या रुग्ण खाटांवर पाच कोविड बाधित होते. तर व्हेंटिलेटर रुग्ण खाटा रिकाम्या असल्याचे सांगण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच उपजिल्हा रुग्णालय आर्वी व हिंगणघाट येथे व्हेंटिलेटर आहे. परंतु, या तिन्ही शासकीय रुग्णालयातील व्हेंटिलेटर सध्याच्या कोरोना संकटाच्या नियोजनशून्य कारभारामुळे या काळात शोभेची वस्तू ठरत आहे. वर्धा शेजारील जिल्ह्यात व्हेंटिलेटर रुग्ण खाटांचा तुटवडा निर्माण झाला असताना या तिन्ही रुग्णालयातील व्हेंटिलेअरवर सध्या एकही रुग्ण नसल्याचे सांगण्यात आले. एकूणच अधिग्रहित केलेल्या कोविड रुग्णालयात व्हेंटिलेटर मिळेना तर गावांत त्यावरील धूळ निघेना असे चित्र बघावयास मिळत आहे.
रविवारी दुपारी ३.२० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड युनिटमध्ये दाखल असलेल्या रुग्णांची माहिती जाणून घेतली असता या ठिकाणी एकूण आठ कोविड बाधित असल्याचे सांगण्यात आले. या आठ रुग्णांपैकी ऑक्सिजन रुग्ण खाटांवर तीन तर साध्या रुग्ण खाटांवर पाच कोविड बाधित होते. तर व्हेंटिलेटर रुग्ण खाटा रिकाम्या असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालयात तब्बल सहा व्हेंटिलेटर आहेत. हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात चार व्हेंटिलेटर असून रविवारी व्हेंटिलेअर रुग्ण खाटा रिकाम्या होत्या. तर आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात एक व्हेंटिलेटर असून ही व्हेंटिलेटर रुग्ण खाट रिकामी होती, असे सांगण्यात आले. विशेष म्हणजे सावंगी (मेघे) येथील कोविड रुग्णालयात तब्बल १९ रुग्ण व्हेंटिलेटर आणि एनआयव्ही मोड ऑफ व्हेंटिलेटरवर तर सेवाग्राम येथील रुग्णालयात सुमारे दहाहून अधिक रुग्ण व्हेंटिलेटर आणि एनआयव्ही मोड ऑफ व्हेंटिलेटरवर असल्याचे सांगण्यात आले.
असे केले जाऊ शकते प्रभावी नियोजन
जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात एक विशिष्ट कक्षाची निर्मिती करून अकराही व्हेंटिलेटर तेथे लावून कोरोनाचा संसर्ग झालेल्या गंभीर रुग्णांना चांगली आरोग्य सेवा दिली जाऊ शकते.
या विशिष्ट कक्षात चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी काही तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा अधिग्रहित करता येऊ शकते.
ही पर्यायी व्यवस्था उभी झाल्यावर अधिग्रहित केलेल्या दोन्ही कोविड रुग्णालयांवरील कामाचा ताण थोड्या प्रमाणात कमी होऊ शकतो. शिवाय शासकीय आरोग्य यंत्रणाही मजबूत होऊ शकते.
वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात सहा, हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात चार तर आर्वी उपजिल्हा रुग्णालयात एक व्हेंटिलेटर आहे. या व्हेंटिलेटरचा वेळप्रसंगी तसेच आवश्यक त्या वेळी वापर केला जातो.
- डॉ. सचिन तडस,
जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा.