हिंगणघाटातील अंकिता जळीतकांड प्रकरणाचा आज निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2022 11:15 AM2022-02-09T11:15:35+5:302022-02-09T11:59:37+5:30
हिंगणघाट येथील जळीत कांड प्रकरणावचा निकाल आज देण्यात येणार आहे. यातील मुख्य आरोपी विकेश नगराळे याला न्यायालय काय शिक्षा देणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
वर्धा : संपूर्ण राज्यभरात खळबळ माजवणाऱ्या हिंगणघाट येथील प्रा. अंकिता पिसुड्डे जळीतकांडाचा आज (दि. ९) निर्णय देण्यात येणार आहे. या घटनेला दोन वर्षे झाली असून अंकिताच्या मृत्यूला १० फेब्रुवारीला दोन वर्षे पूर्ण होतील. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
३ फेब्रुवारी २०२० ला सकाळी ७ च्या सुमारास नंदोरी चौकातून कॉलेजच्या दिशेने जात असलेल्या प्रा. अंकिता पिसुड्डेवर आरोपी आरोपी विकेश नगराळे याने पेट्रोल ओतून जाळले होते. गंभीररित्या जळालेल्या अंकिताला उपचारार्थ नागपुरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान १० फेब्रुवारीला तिने अखेरचा श्वास घेतला. हे प्रकरण संपूर्ण देशभरात गाजले. दोन वर्षे या खटल्याची सुनावणी चालली. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी बाजू मांडली. त्यांना सरकारी वकील दीपक वैद्य यांनी सहकार्य केले.
या प्रकरणाची पहिली सुणावणी ४ मार्च २०२० ला हिंगणघाटच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. त्यानंतर आतापर्यंत हिंगणघाट न्यायालयात ६४ सुनावणी घेण्यात आल्या आहेत. यातील ६४ तारखांपैकी ३४ तारखेवर अॅड. उज्वल निकम सरकारी पक्षातर्फे हजर होते. या प्रकरणात पोलिसांकडे एकूण ७७ साक्षदार होते त्यापैकी २९ साक्षदारांची साक्ष न्यायलयात नोंदविण्यात आली आहे. त्यानंतर, कोरोनाची पहिली लाट आल्याने कामकाज थांबल्यामुळे सुनावणी तब्बल ९ महिने लांबली. आज पीडितेच्या मृत्यू तारखेच्या एक दिवस अगोदर हा निकाल लागणार असल्याने सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे. निकालानंतर कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी न्यायालय परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. तर, तालुक्यातही काल रात्रीपासून पोलीस तैनात करण्यात आले आहेत.