पशुवैद्यकीय दवाखाने दुपार पाळीत बंद
By admin | Published: October 9, 2014 11:07 PM2014-10-09T23:07:12+5:302014-10-09T23:07:12+5:30
पशुव्यवसायाला चालना देण्याकरिता शासन विविध उपक्रम राबविते. शेतकऱ्यांना जोडधंदा उपलब्ध करुन देण्याकरिता योजनांच्या माध्यमातून सहाय्य केले जाते. पशुंना योग्यवेळी उपचार मिळावे
घोराड : पशुव्यवसायाला चालना देण्याकरिता शासन विविध उपक्रम राबविते. शेतकऱ्यांना जोडधंदा उपलब्ध करुन देण्याकरिता योजनांच्या माध्यमातून सहाय्य केले जाते. पशुंना योग्यवेळी उपचार मिळावे म्हणून ग्रामीण भागात पशुवैद्यकीय दवाखाने उभारण्यात आले. मात्र तालुक्यातील दवाखाने दुपार पाळीत बंद राहत असल्याने पशुपालकांना खासगी दवाखान्यात जावे लागते.
जिल्हा परिषद व राज्य सरकार यांच्या माध्यमातून सेलू तालुक्यात पशुवैद्यकीय दवाखाने उभारण्यात आले. मात्र दुपार पाळीत दवाखाने बंद राहत असल्याने गोपालकांना अखेर खासगी डॉक्टरांचा सहारा घ्यावा लागत आहे. कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीने हे दवाखाने ओसाड पडलेल्या स्थितीत आहे. याकडे वरीष्ठांनी लक्ष देण्याची मागणी पशुपालकांनी केली आहे. सेलू येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात कार्यरत अधिकाऱ्यांची लेटलतिफ सर्वश्रुत आहे. मात्र कारवाईअभावी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मात्र फावते. पशुवैद्यकीय दवाखान्याला एकापेक्षा अधिक गावे जोडण्यात आली असून या दवाखाण्याच्या वेळा ठरविल्या आहे. या वेळा सकाळी ७ ते १२ तर सायंकाळी ४ ते ६ अशी आहेत. सकाळ पाळीत सर्वच दवाखाने अर्धा ते एक तास उशिराने उघडतात. बरेचदा दुपारी दवाखाने उघडे नसतात. यामुळे पशुपालकांना जनावरांवर उपचार करण्यासाठी खासगी डॉक्टरांचा आधार घ्यावा लागतो. यामुळे हे रुग्णालय पशुपालकांकरिता नाममात्र ठरत असल्याचे चित्र आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांना पशुंवर उपचार करुन घेण्याकरिता पैसे खर्च करावे लागतात. यामुळे योजनेचा लाभ होत नाही. ग्रामीण भागातील दवाखाने दुपार पाळीतही सुरू ठेवावे अशी मागणी केली आहे. यामुळे गोपालकांची गैरसोय होणार नाही. या मागणीकडे तालुकास्तरीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी आहे.(वार्ताहर)