झेडपी सभागृहात उपाध्यक्षांच्या पतीचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 12:10 AM2019-01-17T00:10:21+5:302019-01-17T00:11:57+5:30

जि.प.च्या सभागृहात बुधवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला जि.प.च्या उपाध्यक्ष कांचन नांदुरकर उशिरा पोहोचल्या. त्यांचे पती बाळा नांदुरकर हे ‘सभा लवकर का आटोपली’ असे म्हणत थेट सभागृहात शिरले.

Vice Chairman's confusion at ZP Hall | झेडपी सभागृहात उपाध्यक्षांच्या पतीचा गोंधळ

झेडपी सभागृहात उपाध्यक्षांच्या पतीचा गोंधळ

Next
ठळक मुद्देअध्यक्षांसह सीईओंचा अपमान : सदस्यत्व रद्द करण्याची सदस्यांकडून मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जि.प.च्या सभागृहात बुधवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला जि.प.च्या उपाध्यक्ष कांचन नांदुरकर उशिरा पोहोचल्या. त्यांचे पती बाळा नांदुरकर हे ‘सभा लवकर का आटोपली’ असे म्हणत थेट सभागृहात शिरले. ते इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी व्यासपीठाकडे जात अध्यक्ष व मुख्य कार्यपालन अधिकारी यांना उद्देशून आक्षेपार्ह शब्दाचा वापर केल्याने सभागृहात एकच खळबळ उडाली होती. हा प्रकार पाहून साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
ग्रामीण भागातील समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने काही प्रश्न मार्गी लावण्यासाठी बुधवारी जि.प. सभागृहात दुपारी १२ वाजता विशेष सभा आयोजित केली होती. याबाबत सर्व सदस्यांना नोटीस देण्यात आले. त्यानुसार जि.प. सदस्य व पदाधिकारी सभागृहात उपस्थित झाले. दुपारी १२.३० वाजता सर्व सदस्यांच्या उपस्थितीत सभेला सुरुवात झाली. या सभेला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन मडावी, महिला व बालकल्याण समिती सभापती सोनाली कलोडे, शिक्षण व आरोग्य समिती सभापती जयश्री गफाट, समाजकल्याण समिती सभापती निता गजाम, मुख्य कार्यपालन अधिकारी अजय गुल्हाणे, उपमुख्य कार्यपालन अधिकारी विवेक इलमे, विपूल जाधव, लेखाधिकारी शेळके यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. या सभेत ९ विषयावर चर्चा करण्यात आली. तसेच वेळेवर आलेल्या एका मुद्द्यावरही चर्चा झाली. सभा शेवटच्या टप्प्यात असताना जि.प. उपाध्यक्ष कांचन नांदुरकर सभागृहात आल्या. त्यांनी व्यासपीठावरील आपले स्थानही ग्रहण केले. सर्व विषयावर चर्चा झाल्याने सभा आटोपून याच सभागृहात निवडणूक विभागाव्दारे ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्यक्षिक दाखविणे सुरु होते. यादरम्यान उपाध्यक्षांचे पती तथा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळा नांदुरकर यांनी सभागृहात येऊन सर्व सदस्य व अधिकाऱ्यांसमक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. सभागृहात सदस्यांच्या पतीचा हा गोंधळ पाहून सारेच अचंबित झाले. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य विजय आगलावे यांनी पुढे येत बाळा नांदुरकर यांना सभागृहाबाहेर नेले. हा सारा प्रकार निंदणीय असल्याचे मत सदस्य व अधिकाºयांनी व्यक्त केले असून या कृतीचा निषेधही नोंदविण्यात आला.

मिनीमंत्रालयात चालले तरी काय?
मिनीमंत्रालयामध्ये भारतीय जनता पार्टीची एकहाती सत्ता आहे; पण, मागील दीड ते दोन वर्षाच्या कालावधीत विरोधकांपेक्षा भाजपाचे पदाधिकारीच आपसात भिडत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषदेत महिला सदस्यांची सख्या जास्त असल्याने सत्ताधाऱ्यांचा ‘पतीराज’ फोफावत आहे. नुकताच काही दिवसांपूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विषयाबाबत सविस्तर माहिती दिल्यानंतरही भाजपाच्याच जि.प.सदस्यांनी नागरिकांसह सभागृहात ठिय्या मांडला होता. आताही भाजपाच्याच पदाधिकाºयांने सभागृहात शिरुन अध्यक्ष आणि मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांवर आरोप केलेत. त्यामुळे भाजपाचेच पदाधिकारी आता जिल्हा परिषद अध्यक्षांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

भाजपाच्या पदाधिकाºयांचा वाढतोय हस्तक्षेप
जिल्हा परिषदच्या सभागृहात तर सोडा, जिल्हा परिषदमध्येही कधी पक्षाचे पदाधिकारी पाऊल टाकत नव्हते. पण, जेव्हापासून भारतीय जनता पार्टीची सत्ता जिल्हा परिषदेत आली तेव्हापासून पक्षाच्या जिल्हाध्यक्षासह पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. इतकेच नाही तर पक्षाचे अध्यक्ष जिल्हा परिषदेत येऊन पक्षाच्या सदस्यांची सभा घेतात. सोबतच सभागृृहात येऊनही मार्गदर्शन करतात. ही नवी प्रथा रुढ झाल्याने आता त्यांचा कित्ता उपाध्यक्षही गिरवत आहे. पदाधिकाºयांच्या या लुडबुडीमुळे सभागृहाची गरीमा मलीन होत असल्याचेही विरोधकांचे म्हणणे आहे.

नांदुरकर यांना बजावली नोटीस
भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळा नांदुरकर यांनी जिल्हा परिषदेच्या सभागृहात जाऊन जि.प. अध्यक्षासोबत उद्धट शब्दात बोलून अपमानित केल्याने भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांनी नांदुरकरांना नोटीस बजावली. हे वर्तन पार्टीची शिस्तभंग करणारे आहे. त्यामुळे येत्या सात दिवसात खुलासा सादर करावा अन्यथा शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल, असे नोटीसमध्ये नमुद केले आहे.

विशेष सभेतील सर्व विषय झाल्यानंतर सभा संपविण्यात आली. त्यानंतर सभागृहात निवडणूक विभागाकडून व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्यक्षिक सुरु असताना; उपाध्यक्षांचे पती बाळा नांदुरकर यांनी सभागृहात येऊन ‘सभा लवकर का आटोपली’ असा आरोप करीत मला आणि मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांशी वाद घालायला सुरुवात केली. हा प्रकार निंदनिय असून त्यांनी चर्चा करायला पाहिजे होती. या संदर्भात सर्व सदस्यांसमोर त्यांनी माफी मागावी, असा ठराव घेण्यात आला आहे.
- नितीन मडावी, जि.प.अध्यक्ष, वर्धा.

अध्यक्षांचा फोन आला तेव्हा मी भूमिपूजनाचा कार्यक्रम आटोपून येणार असल्याचे त्यांना सांगितले होते. चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीवर गदा आणण्याचे काम मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी केले आहे. हा प्रश्न उपाध्यक्ष उपस्थित करणार असल्याचेही त्यांना कळविले होते. पण, उपाध्यक्ष सभागृहात पोहोचताच त्यांनी सभा गुंडाळल्याने मी सभा संपल्यावर सभागृहात जाऊन विचारणा केली. मी कुणालाही शिविगाळ केली नाही.
- बाळा नांदुरकर, जिल्हा उपाध्यक्ष, भाजपा, वर्धा.

काही दिवसांपूर्वी भाजपाच्या जिल्हाध्यक्षांनीच सभागृहात येत भाषण केल्याने इतर पदाधिकाऱ्यांची हिंम्मत वाढली आहे. आज सभागृहात घडलेला प्रकार हा अशोभनिय असून उपाध्यक्षांचे पती बाळा नांदुरकर यांनी अध्यक्ष व मुख्य कार्यपालन अधिकाºयांना शिवीगाळ केल्याने सभागृहाची गरीमा मलिन झाली आहे.
- संजय शिंदे, जि.प. सदस्य तथा गटनेता काँग्रेस.

लोकशाहीला मारक असा प्रकार आज सभागृहात अनुभवायला आला. जि.प. सदस्यांचे पती जर प्रशासकीय कामात हस्तक्षेप करीत असेल तर त्यांचे सदस्यत्व रद्द करावे, असा शासनाचा आदेश आहे. त्यामुळे उपाध्यक्ष कांचन नांदुरकर यांचेही सदस्यत्व रद्द करायला हवे. पण त्यांचे सदस्यत्व रद्द करणार की पक्षाचे सदस्य म्हणून पाठीशी घालणार, याकडे सर्व सदस्यांचे लक्ष लागले आहे.
- धनराज तेलंग, जि.प. सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस.

Web Title: Vice Chairman's confusion at ZP Hall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.