विदर्भात गुलाबी बोंडअळी नियंत्रणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 11:12 AM2018-09-11T11:12:33+5:302018-09-11T11:15:38+5:30
विदर्भाच्या वर्धा, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यांमध्ये कपाशी पिकावर झालेला गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव सध्या नियंत्रणात आला आहे असे केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यास दौऱ्यात आढळून आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : विदर्भाच्या वर्धा, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यांमध्ये कपाशी पिकावर झालेला गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव सध्या नियंत्रणात आला आहे असे केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यास दौऱ्यात आढळून आले आहे. काही ठिकाणी बोंड सडण्याचा प्रकार दिसला. सडलेल्या बोंडांचे नमूने प्रयोगशाळेत तपासण्यात आले. संधीसाधू जिवाणू व काही प्रमाणात बोंडावर वाढलेल्या मृतजिवी बुरशीमुळे हा प्रादुर्भाव उद्भवल्याचे वनस्पतीरोग शास्त्रज्ञांनी लोकमतशी बोलताना सांगितले. कापूस पिकाला फुले व बोंडे लागण्याच्या अवस्थेत कपाशीवर बोंड सडणे ही नवीन समस्या निर्माण झाली. या विषयी शेतकरी चिंतेत असल्याचे अभ्यास दौऱ्यात निदर्शनास आले.
यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर जिल्ह्यात आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात संतधार पाऊस झाला. ढगाळ वातावरणामुळे बोंडे लागण्याच्या अवस्थेत कपाशीमधील सुखलेल्या गुलाबी रंगाच्या पाकळ्या गळून पडल्या. पावसाचे पाणी शिरून त्यात ओलावा निर्माण झाला. त्यामुळे कपाशीवर विषाणूजन्य रोगाची लागण झाली, अशी माहिती या चमूने दिली.
सततचे ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस दीर्घकाळ राहिल्यास खबरदारीचा उपाय म्हणून कॉपर आॅक्सिक्लोराइड २५ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोसायक्लीन २.५ ग्रॅम याचे मिश्रण प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून पात्या, फुले आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत फवारणी करावी, गरजेनुसार दुसरी फवारणी पंधरा दिवसाच्या अंतराने करावी.
- व्ही.एन. वाघमारे, संचालक केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर.