मुख्यमंत्र्यांकडून विदर्भाची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 10:24 PM2017-12-05T22:24:37+5:302017-12-05T22:25:02+5:30
विदर्भाचे सुपूत्र असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भातील जनतेसह महाराष्ट्राच्या जनतेची प्रचंड मोठी फसवणूक केली आहे.
आॅनलाईन लोकमत
वर्धा : विदर्भाचे सुपूत्र असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भातील जनतेसह महाराष्ट्राच्या जनतेची प्रचंड मोठी फसवणूक केली आहे. सर्वसामान्य माणसाला दिलेली आश्वासने सरकारने पूर्ण केलेली नाही. राज्यातील जनता पारदर्शकतेसाठी वेडी झाली आहे. ११ मंत्र्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे पुरावे दिलेत. परंतु मुख्यमंत्री क्लिनचिट देण्याचे काम करीत आहे, असा आरोप राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी वर्धा येथील जाहीर सभेत केला.
या सभेला माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार, प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार जयंत पाटील, आमदार राजेश टोपे, आमदार विद्या चव्हाण, आमदार ख्वाजा बेग, आमदार गुलाबराव देवकर, माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह चित्रा वाघ, सुरेश देशमुख, राजू तिमांडे, संदीप बाजोरिया, गणेश दुधगावकर, सुभाष कोरपे, वसुधा देशमुख, अॅड. सुधीर कोठारी आदी उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना आमदार जयंत पाटील म्हणाले की, राज्यातील जनतेने परिवर्तन म्हणून भाजप सरकारला निवडून दिले. आम्ही सुरुवातीला सरकारचे कामकाज पाहत होतो. परंतु, जनहिताचा एकही निर्णय होत नसल्याचे दिसून आल्यावर या सरकारच्या विरोधात आवाज उठविला, तरीही सरकारने शेतकºयांना कर्जमाफी दिली नाही. शेतकºयाला संप करावा लागला. जी गोष्ट मुख्यमंत्र्यांच्या मनात नव्हती ती करावी लागली. त्यामुळे कर्जमाफीसाठी विविध अटी टाकण्यात आल्या. अद्यापही शेतकºयाच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही. दर आठवड्याला केवळ नवी घोषणा करण्याचे काम या सरकारचे सुरू आहे, असे ते म्हणाले. हीच परिस्थिती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे. खोटे बोलून सत्तेवर आलेल्या या सरकारने जनतेचा भ्रमनिराश केला असल्याचे ते म्हणाले.
धनंजय मुंडे यांनी विविध दाखले देवून राज्य व केंद्र सरकारवर आपल्या भाषणात जोरदार टिका केली. देशातील जनता उपाशी असताना या देशाचा पंतप्रधान शौचालय बांधण्याच्या गोष्टी करतात. यासारखे दुर्दैव नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आम्ही मात्र विरोधी पक्षात असूनही जनतेच्या प्रश्नांशी प्रामाणिक राहणार आहोत, असे ते म्हणाले.
आमदार अजीत पवार यांनी मार्गदर्शन करताना राज्यात ६५ हजार कुपोषित बालकांचा मृत्यू झाला. महिला व मुलींवर अत्याचार वाढत आहे. आघाडी सरकारच्या काळात ओबीसी, मागासवर्गीयांसाठी ५०० कोटी रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येत होती. या सरकारने ती ५० कोटीवर आणली. राज्यातील पोलीस सर्वसामान्यांना अटक करून त्यांना जाळून टाकण्यापर्यंत काम करीत आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्याचे गृहखात्याकडे लक्ष नाही. त्यामुळे पोलिसांवर वचक राहिलेला नाही. हे सरकार जोपर्यंत कापूस उत्पादक शेतकºयांना एकरी २५ हजार रुपये आर्थिक मदत देणार नाही. तोपर्यंत आम्ही सभागृह चालू देणार नाही, असे सांगितले. शेतकºयाला सरसकट कर्जमाफी मिळाली पाहिजे. यासाठी शेवटपर्यंत आम्ही आग्रही राहणार आहे, असे ते म्हणाले. सभेचे प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष सुनील राऊत यांनी केले.
हल्लाबोल पदयात्रा देवळीच्या मार्केट यार्डात
आॅनलाईन लोकमत
देवळी : राष्ट्रवादीच्या हल्लाबोल रॅलीने परतीच्या प्रवासात देवळीच्या कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्डला भेट देऊन त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या शेतकºयांच्या व्यथा जाणून घेतल्या. बोंड अळीच्या प्रकोपामुळे संपूर्ण आर्थिक घडी विस्कटली आहे, अशा प्रकारच्या भावना उपस्थितांनी राष्ट्रवादीचे नेते अजीत पवार यांच्या समक्ष व्यक्त केले.
कापसाला ६ हजारांपर्यंत भाव देण्यात यावा. बोंडअळीला कारणीभूत असलेल्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, आदी मागण्या याप्रसंगी करण्यात आल्या. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोहर खडसे, उपसभापती संजय कामनापुरे व संचालकांनी हल्लाबोल रॅलीचे स्वागत केले. तत्पूर्वी देवळीच्या अनेक संघटना व संस्थांच्यावतीने हल्लाबोल रॅलीचे स्वागत करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात हाजी अब्दुल हमीद व मित्रमंडळींच्यावतीने रॅलीचे स्वागत केले आहे. तालुका खरेदी विक्री संघाच्यावतीने अध्यक्ष अमोल कसनारे व संचालकांनी रॅलीचे स्वागत केले. सविताराणी नारायणदास जावंधिया महाविद्यालयाच्यावतीने प्राचार्य सुरेश उपाध्याय व प्राध्यापकांनी रॅलीचे स्वागत केले. शिवाय बसस्थानक चौकात तसेच रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेल्या लोकांनी रॅलीचे स्वागत केले.