विदर्भात कडधान्याचे उत्पादन २५ टक्क्यांखालीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 04:03 PM2019-09-25T16:03:50+5:302019-09-25T16:08:31+5:30
पावसाची मोठी ओढ व नंतर सततचा पाऊस, ढगाळी वातावरण व मजुरांचा अभाव यामुळे विदर्भात मूग, मटकी (मोट) या पिकांचे २५ टक्केही उत्पादन झाले नाही तर आता तुरीच्या पिकातही मोठी घट होण्याची शक्यता दिसत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत आहे.
फनिंद्र रघाटाटे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सुरुवातीला पावसाची मोठी ओढ व नंतर सततचा पाऊस, ढगाळी वातावरण व मजुरांचा अभाव यामुळे विदर्भात मूग, मटकी (मोट) या पिकांचे २५ टक्केही उत्पादन झाले नाही तर आता तुरीच्या पिकातही मोठी घट होण्याची शक्यता दिसत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत आहे.
मृग नक्षत्राच्या उत्तरार्धात थोडासा पाऊस आला. पुढे पाऊस येईल या अपेक्षेने विदर्भातील अनेक शेतकऱ्यांनी कापूस, तूर, सोयाबीनसह मूग व मटकीची पेरणी केली. मात्र, नंतर २५ जुलैपर्यंत पाऊस तर आलाच नाही; पण चक्क उन्हाळा तापला. परिणामी, अल्प ओलाव्याने अंकुरलेले रोपटे करपले. त्यातही काही रोपटी जगली. नंतर आलेल्या पावसाने पिके जोमात बहरली असली तरी मूग, मटकी व तुरीचे पीक खूप विरळ झाले. नंतरच्या काळात विदर्भात कधी मुसळधार तर कधी पावसाची रिपरिप व पाऊस नसेल तेव्हा ढगाळ वातावरण यामुळे मूग, मटकी व तुरीचे पीक बाळसे धरूच शकले नाही. अल्पावधीतील मूग, मटकी या पिकांना माफक शेंगा भराचा व पक्वही झाल्या; पण सततच्या पावसाने जमीन ओली राहिल्याने मटकीच्या पिकाची कापणी करणे शेतकऱ्यांना कठीण झाले. तर मुगाच्या शेंगा तोडणीसही मजुरांच्या अभावामुळे व वाढत्या मजुरीमुळे शेंगा झाडावरच फुटल्या. परिणामी, मूग, मटकी पिकाच्या उताऱ्यात घट आली तर दीर्घ पीक असलेल्या तुरीची अवस्था तशीच आहे. आधीच विरळ पडलेले तुरीचे पीक सततच्या पावसाने सखल भागात कारपले तर उंच भागातील झाडांची अपेक्षित वाढ झाली नाही तर झाडे खोडही बनले नाही. तसेच शाखाही केल्या नाही. आता ऑक्टोबर महिन्यात शेवऱ्यावर येणाऱ्या तुरीच्या झाडांना किती शेवरा येईल, हे संशयास्पद असल्याने तुरीच्या पिकात मोठी घट येण्याची शक्यता निर्माण झाली.
पाऊस पुढेही येतच राहणार, असा हवामान खात्याचा अंदाज असल्याने निंदण व डवरणीची कामे, प्रभावित झाली असून सोयाबीन पिकाची कापणी कशी करावी, हा प्रश्नही शेतकऱ्यांना भेडसावण्याची शक्यता आहे. तर कपाशीची झाडे अजूनही रिकामी आहेत. ओल्या दुष्काळाची शक्यता आता पक्की होत आहे.