VIDEO- प्रशासनाचे काम अन् बारा महिने थांब
By Admin | Published: May 16, 2017 09:01 PM2017-05-16T21:01:07+5:302017-05-16T21:01:07+5:30
ऑनलाइन लोकमत वर्धा, दि. 16 - शहरातील नागरिकांच्या समस्या तात्काळ निकाली काढण्यात याव्या या मागणीचे निवेदन स्थानिक नगर पालिका ...
ऑनलाइन लोकमत
वर्धा, दि. 16 - शहरातील नागरिकांच्या समस्या तात्काळ निकाली काढण्यात याव्या या मागणीचे निवेदन स्थानिक नगर पालिका प्रशासनासह जिल्हाधिकाऱ्यांना वेळोवेळी देण्यात आले. परंतु, सदर निवेदनाला केराची टापलीच दाखविण्यात अधिकाऱ्यांनी धन्यता मानल्याचा आरोप करीत प्रशासनाच्या दुर्लक्षी कारभाराच्या निषेधार्थ व शहरातील नागरिकांच्या समस्या निकाली काढण्यात याव्या या मागणीसाठी युवा परिवर्तन की आवाज या सामाजिक संघटनेच्या नेतृत्त्वात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाचे काम अन् बारा महिने थांब असे नाव दिले होते.
आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. आंदोलनकत्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी लोणकर यांनी स्विकारले. विविध शासकीय कार्यालयात नागरिकांना साध्या-साध्या कामासाठी अनेक वेळा चकरा माराव्या लागतात. साधी शिधा पत्रिका प्राप्त करण्यासाठी अनेक दिवसांचा कालावधी लागत आहे. सर्वसामान्यांच्या कामांना होणारा विलंब ही बाब नित्याचीच झाली आहे. प्रशासकीय कर्मचारी कार्यालयीन वेळेत कामचुकारीपणाच करीत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
नागरिकांची समस्या लक्षात घेता नागरिकांची विविध कामे ठरलेल्या वेळेत पूर्ण करावी, वर्धा शहरात ठिकठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी, कारला चौक ते आर्वी नाका या मार्गाचे बांधकाम तात्काळ करण्यात यावे, अतिक्रमण करून राहत असलेल्या नागरिकांना त्वरीत घरपट्टे देण्यात यावे, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी आदी मागण्याही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. या आंदोलनाचे नेतृत्त्व निहाल पांडे यांनी केले. आंदोलनात जयंती मिश्रा, अनुराधा वडाळकर, अंकिता थुल, समिक्षा सुरभी चनाप, स्नेहा चनाप, प्रिती घंगाळ, नयना गुंडनवार, सोनाली डायरकर, शिवानी बोरकर, पलाश उमाटे, राहुल मिश्रा, गौरव वानखेडे, अभिषेक बाळबुधे, अरहान शेख, सुरज गायकवाड, ऋषिकेश बुटले आदी सहभागी झाले होते.
अनोख्या स्टाईलने नोंदविला निषेध
युवा परिवर्तन की आवाजच्या नेतृत्त्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्या तरुण-तरुणींनी शासकीय कार्यालयात सर्वसामान्यांना कसा त्रास होतो. सर्वसामान्यांच्या समस्या निकाली काढणारे कर्मचारी नागरिकांसोबत कसे वागतात. तसेच कार्यालयातील इतर अधिकारी त्याकडे कसे डोळेझाक करतात याची हुबेहू झाकी तयार केली होती. या झाकीच्या माध्यमातून तसेच जोरदार नारोबाजी करून आंदोलनकर्त्यांनी प्रशासनातील कर्मचाऱ्यांच्या जनसामान्यविरोधी धोरणांचा निषेध नोंदविला. झाकीत शासकीय कार्यालयातील साहेबाची भुमिका सोहम बिरंगे, प्रशासनाच्या पीडिताची भुमिका मयुर तिवारी तर डोळे बंद करून, तोंड बंद करून व कान बंद करून गांधीजींच्या तीन बंदराची भूमिका जयंती मिश्रा, तेजस्वीनी मोहोड, समिक्षा संगितवार यांनी निभविली.