नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
By Admin | Published: July 28, 2016 12:26 AM2016-07-28T00:26:47+5:302016-07-28T00:26:47+5:30
उन्ह पावसाचा खेळ रंगत असतानाच मंगळवारपासून जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले.
दोन प्रकल्प फुल्ल : निम्न वर्धाची संपूर्ण दारे उघडली
वर्धा : उन्ह पावसाचा खेळ रंगत असतानाच मंगळवारपासून जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले. आष्टी, आर्वी व कारंजा तालुक्यात गत दोन दिवसांपासून मुसळधार पावसाचे आगमन होत असल्याने दोन प्रकल्प फुल्ल झाले आहेत. निम्न वर्धा प्रकल्पातून पाणी सोडण्यात येत असून अप्पर वर्धा धरणाची दारेही बुधवारी रात्री उघडण्यात आली. यामुळे नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्याच्या सिमेवर असलेला अप्पर वर्धा प्रकल्पाने पातळी गाठली आहे. शिवाय आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्प फुल्ल झाला आहे. परिणामी, या प्रकल्पाची संपूर्ण ३१ दारे २५ सेंटीमीटरने उघडण्यात आली आहेत. या प्रकल्पातून ५७३ क्युमेक्स विसर्ग सुरू आहे. कारंजा (घा.) तालुक्यातील कार नदी प्रकल्पानेही पातळी गाठली असून सांडव्यावरून ११२.६७ क्युमेक्स विसर्ग सुरू आहे. अप्पर वर्धा प्रकल्पाची क्षमता ३४२.५० मीटर असून ३४०.९२ मिटर जलसाठा झाला आहे. पातळी गाठायला केवळ २ मीटर शिल्लक असल्याने बुधवारी रात्री प्रकल्पाची दारे उघडली जातील, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यातील लहान-मोठ्या १५ प्रकल्पांनीही पातळी गाठली आहे. सर्व प्रकल्पांची पातळी गाठायला एक-दोन मिटरच शिल्लक आहे. २४ तासांत जिल्ह्यात आणखी पाऊस झाल्यास सर्वच जलाशये ओसंडून वाहू लागतील. यामुळे नदी, नाल्यांना पूर येण्याची शक्यता असल्याने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. निम्न वर्धा प्रकल्पाच्या सर्व गेटमधून पाणी सोडण्यात येत असून रात्री अप्पर वर्धा प्रकल्पातूनही पाणी सोडले जाणार असल्याने आर्वी, देवळी तालुक्यातील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.(कार्यालय प्रतिनिधी)