‘थैलीवाल्या’ दारूविक्रेत्यांचा वायफड मार्गावर धुमाकूळ
By Admin | Published: April 8, 2015 01:51 AM2015-04-08T01:51:56+5:302015-04-08T01:51:56+5:30
शहरापासून आठ किमी अंतरावर असलेल्या वायफड मार्गावर सध्या ‘थैलीवाल्या’ दारूविक्रेत्यांनी उच्छाद मांडला आहे़
वर्धा : शहरापासून आठ किमी अंतरावर असलेल्या वायफड मार्गावर सध्या ‘थैलीवाल्या’ दारूविक्रेत्यांनी उच्छाद मांडला आहे़ बस थांब्यावरच दारूची विक्री केली जात असल्याने प्रवाशांसह महिला, विद्यार्थिनींना त्रास सहन करावा लागत आहे़ पोलीस यंत्रणेने याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़
तिगाव येथे गावठी दारूची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. गावासह बस थांब्यावर दारूविक्रेते पिशवीमध्ये दारूच्या बाटल्या भरून प्रवाश्यांना विकतात. प्रवासी असल्याचे भासवून दारूविक्रेते हातात पिशवी घेऊन बस थांब्यावर उभे राहतात. थांबलेल्या वाहनातून प्रवासी खाली उतरले की, हे विक्रेते त्या प्रवाश्यांना दारूची शिशी काढून देतात़ ‘थैलेवाला’ दारूविक्रेता हा प्रकार या परिसरात नव्यानेच उदयास आला आहे़ यामुळे तिगाव येथील बस थांब्यावर असलेल्या विद्यार्थ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावात अनेक दारूविक्रेते धुमाकूळ घालून नागरिकांना त्रास देत आहेत. विद्यार्थी, विद्यार्थिनी बसने शाळा, महाविद्यालयात ये-जा करतात. या बस थांब्यांवरच खुलेआम दारूविक्री होत असून सट्टा व जुगारही चालतो. यामुळे सध्या बसस्थानक दारू, सट्टा व जुगाऱ्यांचा अड्डा बनले आहे. यात विद्यार्थ्यांचा बळी जात आहे. आई-वडिलांनी खाऊसाठी दिलेले पैसे विद्यार्थी सट्टा व जुगारात घालवत असल्याच्या तक्रारी आहेत़ अनेक विद्यार्थी मद्यधुंद अवस्थेत शाळा बस थांब्यावरच भरवित असल्याचे दिसते़ आठ-दहा गावांतील मद्यपी तिगाव येथे दारू पिण्याकरिता येतात. दिवसभर सट्टा व जुगार खेळत असून मद्याच्या नशेत गावातच मुक्काम ठोकतात. आपल्या घराच्या बाजूला मद्यधुंद अवस्थेत पडून असलेल्या व्यक्तीचे काही बरेवाईट तर होणार नाही ना, या भीतीने त्या घरचे लोक रात्रभर जागे असतात़ तिगाव या गावात दारूविक्री, सट्टा व जुगार खुलेआम सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे़ शिवाय सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तिगाव येथील सावित्रीबाई दारूबंदी महिला मंडळ व ग्राम सुरक्षा दलाच्या युवकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे़
पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देत दारूविक्रेत्यांवर कारवाई करावी व जुगार बंद करावा, अशी मागणी सावित्रीबाई दारूबंदी महिला मंडळ, ग्राम सुरक्षा दल व ग्रामस्थांनी केली आहे़(कार्यालय प्रतिनिधी)