अंकिताला जाळणाऱ्या विकेशची नागपूरच्या कारागृहात तगड्या बंदोबस्तात रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2022 07:10 AM2022-02-12T07:10:00+5:302022-02-12T07:10:02+5:30
Nagpur News बहुचर्चित हिंगणघाट जळीत प्रकरणातील दोषी विकेश ऊर्फ विक्की नगराळे याला चार वाहनांच्या ताफ्याने तगड्या बंदोबस्तात नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पोहोचविण्यात आले.
महेश सायखेडे
वर्धा : बहुचर्चित हिंगणघाट जळीत प्रकरणातील दोषी विकेश ऊर्फ विक्की नगराळे याला गुरुवारी दुपारी ४.३० वाजता न्यायाधीशांनी निकाल जाहीर केल्यानंतर चार वाहनांच्या ताफ्याने तगड्या बंदोबस्तात नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पोहोचविण्यात आले.
हिंगणघाट येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. बी. भागवत यांनी आजन्म सश्रम कारावास तसेच पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिन्यांच्या अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली. नराधम विकेश नगराळे याने ३ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी हिंगणघाट येथील नंदोरी चौकात प्रा. अंकिता पिसुड्डे हिच्यावर पेट्रोल टाकून तिला आगीच्या हवाली केले. या घटनेत ८५ टक्के भाजलेल्या अंकिताचा १० फेब्रुवारी २०२० रोजी नागपूर येथील रुग्णालयात मृत्यू झाला. आरोपीने क्रूरतेचा कळस गाठल्याने हे प्रकरण बहुचर्चित ठरले. अवघ्या १९ दिवसात प्रकरणाचा तपास पूर्ण करून पुलगाव येथील तत्कालीन महिला उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांनी प्रकरण न्यायप्रविष्ट केले. १० फेब्रुवारी २०२२ म्हणजे अंकिताच्या द्वितीय स्मृतिदिनी या खटल्याचा निकाल हिंगणघाटच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिला. गुरुवारी दुपारी ४.३० वाजता न्यायाधीशांनी त्यांच्या निकालपत्रावर स्वाक्षरी केली. कारागृहात रवानगीबाबतचे वॉरंट तामील झाल्यावर विकेशला तडकाफडकी नागपूर येथील कारागृहात पोहोचविण्यात आले.
कठोर मनाने ऐकला आरोपीने निकाल
निकाल जाहीर होणार असल्याने विकेश नगराळे याला गुरुवारी हिंगणघाट येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात आणण्यात आले होते. न्यायाधीशांचा निकाल विकेश याने जराही विचलित न होता कठोर मनाने ऐकला होता.
हिंगणघाट तालुक्यावर पोलिसांचा ‘वॉच’
हिंगणघाट जळीत प्रकरणाचा निकाल गुरुवारी जाहीर झाला असला तरी खबरदारीचा उपाय म्हणून हिंगणघाट तालुक्यातील हिंगणघाट, वडनेर आणि अल्लीपूर पोलीस सध्या ‘हाय अलर्ट’वर आहेत. विकेश नगराळे व अंकिता पिसुड्डे या दोघांचेही मूळ गाव असलेल्या हिंगणघाट तालुक्यातील दारोडा या गावासह तालुक्यातील प्रत्येक गावावर पोलिसांचा गोपनीय पद्धतीने ‘वॉच’ असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.
गुरुवारी हिंगणघाट जळीत प्रकरणाचा निकाल आला. असे असले तरी गुरुवारी हिंगणघाट तालुक्यातील परिस्थिती सामान्य राहिली. आजही परिस्थिती सामान्यच आहे. परंतु, हिंगणघाट तालुक्यातील प्रत्येक गावावर आमचे बारकाईने लक्ष आहे.
- दिनेश कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगणघाट.