चारा-पाण्यासाठी सोडले गाव; सहा महिने वनवास, आर्वी तालुक्यातील गोपालकांची व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 04:05 PM2023-03-29T16:05:21+5:302023-03-29T16:06:18+5:30
पावसाळा सुरू झाल्यावरच धरतात घराची वाट
वर्धा : आर्वी तालुक्यामध्ये गवळी समाज मोठ्या प्रमाणात असून पशुपालकांची संख्या बरीच आहे. त्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागताच जनावरांच्या चारा-पाण्याकरिता मोठी कसरत करावी लागते. यासाठी दुसरी कोणतीही व्यवस्था नसल्याने दरवर्षी गोपालकांना जनावरांकरिता सहा महिन्यांसाठी गावच नाही तर जिल्हा सोडून जावे लागते. स्वातंत्र्याच्या अमृत काळातही स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्त्वाचे योगदान असलेल्या परिसराची ही परिस्थिती विचार करायला भाग पाडणारी आहे.
आर्वी तालुक्यातील बोथली (किन्हाळा), चांदणी, दाणापूर, वाढोणा, गुमगाव, दहेगाव, चोपण, तळेगाव (रघुजी), माळेगाव (ठेका), ब्राह्मणवाडा यासह इतरही गावातील पशुपालक फेब्रुवारी ते जुलै महिन्यापर्यंत जनावरांच्या चारा-पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून आपल्या मुलाबाळांसह स्थलांतरण करतात. जनावरे जगली तरच आपला व्यवसाय चालेल, व्यवसाय चालला तर घराचा उदरनिर्वाह चालणार, यामुळेच आपल्या पोटच्या मुलाबाळांसह गोपालक गाव सोडून दुसऱ्या जिल्ह्यात जातात. त्यासाठी मुला-बाळांचे शिक्षण, गावात मिळणाऱ्या सुखसोयीचाही त्याग करावा लागतो. दुसऱ्या गावात ना विद्युत पुरवठा, ना इतर सुविधा असलेल्या जंगल परिसरात दिवस काढावे लागतात. तेथे गेल्यानंतर पुन्हा दूध दुपत्यासाठी नवीन ग्राहक शोधावे लागतात. बऱ्याचदा पाण्याअभावी जनावरांचा मृत्यूही होतो. ज्यांच्यावर पोट आहे, ती जनावरे जगविण्याकरिता मुलांच्या शिक्षणावर पाणी फेरावे लागतात. यंदाही या गोपालकांनी गाव सोडले असून चारापाण्याकरिता सोयीच्या असलेल्या ठिकाणचा सहारा घ्यायला सुरुवात केली आहे; पण हे असे स्थलांतरित जगणं आणखी किती दिवस सहन करावं? असा प्रश्नही शासन, प्रशासनाला विचारला जात आहे.
ना चारा छावणी, ना राखीव कुरण
आर्वी तालुक्यामध्ये दुग्ध उत्पादकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून हा परिसरही जंगलव्याप्त आहे. तालुक्यातील गोपालकांना दरवर्षीच गाव सोडून सहा महिने मुला-बाळांसह जनावरे घेऊन भटकंती करावी लागते. गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या कायम असताना अद्यापही मराठवाड्याप्रमाणे येथेही चारा छावणी व्हावी, याकरिता कोणत्याही लोकप्रतिनिधीनींही आवाज उचलला नाही. इतकेच नाही तर वनविभागानेही जनावरांकरिता राखीव चारा कुरण उपलब्ध करून देण्याकरिता पुढाकार घेतला नाही. त्यासाठी आतातरी प्रयत्न व्हावेत, अशी मागणी जोर धरत आहे.
काय म्हणतात गोपालक, काय आहे त्यांची अपेक्षा!
आर्वी तालुक्यातील काही भागांत चारा व पाण्याची मुबलकता नसल्याने मार्च ते जुलै महिन्यादरम्यान गोपालक जिथे चारा-पाण्याची व्यवस्था असेल त्या ठिकाणी परिवारासह निघून जातात. त्यामुळे मुले शिक्षणापासून वंचित राहतात. यासह अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने दुग्धव्यवसाय मोडकळीस आला आहे. शासनाने आर्वी तालुक्यात चारा छावणी व पाण्याचा प्रश्न निकाली काढावा.
- बाबासाहेब गलाट, माजी प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र गवळी समाज संघटना
पशुपालकांचे स्थलांतरण थांबविणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांची मुलं शिक्षणापासून वंचित राहत असल्याने त्यांना सुद्धा अडचणीचा सामना करावा लागतो. ज्या ठिकाणी ते वास्तव्यास आहेत, त्याच ठिकाणी पाणी व चाऱ्याची सोय केली तर त्यांची भटकंती थांबेल. त्यासाठी शासकीय यंत्रणेने भटक्या पशुपालकांसाठी मदतीची तरतूद करावी.
- डॉ. प्रफुल्ल कालोकार, चांदणी.
गेल्या ६० वर्षांपासून या तालुक्यातील गवळी समाजबांधव पाण्याकरिता भटकत आहेत. वॉटर ड्राय झोन एरिया असल्यामुळे या ठिकाणी आर्वी तालुक्यात वाढोणा भागातील गावांमध्ये पशुपालकांकरिता मुबलक पाण्याची व्यवस्था व किमान ६ महिन्यांकरिता चारा छावण्या तयार कराव्यात.
- मोरेश्वर गळहाट, चांदणी
मार्च महिन्यात गावाकडे चाऱ्यांची कमतरता जाणवते. त्यामुळे गोपालकांना गाव सोडावे लागत आहे. सध्या धामणगाव तालुक्यातील सोनोरा (काकडे) येथे ६ महिन्यांकरिता आलो आहे. इथे आल्यानंतर दुधाची विक्री कशी करायची हा सुद्धा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे बोथली शिवारातच चारा छावणी तयार करण्याची गरज आहे.
- आकाश डोळे, बोथली (हेटी)
सरकारच्या वैरण विकासासंदर्भात योजना आहेत. त्या योजना भटक्या पशुपालकांसाठी विशेषत्वाने राबविण्याची गरज आहे. तसेच त्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी सामाजिक संस्थांनी सुद्धा सहकार्य करावे अन्यथा दुग्ध व्यवसाय मोडकळीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- ऋषिकेश कालोकार, तळेगाव (रघुजी)
दिवसेंदिवस शहरालगत नवीन ले-आऊट तयार होत आहेत. त्यामुळे दूरपर्यंत चारा मिळत नाही. सिंदी (मेघे) परिसरातही येथील बरेच पशुपालक आहेत. काहींनी चाऱ्याच्या अडचणीमुळेच व्यवसाय बंद केला आहे. आता आहे त्यांचाही व्यवसाय बंद झाल्यास शहरातील नागरिकांना पॉकीटच्या दुग्धजन्य पदार्थाशिवाय पर्याय राहणार नाही.
- दत्तराज वैद्य, सिंदी (मेघे)
शिक्षणासाठी अस्थायी स्वरूपाचे वसतिगृह तयार करायला पाहिजे. जेणेकरून बाहेर गावी जाणाऱ्या पशुपालकांची मुलं शिक्षणापासून वंचित राहणार नाही. मराठवाड्यात ज्याप्रमाणे चाऱ्याचे नियोजन केले जाते. तसेच वर्धा जिल्ह्यात दुग्धव्यवसाय असलेल्या भागात करण्याची गरज आहे. यासंदर्भात प्रशासनाला वारंवार निवेदनही देण्यात आले आहे.
- महेश अवथळे, जिल्हाध्यक्ष, गवळी समाज संघटना