पाण्यासाठी ग्रामस्थ संतापले
By Admin | Published: May 23, 2017 01:04 AM2017-05-23T01:04:17+5:302017-05-23T01:04:17+5:30
येथील काकडदरा पुनर्वसन ग्रामपंचायतीवर पाणी पुरवठा योजनेचे ९ लाख २८ हजार ३० रुपयांचे देयक थकले आहे.
थकित देयकापोटी कापली वीज : ग्रा.पं.च्या मासिक सभेत गदारोळ
लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव (श्या.पं.) : येथील काकडदरा पुनर्वसन ग्रामपंचायतीवर पाणी पुरवठा योजनेचे ९ लाख २८ हजार ३० रुपयांचे देयक थकले आहे. या थकबाकीपोटी महावितरणने योजनेचा पाणी पुरवठा खंडित केला आहे. यामुळे गत आठ दिवसांपासून गावात कृत्रिम पाणी पुरवठा निर्माण झाला असून गावाकऱ्यांची भटकंती होत आहे. हा त्रास टाळण्याकरिता देयकाची रक्कम भरण्याची मागणी करीत गावकऱ्यांनी सोमवारी आयोजित सभेवर धडक देत सरपंच व सदस्यांना धारेवर धरले.
सविस्तर वृत्त असे की, काकडदरा ग्रा.पं. पुनर्वसीत ग्रा.पं. असून लोकसंख्या साधारणत: १ हजारावर आहे. ग्रामपंचायतीची स्थापना झाली तेव्हापासून काकडदरा पुनर्वसन व रामदरा पुनर्वसन या दोन्ही गावाची ग्रामपंचायती एकत्र होत्या. सन २००९ पासून रामदरा पुनर्वसन ग्रा.पं. ची पाणी पुरवठा वेगळा व स्वतंत्र झाला. परंतु सदर थकित वीज देयक हे दोन्ही गावची ग्रा.पं. एकत्र होती तेव्हापासूनचे आहे. तर सदर विद्युत कनेक्शन हे जि.प.च्या नावाने आहे. सदर देयक हे त्यावेळेस काकडरा ग्रा.पं. एकत्र असल्यामुळे संपूर्ण थकित विद्युत बिलाची राशी एकूण ९,२८,०३० आहे. एप्रिल २०१७ पर्यंत ही पुरवठा योजना ग्रा.पं. काकडदराच्या नावाने आहे.
या अगोदरही अनेकवेळा अशा प्रकारे विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. यावेळी पाणी पुरवठा, सामान्य फंड तंटामुक्ती व १४ वा वित्त आयोग इत्यादीच्या फंडातून काही विद्युत देयक भरून विद्युत पुरवठा पुर्ववत झाला होता. याच प्र्रकारे १४ व्या वित्त आयोगातून थकित देयकापैकी काही रक्कम भरून विद्युतपुरवठा सुरू करून घ्यावा, असी सूचना ग्रा.पं. सदस्य सुरेश खरे, विद्या परणकर, विमल पखाले यांनी सरपंच निता वडुरकर व सचिवांना केली. गटविकास अधिकारी आष्टी यांनी सुद्धा १४ व्या वित्त आयोगातून सदर विद्युत बिलाची काही रक्कम भरून विद्युत पुरवठा सुरू करून घ्यावा, अशी सूचना केली होती. परंतु यावर कुठलीही कार्यवाही झाल नाही. यामुळे देयक अदा करून गावातील पाणी पुरवठा पुर्ववत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सामान्य फंडात निधी उपलब्ध नसून काही तडजोड करून सुरू महिन्याचे देयक व अधिकचे असे एकूण २० हजार भरण्यास तयार असून त्याबाबत विद्युत मडळाच्या सहायक अभियंता यांची भेट घेवून काही तडजोड करून विद्युत पुरवठा सुरू होण्याबाबत प्रयत्न करतो.
- आर. बी. घोटकर, सचिव, ग्रा.पं. काकडदरा पुनर्वसन
गटविकास अधिकारी यांनी सदर पाणीपुरवठ्याचे विद्युत बिल १४ व्या वित्त आयोगातून भरावे, असे आदेश दिले आहे. त्याबाबत तसी सुचना सचिव ग्रा.पं. काकडदरा यांना केली आहे.
- पी.एस. चव्हाण, विस्तार अधिकारी पं.स. आष्टी.