गावात सुविधा मिळेनात, जऊरवाडा ग्रामपंचायतीला ठोकले गावकऱ्यांनी कुलूप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 06:39 PM2024-07-10T18:39:41+5:302024-07-10T18:40:25+5:30
ग्रामस्थ आक्रमक : सरपंच, सचिवांचे दुर्लक्ष ठरले कारणीभूत
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घाडगे) : तालुक्यातील अतिशय संवेदनशील असलेल्या जऊरवाडा ग्रामपंचायत परिसरात सोयीसुविधांचा अभाव आहे. त्यामुळे गावकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असून, सरपंच व सचिवांना वारंवार कळवूनसुद्धा दखल घेतली गेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख संदीप भिसे यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले.
गावातील समस्या सोडविण्यासंदर्भात शिवसेनेचे संदीप भिसे यांच्या नेतृत्वात कारंजा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले होते. येथील सरपंच वर्ध्यातून कामकाज पाहतात ते गावात राहत नाही. तसेच सचिवांकडे या ग्रामपंचायतचा अतिरिक्त कारभार असल्याने ते गावाला नियमित वेळ देत नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीला नियमित सचिव देण्यात यावा तसेच येथील शिपाईसुद्धा काटोलला राहत असल्याने गावातील पाणीपुरवठा अनियमित होतो. गावातील दिवाबत्ती बंद राहते आणि चालू केली तर दुपारपर्यंत चालूच राहते. शिवाय पाण्याच्या टाकीची स्वच्छता केली नसल्याने व पाणीपुरवठ्याच्या विहिरीत कचरा असल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. या विहिरीमध्ये ब्लिचिंग पावडरही टाकली जात नाही, अशा अनेक समस्या निवेदनात नमूद करून त्या तातडीने सोडवाव्यात अन्यथा ग्रामपंचायतीला कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. परंतु, या निवेदनानंतरही ग्रामपंचायत प्रशासन किंवा गटविकास अधिकारी यांच्याकडून कोणतीच दखल घेतली गेली नसल्याने अखेर मंगळवारी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले. यावेळी गावातील महिला व पुरुषांची उपस्थिती होती. त्यांनी ग्रामपंचायतीच्या कारभाराबद्दल रोष व्यक्त केला. यासंदर्भात ग्रामपंचायत सरपंचांशी मोबाइलवर संपर्क साधला असता त्यांनी 'मी ड्रायव्हिंग करीत आहे, आता बोलता येणार नाही, नंतर बोलू' असे सांगितले.
विहिरीमध्ये ब्लिचिंग पावडर आवश्यक त्या प्रमाणात वारंवार टाकली जाते. सामान्य फंडामध्ये सध्या पैसे नसल्याने गावातील नाली सफाईकरिता विलंब झाला. आता दोन ते तीन दिवसात नालीसफाईचे काम पूर्ण होणार आहे. माझ्याकडे तीन ग्रामपंचायतीचा कारभार असल्यामुळे दिलेल्या दिवसावर मी नियमित ग्रामपंचायतमध्ये जातो. ग्रामपंचायतचे शिपाई यांना ग्रामपंचायत नियमित उघडण्याबाबत व ग्रामपंचायत उघडी ठेवण्याबाबत पत्र दिले आहे.
- संजय येवले, सचिव, ग्रामपंचायत, जऊरवाडा,