नागरी सुविधांसाठी ग्रामस्थांचे उपोषण

By admin | Published: January 18, 2016 02:21 AM2016-01-18T02:21:55+5:302016-01-18T02:21:55+5:30

निम्न वर्धा प्रकल्पामुळे अमरावती व वर्धा जिल्ह्यातील ३२ गावे विस्थापित झाली. बहुतांश गावांचे पुनर्वसन झाले; पण त्यांना मूलभूत सुविधा पुरविल्या नाही.

Villagers fasting for civil facilities | नागरी सुविधांसाठी ग्रामस्थांचे उपोषण

नागरी सुविधांसाठी ग्रामस्थांचे उपोषण

Next

पुनर्वसित चिंचपूरची व्यथा : १५ वर्षांतही मूलभूत सोई नाही, आंदोलनाचा तिसरा दिवस
रोहणा : निम्न वर्धा प्रकल्पामुळे अमरावती व वर्धा जिल्ह्यातील ३२ गावे विस्थापित झाली. बहुतांश गावांचे पुनर्वसन झाले; पण त्यांना मूलभूत सुविधा पुरविल्या नाही. यामुळे ग्रामस्थांना मरणयातना सोसाव्या लागत आहे. चिंचपूर हे गावही पुनर्वसित झाले; पण १५ वर्षांतही नागरी सुविधा पोहोचल्या नाही. यामुळे ग्रा.पं. पदाधिकारी व ग्रामस्थांनी प्रकल्प कार्यालय धनोडी (ब.) येथे शुक्रवारपासून आमरण उपोषण सुरू केले. रविवारी तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच होते.
निम्न वर्धा प्रकल्पासाठी २३ गावे वर्धा जिल्ह्यातील तर नऊ गावे अमरावती जिल्ह्यातील पुनर्वसित करावी लागली. चिंचपूर या गावाचेही पुनर्वसन करण्यात आले. पुनर्वसन करताना पुनर्वसित स्थळी नागरी सुविधा पूर्ण करा आणि नंतरच गावाचे पूनर्वसन करा, असा कायदा आहे; पण चिंचपूर गावाचे पुनर्वसन झालेल्या स्थळी अनेक सुविधांचा अभाव आहे काही सुविधा अर्धवट आहेत. लोकवस्ती करण्यास सदर स्थळही सुरक्षित नाही. कनिष्ठांपासून वरिष्ठांपर्यंत सर्वांना निवेदने देऊन त्रस्त चिंचपूरच्या ग्रा.पं. पदाधिकारी व ग्रामस्थांनी अखेर उपोषणाचा निर्णय घेतला. निम्न प्रकल्पाच्या धनोडी येथील प्रकल्प वसाहत परिसरातील कार्यालयासमोर शुक्रवारी आमरण उपोषण सुरू करण्यात आले. रविवारी तिसऱ्या दिवशीही ग्रामस्थांचे आंदोलन सुरूच होते. शनिवारी खासदार अरुण अडसड तर रविवारी सहायक अभियंते गोळे यांनी उपोषण मंडपाला भेट दिली; पण आश्वासन दिले नाही.
पुनर्वसित गावात अवैध ठिकाणी स्मशानभूमी शेड बांधण्यात आले आहे. ते वैध जागेत बांधून स्मशानभूमीत जाण्यासाठी सिमेंट रस्त्याचे बांधकाम करावे. पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे म्हणून जलशुद्धीकरण यंत्र बसविण्यात यावे. पाणी पुरवठा योजनेची पाईप-लाईन काहींच्या प्लॉटमधून गेली आहे. ती काढून रस्त्याच्या कडेला टाकावी. पाईपलाईन १५ वर्षांपूर्वी टाकलेली असून तिची मुदत संपली आहे. ती बदलून नवीन पाईपलाईन टाकावी. तुळजापूर व बऱ्हाणपूर या गावांना पाणी पुरवठा योजनेसाठी स्वतंत्र टाक्या बांधून द्याव्यात. गावातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या अरूंद असल्याने त्या लवकर बुजतात. परिणामी, घाण साचून गावात दुर्गंधी पसरते. यामुळे नवीन व रूंद नाल्यांचे बांधकाम करावे. तुळजापूर, बऱ्हाणपूर गावातील रस्ते पक्क्या स्वरूपात बांधून द्याचे. गावातील झोपडपट्टीत विद्युत व्यवस्था नसल्याने काळोखात राहावे लागते. यामुळे झोपडपट्टी भागात विद्युतची व्यवस्था व्हावी. पुनर्वसित गावात ग्रामपंचायत भवन नसल्याने जि.प. शाळेच्या एका खोलीतून ग्रा.पं. चा कारभार चालतो. स्वतंत्र व प्रशस्त ग्रामपंचायत भवन तसेच कोंडवाडा बांधून द्यावा. शेतकऱ्यांच्या वहिवाटीचे वंशपरंपरागत जुने शिवपांदण रस्ते व ११ फुटाचे मोठे रस्ते वहिवाटीसाठी मोकळे करून द्यावे व ते पक्के बांधून द्यावे. गावातील काहींना अद्याप प्लॉट मिळाले नसून त्यांना प्लॉट द्यावे. स्त्री व पुरूषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधून द्यावे. गावातील वृक्ष लागवडीची जागा मोकळी करून द्यावी. गावातील वाकलेले वीज खांब सरळ करून ते मजबूत करावे. नागरी सुविधा पूर्ण झाल्या नसल्याने चिंचपूर हे गाव ग्रा.पं. कडे हस्तांतरित झाले नाही. यामुळे गावातील देखभाल दुरूस्तीची जबाबदारी प्रकल्प अधिकाऱ्यांची आहे. शासकीय मालमत्तेचे नुकसान होऊ नये म्हणून गावात सुरक्षा रक्षक नियुक्त करावा. समाज मंदिराला कुंपण भिंत बांधावी. गावाच्या विस्तारानुसार बेघरांना घरे बांधण्यासाठी जागा देऊन आर्थिक मदत करावी. अनेकांना घरकूल मिळाले; पण पूर्ण अनुदान दिले नाही. ते त्वरित देण्यात यावे. गावात व्यायाम शाळा बांधावी आदी मागण्या ग्रा.पं. पदाधिकारी व ग्रामस्थांनी केल्या आहेत.
आमरण उपोषणात सरपंच उषा सुनील घटाळे, उपसरपंच शिषीर मनोहर शेंडे, सदस्य योगीता घटाळे, अमित चिकराम, निर्मला शेंडे या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ सुनील घटाळे, रामाजी शेंडे, अनिल राऊत, किसना हाडे, शिला चिकराम आदी सहभागी झाले आहेत.(वार्ताहर)

आश्वासन न देताच परतले अभियंते
मुलभूत सुविधा पुरविण्याच्या मागणीसाठी चिंचपूर येथील ग्रा.पं. पदाधिकारी व ग्रामस्थांनी शुक्रवारपासून उपोषण सुरू केले. त्यांच्या उपोषण मंडपास शनिवारी खा. अरुण अडसड व रविवारी निम्न वर्धा प्रकल्पाचे सहायक अभियंता एन.जी. गोळे यांनी भेट दिली; पण कुणीही समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले नाही. यामुळे तिसऱ्या दिवशीही प्रकल्पग्रस्तांचे उपोषण सुरूच होते. गावातील संपूर्ण समस्यांचे निराकरण होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
चिंचपूर गावाला लागून खोलाड व मेंडकी हे दोन नाले वाहतात. पावसाळ्यात दोन्ही नाल्यांना पूर आल्यास अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून पाणी वाहते. परिणामी, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. दोन्ही नाल्यांचे सरळीकरण, खोलीकरण व रूंदीकरण करणे गरजेचे असताना त्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे.

तहसीलदार ते मुख्यमंत्री निवेदन प्रवास
ग्रा.पं. पदाधिकारी व ग्रामस्थांनी मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, पुनर्वसन मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, तहसीलदार, निम्न वर्धा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांना अनेकदा लेखी निवेदने दिलीत. प्रत्यक्ष भेटी घेतल्या. राहुल गांधी यांना ३० एप्रिल २०१५ रोजी याबाबत लेखी निवेदन दिले. निम्न वर्धा प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांना ३० मे व ३० जून २०१५ रोजी लेखी निवेदनातून गावातील समस्या सोडविण्याबाबत अवगत केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रकल्पाचा आढावा घेतला असता २२ आॅगस्ट २०१५ रोजी ग्रामस्थांना लेखी निवेदन दिले. निम्न वर्धा प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांना प्रत्येक महिन्याला लेखी निवेदने देत समस्या सोडविण्याची विनंती केली जाते; पण कुणीही दखल घेतलेली नाही.
ग्रामस्थांवर उपोषण करण्याची वेळ येऊ नये, यासाठी शासन व प्रशासनाकडून कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. यामुळे चिंचपूरच्या ग्रा.पं. पदाधिकारी व ग्रामस्थांत असंतोष पसरला आहे.

Web Title: Villagers fasting for civil facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.