पवनारमध्ये ग्रामस्थांना घरपोच मिळतो ग्रामपंचायतीच्या जमा-खर्चाचा हिशेब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 11:38 AM2017-11-29T11:38:05+5:302017-11-29T11:44:09+5:30

आचार्य विनोबा भावे यांच्या पदस्पर्शाने पूनित झालेल्या पवनार ग्रामपंचायतीमार्फत मागील तीन वर्षांपासून दरवर्षी ग्रा.पं. च्या जमा-खर्चाचा हिशेब ग्रामस्थांना पत्रकाद्वारे घरपोच दिला जात आहे. अशा प्रकारे जमा -खर्चाचा वार्षिक अहवाल सादर करणारी पवनार ही विदर्भातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे.

The villagers get Gram Panchayat account information at home in Pawarnar | पवनारमध्ये ग्रामस्थांना घरपोच मिळतो ग्रामपंचायतीच्या जमा-खर्चाचा हिशेब

पवनारमध्ये ग्रामस्थांना घरपोच मिळतो ग्रामपंचायतीच्या जमा-खर्चाचा हिशेब

Next
ठळक मुद्देपवनार ग्रामपंचायतीचा उपक्रम विदर्भातील पहिलाच प्रयोग

अभिनय खोपडे ।
आॅनलाईन लोकमत
वर्धा : आचार्य विनोबा भावे यांच्या पदस्पर्शाने पूनित झालेल्या पवनार ग्रामपंचायतीमार्फत मागील तीन वर्षांपासून दरवर्षी ग्रा.पं. च्या जमा-खर्चाचा हिशेब ग्रामस्थांना पत्रकाद्वारे घरपोच दिला जात आहे. अशा प्रकारे जमा -खर्चाचा वार्षिक अहवाल सादर करणारी पवनार ही विदर्भातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे.
वर्धा तालुक्यात समाविष्ट असलेल्या पवनार ग्रा.पं. च्या सरपंचपदाची धुरा अजय गांडोळे यांच्याकडे आली. त्यांनी २०१४-१५ पासून ग्रामस्थांना गावातील जमा-खर्चाचा हिशेब सादर करणे सुरू केले. प्रत्येक गावात ग्रामसभेत जमा-खर्च व विकास कामांची माहिती वाचून दाखविली जाते. ग्रामीण भागात ग्रामसभेला ग्रामस्थांची १०० टक्के उपस्थिती राहत नाही. अनेक ठिकाणी ग्रामसभा कागदोपत्रीच आटोपल्या जातात; पण पवनार ग्रा.पं. ने एक पाऊल पुढे टाकत ही अभिनव पद्धती राबविण्याचा निर्णय घेतला. सरपंच अजय गांडोळे यांनी या कामात पुढाकार घेऊन ग्रा.पं. तर्फे दिवाळीच्या मुहूर्तावर वार्षिक अहवाल तयार करण्याचा निर्णय घेतला.
अहवालात त्या वर्षातील विकास कामांचा आढावा घेण्यासोबतच ग्रा.पं.च्या वार्षिक खर्चाचे विवरण देण्याचीही पद्धती सुरू केली. यामुळे ग्रामस्थांना ग्रामपंचायत प्रशासनातील पारदर्शकता ठळकपणे दिसू लागली. यंदाही २०१६-१७ चा जमा खर्च ग्रामस्थांना सादर करण्यात आला असून २०१७-१८ या वर्षात होणाऱ्या विकास कामांची माहितीही देण्यात आली आहे.
सेवाग्राम, पवनार, वर्धा या विकास आराखड्यात पवनार गावातही अनेक कामे होणार आहेत. या कामांची माहिती यानिमित्ताने देण्यात आली आहे. २०१५-१६ च्या आराखड्यात आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून पवनार गावात करण्यात आलेल्या कामांचा तथा स्थळांचा उल्लेखही करण्यात आला आहे. पवनार ग्रा.पं. च्या या अभिनव कार्याची आदर्श ग्राम योजनेचे महाराष्ट्र अध्यक्ष पोपटराव पवार यांनीही प्रशंसा केली आहे.

विकास कामांबाबत नागरिकांना घरपोच माहिती देण्यासोबत ग्रामपंचायतीचा जमा-खर्चही घरपोच देण्याचे काम ग्रा.पं. मार्फत सुरू आहे. यामुळे नागरिकांना गावात प्रस्तावित विकास कामे, पूर्ण झालेली कामे, यासोबतच निधीतून किती रक्कम आली, खर्च किती झाला याची माहिती उपलब्ध होत आहे. अजय गांडोळे सरपंच झाल्यानंतर या उपक्रमाची सुरुवात झाली. 

- वसंतराव उमाटे, रहिवासी, पवनार.

सरपंचपदाची धुरा आल्यानंतर गावात विकासात्मक दृष्टिकोनातून कामे करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पवनारला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. गावाच्या विकासासाठी लोकांचा सहभाग गरजेचा आहे. गांधीवादी लोकांनाही विश्वासात घेऊन काम करीत असताना ग्रामस्थांना त्यांच्या कराच्या रकमेतून गावासाठी काय-काय होत आहे, याची माहिती व्हावी म्हणून वार्षिक अहवाल प्रसिद्ध करून तो लोकांपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम सुरू केला. यामुळे लोकांचाही ग्रामपंचायतीच्या कामाप्रति विश्वास वाढण्यास मदत झाली.
- अजय गांडोळे, सरपंच, ग्रा.पं., पवनार

Web Title: The villagers get Gram Panchayat account information at home in Pawarnar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Pavnarपवनार