ग्रामस्थांनी ठोकले ग्रा.पं.ला कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 11:48 PM2018-08-31T23:48:38+5:302018-08-31T23:49:22+5:30
नजीकच्या भुगाव येथील ग्रा.पं. कार्यालयाच्या सभागृहात १५ आॅगस्टची रद्द केलेली आमसभा शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी सुमारे ३०० ग्रामस्थही उपस्थित झाले; पण यावेळी कुठलीही पूर्ण सुचना न देता सरपंच व ग्रामसचिवांनी ग्रामसभा तहकुब केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नजीकच्या भुगाव येथील ग्रा.पं. कार्यालयाच्या सभागृहात १५ आॅगस्टची रद्द केलेली आमसभा शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी सुमारे ३०० ग्रामस्थही उपस्थित झाले; पण यावेळी कुठलीही पूर्ण सुचना न देता सरपंच व ग्रामसचिवांनी ग्रामसभा तहकुब केली. परिणामी संतप्त ग्रामस्थांनी प्रहारच्या नेतृत्त्वात थेट ग्रा.पं. कार्यालयाला कुलूप लावून ग्रा.पं. प्रशासनाच्या कार्यप्रणालीचा निषेध नोंदविला.
ग्रामसभा असल्याने गावातील सुमारे ३०० नागरिक ग्रा.पं. कार्यालयात नियोजित वेळेत पोहोचले होते. परंतु, सरपंच व ग्रामसचिवांनी कुठलीही पूर्व सूचना न देता सरळ आमसभा तहकुब केली. आजच्या ग्रामसभेत विविध कामाचा हिशेब, १४ व्या वित्त आयोगाचा निधी खर्च केला कुठे, दिव्यांग बांधवांच्या वाट्याचा असलेला २ टक्के निधी, जि.प.ची जीर्ण शाळा इमारत दुरूस्ती करणे आदी विविध मुद्यांवर चर्चा होणे क्रमप्राप्त होते. याच विषयांना अनुसरून सरपंच व ग्रामसचिव तसेच सत्ताधाऱ्यांकडे उत्तरे नसल्याने ही ग्रामसभा तहकुब करण्यात आल्याचा आरोप करीत संतप्त ग्रामस्थांनी ग्रा.पं. कार्यालयाला कुलूप लावले. या आंदोलनाचे नेतृत्त्व प्रहारचे शहर अध्यक्ष विकास दांडके यांनी केले. आंदोलनात नंदकिशोर लोखंडे, पंढरी थूल, बापूराव उरकुडे, दमडू उरकुडे, बंडू सावंत, अरविंद मसराम, रुख्मा गौळकार, गजानन मडावी, नरहरी गौळकार, अनिल कडू, वरुण दिवे, रोशन शास्त्रकार, श्रीकांत पाटील चहांदे आदी सहभागी झाले होते.
आंदोलनकर्ते पोहोचले मिनीमंत्रालयात
संतप्त ग्रामस्थांनी ग्रा. पं. कार्यालयाला कुलूप लावल्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन घेवून ते जिल्ह्याचे मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या जि.प. कार्यालयात पोहोले. याप्रसंगी जि. प. प्रशासनाला सदर आंदोलनकर्त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. या निवेदनातून सदर प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
ग्रामसचिवांचे वाहन कोंडले
शुक्रवारी ग्रामसभा तहकूब करण्यात आल्याची माहिती मिळताच संतप्त ग्रामस्थांनी भुगाव येथील महिला सरपंचाला चांगलेच धारेवर घेतले. त्यानंतर संतप्त नागरिकांनी ग्रामसचिवांचे वाहन ग्रा.पं. कार्यालयात टाकून कार्यालयाला कुलूप ठोकले, हे विशेष.