ग्रामस्थांनी रोखली यवतमाळ-उमरेड बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 12:18 AM2018-09-05T00:18:25+5:302018-09-05T00:18:56+5:30
वर्धा-नागपूर महामार्गावरून धावणाऱ्या महामंडळाच्या बसेसला केळझर येथे थांबा देण्यात आला आहे. त्यासाठी आ. डॉ. पंकज भोयर यांनी रापमच्या विभाग नियंत्रकांकडे पाठपुरावा केला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
केळझर : वर्धा-नागपूर महामार्गावरून धावणाऱ्या महामंडळाच्या बसेसला केळझर येथे थांबा देण्यात आला आहे. त्यासाठी आ. डॉ. पंकज भोयर यांनी रापमच्या विभाग नियंत्रकांकडे पाठपुरावा केला होता. असे असतानाही रापमच्या चालक व वाहकाने केळझर येथे बस थांबविण्यास नकार दिल्याने संतप्त ग्रामस्थांनी यवतमाळ-उमरेड बस रोखून सदर घटनेचा निषेध नोंदविला.
रापमचे हेकेखोर चालक व वाहक येथे बस थांबत नसल्याची खोटी बतावणीच प्रवाशांना करतात. शिवाय एखाद्या प्रवाशाने बसचा थांबा असल्याचे सांगिल्यावर त्याला उडवा-उडवीची उत्तरे दिली जातात. असाच काहीसा प्रकार येथे झाल्यावर संतप्त ग्रामस्थांनी वाहन थांबवून वाहक व चालकाला घेराव घातला. रविवारी सायंकाळच्या सुमारास केळझर येथील काही रहिवासी वर्धा येथून केळझरला जाण्याकरिता यवतमाळ आगाराच्या यवतमाळ-उमरेड बसमध्ये चढले. त्यांनी महिला बस वाहकाला केळझरची तिकीट मागितली. यावेळी सदर महिला वाहकाने त्यांना केळझरची तिकीट मशीनमधून येत नसल्याचे सांगितले. शिवाय केळझर येथे बस थांबणार नाही तुम्ही सेलूपर्यंतचे तिकीट घेण्याचा सल्ला दिला. याच बसमध्ये गावातील सामाजिक कार्यकर्ते युसुफ शेख हे सुद्धा होते. त्यांनी सदर वाहकाला केळझरला बसचा थांबा असल्याचे सांगितले. परंतु, सदर महिला वाहक समजण्यास तयार नव्हती. उलट वाद घालण्याचा प्रयत्न यावेळी झाला. अखेर सेलूच्या बोरधरण चौकात बस थांबली असता केळझरच्या प्रवाशांना बसखाली उतरण्याचे बसच्या चालक व वाहकांनी सांगितले. त्यानंतर सदर प्रवाशांनी आम्ही केळझरला उतरू असे सांगत आपल्याला वाटत असेल तर वाहन थेट पोलीस ठाण्यात न्या; आम्ही येतो, असे सांगितले. यावेळी सुमारे १५ मिनिटे बस सेलूच्या बोरधरण चौकात उभी राहिली. शेवटी बसच्या चालक व वाहकांनी पुढील प्रवासाला सुरूवात केली. याच दरम्यान सदर घटनेची माहिती उपसरपंच फारूख शेख यांना मिळाली. सेलू ते केळझर या प्रवासादरम्यान वाहकानेच केळझरची तिकिट काढून दिली. बस केळझर येथे पोहोचताच तिला संतप्त ग्रामस्थांनी अडविली. तसेच वाहक व चालकाविरुद्ध कार्यवाही करण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी रेटून धरली होती.