मूलभूत सुविधांअभावी ग्रामस्थ त्रस्त
By admin | Published: May 31, 2015 01:32 AM2015-05-31T01:32:57+5:302015-05-31T01:32:57+5:30
आर्वी तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या समजल्या जाणाऱ्या विरूळ (आ.) येथे सध्या अनेक समस्यांचा डोंगर पहावयास मिळतो.
ग्रा. पं. प्रशासनाचे दुर्लक्ष : गावात समस्यांचा डोंगर
विरूळ (आकाजी) : आर्वी तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या समजल्या जाणाऱ्या विरूळ (आ.) येथे सध्या अनेक समस्यांचा डोंगर पहावयास मिळतो. गावात मूलभूत सुविधांचाही अभाव आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहे.
गत १५ दिवसांपासून येथील ग्रामसेवक बेपत्ता होते. त्यामुळे अनेक कामे खोळंबली आहेत. अनेक रस्त्यांवर शेणखत टाकल्या जात असल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. राजीव गांधी भवनाचे काम मागील दोन वर्षापासून धूळखात पडून आहे. गावात पाण्याची तीव्रटंचाई असून पाच ते सहा दिवसानंतर नळ येत आहेत. त्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. अनेक गरजू नागरिकांचे घरकुल मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. गावातील नागरिकांनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण करूनही अनेकांना अद्यापही पैसे मिळालेले नाही. याबाबत गटविकास अधिकाऱ्याला निवेदन देवूनही चौकशी झालेकी नाही. फिल्टर प्लॅन्ट मधील चोरी गेलेल्या मशीनची चौकशी सुद्धा सुद्धा अद्याप झाली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी विशेष सभा बोलावून यावर चर्चा करण्यात आली. आर्वीच्या गटविकास अधिकाऱ्याच्या भोंगळ कारभारामुळे हा सारा प्रकार होत असल्याचे बोलल्या जात आहे. विरूळची ग्रा.पं.ची निवडणूक अविरोध पार पडली. अविरोध झालेल्या निवडणुकीमुळे गावाचा विकास होईल अशी नागरिकांची अपेक्षा फोल ठरली आहे. त्यामुळे येथील शिवसेना कार्यकर्त्यांनी संबंधितांना निवेदन देवून या साऱ्या प्रकारच्या चौकशीची मागणी रेटून धरली आहे.(वार्ताहर)