ग्रामपंचायत निवडणुकीत आचारसंहितेचे उल्लंघन
By admin | Published: April 8, 2015 01:48 AM2015-04-08T01:48:32+5:302015-04-08T01:48:32+5:30
येथील ग्रामपंचायतच्या निवडणुकीत एकूण चार गट आमने-सामने आहे. एका गटाने केवळ पाच उमेदवार उभे केले आहे.
तळेगाव (श्यामजीपंत): येथील ग्रामपंचायतच्या निवडणुकीत एकूण चार गट आमने-सामने आहे. एका गटाने केवळ पाच उमेदवार उभे केले आहे. तर उर्वरीत गटाने १७ जागांकरिता १७ उमेदवार उभे केले आहे. मंगळवारपर्यंत या १७ जागांकरिता एकूण ८५ नामांकन दाखल झाले.
निवडणूक जवळ येत असल्याने प्रचाराच्या फैरी सुरू झाल्या आहेत. साऱ्यांचे लक्ष प्रचाराकडे आहे. यात गावात असलेल्या आचारसंहितेच्या उल्लंघणाकडे मात्र साऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे मंगळवारी पुढे आले.
गावात लोकप्रतिनिधीच्या हस्ते विविध बांधकामाचे उद्घाटन तथा भूमिपूजन झाले. निवडणुकीची आचारसंहिता असल्याने ते झाकणे बंधनकारक असताना येथे तसे झाले नाही. गावातील तलाठी, कोतवाल यांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी पुढाकार घेणे महत्त्वाचे होते. संबंधित फलकांवर कापड लावणे, तसेच आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दखल घेणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक जि.प. व पं.स.च्या निवडणुकीची रंगीत तालीम असल्याने याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष केंद्रीत केले आहे. आचारसंहितेच्या भंगाची प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी रिंगणात असलेल्या काही उमेदवारांनी केली आहे.(वार्ताहर)