आचारसंहितेचे उल्लंघन अठराशेवर फलक हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:28 AM2019-03-23T00:28:05+5:302019-03-23T00:28:36+5:30
लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू होताच आदर्श आचारसंहिताही लागू करण्यात आली. परंतु, आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होताच निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू होताच आदर्श आचारसंहिताही लागू करण्यात आली. परंतु, आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होताच निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कारवाईचा बडगा उगारण्यात आला. १० मार्च ते १९ मार्च या कालावधीत सहाही मतदार संघांतील १,८२३ पोस्टर, बॅनर भिंतीवरील लिखित फलकांवर कारवाई करण्यात आली आहे.
वर्धा लोकसभा मतदारसंघातील वर्ध्यासह आर्वी, हिंगणघाट व देवळी या चार विधानसभा मतदारसंघासह अमरावती जिल्ह्यातील धामणगाव व मोर्शी या दोन विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यासह अमरावती जिल्ह्यातीलही दोन विधानसभा मतदारसंघांवर लक्ष ठेवताना प्रशासनाची मोठी कसरत होते.
आचारसंहितेच्या काळात नेत्यांचे छायाचित्र असलेले शासकीय योजनांचे फलक काढणे, उद्घाटन व भूमिपूजनाचे फलक झाकणे तसेच नेत्यांचे छायाचित्र काढून रंगविलेल्या भिंती झाकणे किंवा ते चित्र मिटविणे बंधनकारक आहे.
तसेच कोणत्याही फलकाद्वारे मतदार आकर्र्षित होणार नाही, याची खबरदारी घ्यावयाची असते. तरीही मोठ्या प्रमाणात याकडे दुर्लक्ष करून आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी निवडणूक विभागाकडे करण्यात आल्या. या तक्रारींच्या आधारे सहाही मतदार संघांतील १४८ रंगविलेल्या भिंती, ७१४ पोस्टर, ३७८ बॅनर तर ५८३ इतर अशा एकूण १ हजार ८२३ प्रकरणांसंदर्भात कारवाई करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी आचारसंहिता लागूनही फलक झाकण्यात आले नाही. निवडणूक विभागाकडे तक्रारी केल्यावरच कारवाई होताना दिसत आहे. संबंधित विभाग स्वत: कारवाईकरिता पुढाकार घेत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
आर्वी विधानसभा क्षेत्रातून साडेबारा लाखांची रोकड जप्त
वर्धा लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा क्षेत्रात विविध पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. या पथकातील एसएस टीमचे प्रमुख सांभारे यांनी १३ मार्च रोजी आर्वी विधानसभा क्षेत्रात २ लाख ४८ हजार १०० रुपयांची रोकड जप्त करून उपकोषागार, आष्टी येथे जमा केली. संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला. याच परिसरात १९ मार्चला १० लाख रुपयांची रोकड जप्त केली. ती रक्कमही उपकोषागार, आष्टी येथे जमा केली आहे.
मोर्शीत लागले १३ चेकपोस्ट
निवडणूक कालावधीत एक लाख रुपयांवर रक्कम हाताळण्यावर बंदी आहे. असे असतानाही पैसा आणि दारुच्या भरवशावर मतदारांना आकर्षित करण्याची शक्यता जास्त असल्याने कोणत्याही वाहनातून दारू आणि पैशाची वाहतूक होता कामा नये, याकरिता निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार वर्धा लोकसभा मतदारसंघात एकूण २४ चेक पोस्ट लावण्यात आले आहेत. यामध्ये धामणगाव येथे ३, मोर्शीत १३, आर्वीत ५ तर हिंगणघाट येथे ३ चेक पोस्ट लावण्यात आले आहेत.
सहाही मतदारसंघात १०७ पथकांचा वॉच
लोकसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी तसेच मतदारांना आमिषापासून दूर ठेवण्याकरिता आणि आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे म्हणून वर्धा लोकसभा मतदारसंघातील धामणगाव, मोर्शी, आर्वी, देवळी, हिंगणघाट व वर्धा या सहाही विधानसभा मतदारसंघात एसएस टीम, व्हिडिओ स्कॅनिंग टीम, फ्लार्इंग स्क्वॉड व व्हिडिओ व्हिवींग टीम अशी विविध पथके तयार करण्यात आली आहेत. सहाही मतदारसंघात एकूण १०७ पथके कार्यरत असून हिंगणघाट व देवळी मतदारसंघात इतरांच्या तुलनेत जास्त पथक कार्यरत आहेत.