उन्हाळी सोयाबीन पिकावर व्हायरसचा अॅटॅक; नुकसानभरपाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 12:45 PM2021-03-17T12:45:44+5:302021-03-17T12:46:13+5:30
चिकणी जामनीसह परिसरात पेरणी केलेल्या उन्हाळी सोयाबीन पिकावर ऐन शेंगा भरण्याच्या हंगामातच व्हायरसचा अटॅक झाला आहे. यामुळे अवघ्या सात दिवसातच पुर्णत: सोयाबीनची झाडे करपून गेली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: चिकणी जामनीसह परिसरात पेरणी केलेल्या उन्हाळी सोयाबीन पिकावर ऐन शेंगा भरण्याच्या हंगामातच व्हायरसचा अटॅक झाला आहे. यामुळे अवघ्या सात दिवसातच पुर्णत: सोयाबीनची झाडे करपून गेली आहेत. यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा आर्थिक संकट ओढवले आहे. पण मात्र कृषिविभाग उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम करीत असल्याचे दिसून येत आहे.
देवळी तालुक्यातील जामनी येथील शेतकरी वाल्मिकराव येणकर यांनी केलेल्या शेतातील एक एकर शेतात बीजोत्पादनासाठी उन्हाळी सोयाबीनची पेरणी केली. यासाठी त्यांना मकत्यासह २५ हजार रुपये खर्च आला, खत, फवारणी, वेळोवेळी देण्यात आले. तसेच पाण्याचेही व्यवस्थापन योग्य रित्या करण्यात आले. यामुळे सोयाबीन पीक चांगले बहरून आले फुले व शेंगही अधिक प्रमाणात लागल्या होत्या. यामुळे चांगले उत्पादन होईल अशी अपेक्षा येणकर यांना होती. पण व्हायरसच्या अटॅकमुळे येणकर यांचा चांगल्या उत्पादनाच्या स्वप्नाचा पुरता चुराडा झाला. पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटाच्या कात्रीत सापडला असल्याचे दिसून येते.
खरीप हंगामातील सोयाबीनचा दानाही अरजला नाही, करिता बीजोत्पादनासाठी म्हणून एक ऐकर उन्हाळी सोयाबीनची पेरणी केली, पण यावर व्हायरस चा प्रादुर्भाव झाल्याने हेही सोयाबीन गेले, आमच्या येथे तलाठी व कृषी सहाययक नेहमीच बदलत राहतात. यामुळे यांचा नंबरही मिळत नाही. यामुळे पिकांची माहिती देण्यास विलंब होतो. परिणामी पीक हातचे जात आहे. झालेल्या नुकसानाची तातडीने भरपाई देण्यात यावी.
वाल्मिक येणकर शेतकरी जामनी