वाहितपूर शाळेला लोकसहभागांतर्गत शेळी भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 12:46 AM2017-09-11T00:46:38+5:302017-09-11T00:46:56+5:30
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वाहितपूर येथे लोकसहभागाून वर्गखोली बांधकाम आणि इतर शालेय भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी कार्य सुरू आहे.
प्रफूल्ल लुंगे।
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वाहितपूर येथे लोकसहभागाून वर्गखोली बांधकाम आणि इतर शालेय भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी कार्य सुरू आहे. या कार्यात शाळेचा माजी विद्यार्थी रोशन क्षीरसागर यानेही खारीचा वाटा उचलला आहे. त्याने एक शेळीच शाळेला भेट दिली आहे. त्या शेळीचे नाव मुलांनी ‘कल्याणी’ ठेवले असून ही कल्याण या शाळेकरिता एटीएम ठरणार असल्याची गावात चर्चा आहे.
क्षीरसागर यांचा शेळीपालनाचा व्यवसाय आहे. शाळेला भेट म्हणून दिलेल्या शेळीचे पालनपोषण हा माजी विद्यार्थी स्वत:च्या घरी करीत आहे. या शेळीला वर्षातून दोन वेळा पिल्लांच्या माध्यमातून उत्पादन होणार आहे. ही पिल्लं मोठी झाल्यानंतर त्यांना विकून येणारे पैसे शाळेला देणार आहे. यातून शालेय सुविधा उपलब्ध करून घेणार असल्याचे मुख्याध्यापक देवेंद्र गाठे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. यामुळे ही कल्याणी नेहमीकरिता शाळेचे एटीएम म्हणून राहणार आहे.
शाळेला शेळी भेट देण्याच्या या अफलातून संकल्पनेबाबत खा. रामदास तडस व आ.डॉ. पंकज भोयर यांना माहिती दिली असता त्यांच्या हस्ते वर्गखोली लोकार्पण सोहळ्यात रोशनचा सत्कार करण्यात आला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्राणीमात्रांवर पे्रम करावे, त्यांच्याप्रती जिव्हाळा, आपूलही, दया, माया ठेवावी या बाबी शिकविता येणार आहे. शिवाय शेळीपालनातून उत्पादन, उद्योग व आर्थिक फायदा या बाबीही नकळत विद्यार्थी शिकत आहेत.
वर्षाकाठी शाळेला मिळणार १० हजार रुपयांचे उत्पन्न
या उपक्रमातून दरवर्षी १० हजार रुपये शाळेला मिळणार आहेत. एवढा लोकसहभाग नगदी स्वरुपात मिळत राहणार असल्याने त्याचा लाभ शाळेला होईल. एक गरीब विद्यार्थी मनाने श्रीमंत असल्याने आज आपल्याच गावातील लहान मुलांसाठी हातभार लावत आहे. ही कौतुकाची बाब आहे. लोकसहभागासाठी खुप पैशाची गरज नसते तर मनाचा मोठेपणा आवश्यक असल्याचे रोशन क्षीरसागर या मुलाने सिद्ध केले आहे.