अभ्यागतांची कामे तत्काळ होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 11:49 PM2018-01-29T23:49:06+5:302018-01-29T23:49:23+5:30
मुख्यमंत्र्यांच्या गतीमान महाराष्ट्राच्या संकल्पनेस अनुसरून पोलीस विभागासाठी व्हीसीटर मॅनेजमेंट सिस्टीम सुरू करण्यात आली आहे.
आॅनलाईन लोकमत
वर्धा : मुख्यमंत्र्यांच्या गतीमान महाराष्ट्राच्या संकल्पनेस अनुसरून पोलीस विभागासाठी व्हीसीटर मॅनेजमेंट सिस्टीम सुरू करण्यात आली आहे. ही सिस्टीम जिल्हा मुख्यालयाच्या शहरातील पोलीस ठाण्यात कार्यान्वित करण्याबाबत पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे आदेश होते. या आदेशानुसार वर्धा शहर ठाण्यात ही सिस्टीम जिल्हा पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांच्या मार्गदर्शनात कार्यान्वीत करण्यात आली.
सदर यंत्रणा सुरू करण्याचे मुख्य उदिष्ट हे पोलीस ठाण्यामध्ये आलेल्या अभ्यागतांचे काम कमीत कमी वेळात विनाविलंब पूर्ण होवून त्यांचे समाधान होणे, हे आहे. त्यामुळे पोलिसांची जनमानसातील प्रतिमा उंचावण्यास मदत होणार आहे. सदर यंत्रणेमध्ये पोलीस ठाण्यात आलेल्या सर्व अभ्यागतांची माहिती संगणकामध्ये संकलीत होणार आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण पोलीस ठाण्याच्या स्तरावर होवून त्यावर वरिष्ठ पातळीवरून लक्ष ठेवता येणार आहे.
वर्धा शहर, रामनगर, सेवाग्राम व सावंगी या शहरी भागातील पोलीस ठाण्यांमध्ये २९ जानेवारी २०१८ रोजी पासून व्हीसीटर मॅनेजमेंट सिस्टीम यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामध्ये पोलीस ठाण्यात येणाºया सर्व तक्रारदारांच्या तक्रारींच्या नोंदी सर्वप्रथम सिस्टीमला घेण्यात येवून त्यानंतर त्यांना संबंधित विभागाकडे किंवा तपासी अधिकारी, अंमलदाराकडे पाठविण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयातर्फे तसेच संबंधित पोलीस ठाणे प्रभारी यांच्या तर्फे सदर प्रणालीवर लक्ष ठेवून तक्रारीचे निरसन झाले याबाबत खात्री करता येणार आहे. वर्धेत झालेल्या कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी माधव पडीले, यांच्यास ठाणेदार चंद्रकांत मदने, आर.बी. मेंढे, विजय मगर, एस.बी. शेगावकर तसेच सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय देवरकर व सायबर सेलचे कुलदीप टांकसाळे, निलेश कट्टोजवार, दिनेश बोथकर, अक्षय राऊत, अभिजित वाघमारे हे उपस्थित होते.