जिल्ह्यात सर्वत्र विठूनामाचा गजर...
By Admin | Published: July 16, 2016 02:19 AM2016-07-16T02:19:53+5:302016-07-16T02:19:53+5:30
जनी म्हणे नामदेवासी, चला जाऊ पंढरीसी... हा अभंग जनाबाईची पांढरपूरला जाण्याची तळमळ अत्यंत कमी शब्दात व्यक्त करतो.
वर्धा विठ्ठलमय : पीक पाणी व समृद्धीसाठी विठूरायाला भक्तांचे साकडे
वर्धा : जनी म्हणे नामदेवासी, चला जाऊ पंढरीसी... हा अभंग जनाबाईची पांढरपूरला जाण्याची तळमळ अत्यंत कमी शब्दात व्यक्त करतो. अवघा महाराष्ट्र आषाढी एकादशीला शुक्रवारी पंढरीच्या विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी चंद्रभागेच्या तिरी एकवटो. पण प्रत्येकालाच पंढरपूरला जाणे शक्य होतेच असे नाही. विठ्ठलाच्या दर्शनाची आस तर सर्वांनाच आहे. जिल्ह्यातील सर्वच विठ्ठल मंदिरे विठूनामाच्या गजरात न्हाऊन निघाली होती. अवघी वर्धानगरीच विठ्ठलमय झाल्याचे चित्र आज होते. पीक पाणी चांगले होऊ दे हेच साकडे अंतरमनातून प्रत्येकजण घालत होता.
विठ्ठल हे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो वारकरी पायी दिंडीने पंढरपूरला दर्शनाला जातात. आषाढी एकादशीच्या आसपासच खरीपाची पेरणी होत असते. गत काही वर्षांत आषाढी एकादशी येऊनही पावसाचा पत्ता नव्हता. अवघ्या महाराष्ट्रावर दुष्काळी परिस्थितीची दाट सावली पसरली होती. चंद्रभागेचे पात्रही कोरडेठाक होते. भक्त विठ्ठलाला साकडे घालून थकल्यावर कुठे पावसाला सुरुवात झाली होती. पण निसर्गाने साथ न दिल्याने गेली दोन ते तीन वर्ष शेतकरी वर्गाला अत्यल्प उत्पादनातच समाधान मानावे लागले. यंदा मात्र आषाढी एकादशीच्या काही दिवसांअगोदरच राज्यभर पेरणीयोग्य पाऊस झाला. नदी नाले भरून वाहू लागले. विहिरींची पाणीपातळीही वाढली. त्यामुळे यंदा विठ्ठल पावला असे वारकरी बोलतात. या वर्षी पुढेही पावसाने साथ द्यावी, पिकांची वाढ चांगली व्हावी, त्यावर रोगराई पसरू नये, पाणीटंचाई भासू नये, शेतकऱ्यांची कोठारं धान्याने भरावी, अवघ्या देशात सुबत्ता यावी, कसल्याही गोष्टीची मानवाला कमतरता भासू नये असे साकडे भक्त विठूरायाला घालत असल्याचे दिसून आले.
गावागावांतील विठ्ठल मंदिरात भक्तांची सकाळपासूनच गर्दी झालेली दिसत होती. गावागावांमध्ये विठ्ठलनामाच्या गजरात हाती भगवी पताका घेऊन नामधून निघाली होती. वर्धा शहरातील बडे चौकातील विठ्ठल मंदिरात तर सकाळपासून भक्तांची रीघ लागली होती. वारकरी महिला मंडळातील महिलाही सकाळपासूनच हरिनामाच्या गजरात रंगून गेल्या होत्या.
प्रती पंढरीत उसळली भाविकांची गर्दी
घोराड - बोरतिरावर वसलेल्या व संताच्या वास्तव्याने तिर्थक्षेत्रच नव्हे तर प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोराड येथे आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासूनच गर्दी उसळली होती.
घोराड येथून पंढरपूरला दोन मार्गाने दोन दिंड्या पोहचल्या आहे. यात अनेक वारकरी सहभागी आहे. संत केजाजी महाराज यांनी १५० वर्षांअगोदर सुरू केलेल्या धार्मिक प्रथा व परंपरा घोराडचे नागरिक व त्यांच्या प्रती श्रद्धा असणारे असंख्य भाविक भक्तगण आजही चालवत आहेत.
४त्यामुळेच आज आषाढी एकादशीला पहाटेच्या वेळेस विठ्ठल रूख्माईची महापूजा सकाळी आरती व त्यानंतर दर पंधरवाडी एकादशीला निघणारी दिंडी नगर प्रदक्षिणा पूर्ण केली दुपारी मंदिरातून निघालेल्या टाळ मृदुंगाचा निनाद, भगव्या पताका घेवून परंपरेनुसार पंचक्रोशी प्रदक्षिणा पूर्ण करून सायंकाळच्या सुमारास मंदिर परिसरात पोहचली. या दिंडीत गावातील नागरिक, युवक, महिला व भाविक भक्तगणांनी सहभाग घेतला. सकाळपासून तर रात्रीपर्यंत भाविकांनी विठ्ठल रूख्मीणीचे दर्शन घेतले. यामुळे भाविकांची येथे गर्दी जमली होती.