व्हीजेएमच्या मावळ्यांनी सर केली दिल्ली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 11:05 PM2017-10-04T23:05:54+5:302017-10-04T23:06:03+5:30
स्वच्छता, वृक्षारोपण, आरोग्य जागृतीसाठी वैद्यकीय जनजागृती मंचच्या दोन सदस्यांनी सेवाग्राम ते राजघाट दिल्ली असा दुचाकी प्रवास केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : स्वच्छता, वृक्षारोपण, आरोग्य जागृतीसाठी वैद्यकीय जनजागृती मंचच्या दोन सदस्यांनी सेवाग्राम ते राजघाट दिल्ली असा दुचाकी प्रवास केला. व्हीजेएमच्या या मावळ्यांनी गांधी जयंतीदिनी दिल्ली सर करीत स्वच्छतेचा संदेश दिला. त्यांचा बुधवारी व्हीजेएम धाम हनुमान टेकडी येथे सकाळी ७.३० वाजता शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
१५ सप्टेंबर रोजी अरविंद लोहे व संजय लबडे यांनी व्हीजेएम धाम व सेवाग्राम आश्रमात महात्म्याला नमन करून यात्रेस प्रारंभ केला होता. स्वच्छता व वृक्षारोपण हा संदेश घेऊन त्यांनी १४२० किमी प्रवास केला. वाटेत पोलीस ठाणे, मुख्य चौक, शाळेत, ग्रामपंचायत आदी ठिकाणी स्वच्छता केली. डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू आजार कशाने होते, त्यावर उपाययोजना काय याबाबत पत्रके वाटली. प्रत्येक विश्रामाच्या ठिकाणी एक झाड लावून संगोपनाची जबाबदारी स्थानिकांना दिली. कुठे उत्साहात स्वागत, कुठे सकारात्मक प्रतिसाद तर काही ठिकाणी अतिथी म्हणून मनोगत व्यक्त करायला व्यासपीठ मिळाले.
प्रवासात बरेच बरेवाईट अनुभव घेत या मावळ्यांनी २ आॅक्टोबर रोजी दिल्ली सर केली. राजघाट येथे महात्मा गांधींना आदरांजली वाहून प्रवासाचा शेवट केला. त्यांच्या संकल्पपूर्तीचा अनुभव अभिमानस्पद असून हनुमान टेकडी येथे बुधवारी सकाळी ७.३० वाजता त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकारी व सदस्य तथा मान्यवरांनी दोन्ही मावळ्यांचे कौतुक केले.