‘व्हीजेएम’च्या जलसंधारण कार्याची जलशक्ती मंत्रालयाकडून दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 12:33 PM2019-11-27T12:33:14+5:302019-11-27T12:34:28+5:30

नागरिकांच्या सुदृढ आरोग्याकरिता झटणाऱ्या वर्ध्यातील डॉक्टरांच्या यंग ब्रिगेडने पाणी आणि निसर्गाच्या संवर्धनाकरिता पुढाकार घेत वैद्यकीय जनजागृती मंचाची (व्हीजेएम) स्थापना केली.

VJM's water conservation work is being handled by the Ministry of Water Power | ‘व्हीजेएम’च्या जलसंधारण कार्याची जलशक्ती मंत्रालयाकडून दखल

‘व्हीजेएम’च्या जलसंधारण कार्याची जलशक्ती मंत्रालयाकडून दखल

Next
ठळक मुद्देपाणी बचतीकरिता योगदान गजेंद्रसिंग शेखावत यांच्या ट्विटरवरून कौतुकाची थाप

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नागरिकांच्या सुदृढ आरोग्याकरिता झटणाऱ्या वर्ध्यातील डॉक्टरांच्या यंग ब्रिगेडने पाणी आणि निसर्गाच्या संवर्धनाकरिता पुढाकार घेत वैद्यकीय जनजागृती मंचाची (व्हीजेएम) स्थापना केली. अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांच्या नेतृत्वात या मंचाने मागील पाच वर्षांपासून जलसंवर्धनाकरिता मोठे योगदान दिल्याने याची दखल जलशक्ती मंत्रालयाकडून घेण्यात आली आहे. जलशक्ती मंत्रालयाचे मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी ट्विटरद्वारे या उपक्रमाचे कौतुकही केले आहे.
वर्ध्यातील वैद्यकीय जनजागृती मंचच्यावतीने मागील पाच वर्षांपासून जन व जल जागृतीचे काम हाती घेतले आहे. आरोग्यासह निसर्ग संवर्धनाकरिता एक चळवळ उभी करून ती व्यापक करण्याच्या दृष्टीने श्रमदान व द्रव्यदानही केले जात आहे. मागील तीन वर्षांपासून सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी होऊन सहभागी गावांना मदत करून प्रोत्साहन देण्याचे कार्यही मंचच्यावतीने केले जात आहे. विशेषत: दिवसेंदिवस निर्माण होणारी पाण्याची भीषणता लक्षात घेऊन ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ यानुसार एक सयंत्र तयार केले आहे. या सयंत्राद्वारे घराच्या छतावर पडणारे पाणी सरळ वाहून न जाता ते विहीर व बोअरवेलच्या सहाय्याने जमिनीत मुरविले जात आहे. यामुळे भूगर्भातील पाणीपातळी वाढण्यासाठी मोठा फायदा होत असल्याने या सयंत्राची महाराष्ट्रासह महाराष्ट्राबाहेरही मागणी वाढली आहे. वैद्यकीय जनजागृती मंचने जलसंवर्धनाकरिता केलेल्या कार्याची जलशक्ती मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी दखल घेत प्रत्यक्ष भेटीत डॉ. सचिन पावडे यांच्याकडून या कार्याबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांचीही उपस्थिती होती. जलसंधारणाचे हे कार्य पुढे चालू ठेवण्याकरिता आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासनही केंद्रीय मंत्री शेखावत यांनी दिले.

लाखो लिटर पाण्याची झाली बचत
वैद्यकीय जनजागृती मंचच्यावतीने पाणी बचतीकरिता तयार केलेल्या सयंत्राची मागणी मोठ्या प्रमाणात असून आतापर्यंत १ हजार २०० सयंत्रांची विक्री करण्यात आली आहे. एका संयत्रापासून वर्षाकाठी छतावरील १ लाख लिटर पाणी विहीर किंवा बोअरवेलच्या माध्यमातून भूगर्भात मुरविल्या जात आहे. त्यामुळे पाण्याची पातळी वाहून दुष्काळावर मात करण्यासाठी महत्त्वाचे ठरत आहे.
मंचच्यावतीने पावसाळ्यात आरोग्य जनजागृती तर उन्हाळ्याच्या दिवसात जलजागृती मोहीम जिल्हाभरात राबविली जाते. मंचचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे व त्यांचे सहकार्य आपल्या वैद्यकीय व्यवसायातून वेळ काढून जलसंधारणासाठी झटत आहे.
वर्ध्यासह विदर्भातील सर्वच जिल्ह्यात पाणी बचतीकरिता जनजागृती केली जात आहे. यासोबतच नागरिकांच्या मागणीनुसार महाराष्ट्रभर पाण्याच्या सयंत्राबाबत प्रेझेंटेशन केले जात आहे.‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर हे सयंत्र उपलब्ध होत असल्याने या सयंत्राची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.

वैद्यकीय जनजागृती मंचच्यावतीने मागील पाच वर्षांपासून सुरू केलेल्या जलसंधारणाच्या कार्याची जलशक्ती मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी ट्विटर हॅण्डलवर माहिती देत कौतुक केले. यामुळे वैद्यकीय जनजागृती मंचाला आणखी जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाली. खासदार रामदास तडस यांच्यामुळे ना. शेखावत यांच्यासोबतच चर्चा करण्याची संधी मिळाली.
- डॉ. सचिन पावडे, अध्यक्ष वैद्यकीय जनजागृती मंच, वर्धा

Web Title: VJM's water conservation work is being handled by the Ministry of Water Power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.