वन्यप्राण्यांना बसणार ‘आवाजाचा’ चाप
By admin | Published: March 27, 2017 01:08 AM2017-03-27T01:08:09+5:302017-03-27T01:08:09+5:30
शेतकरी कायम संकटांनी घेरलेला असतो. कधी नैसर्गिक आपत्ती तर कधी वन्यप्राण्यांचा उपद्रव होतो.
बा.दे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा अनोखा प्रयोग : सौर उर्जेवरील कुंपण आणि ध्वनी लहरी विस्करण यंत्र
वर्धा : शेतकरी कायम संकटांनी घेरलेला असतो. कधी नैसर्गिक आपत्ती तर कधी वन्यप्राण्यांचा उपद्रव होतो. वन्यप्राण्यांच्या त्रासातून शेतकऱ्यांची मुक्ती व्हावी म्हणून बा.दे. अभियांत्रिकी महा.च्या इलेक्ट्रॉनिक शाखेतील विद्यार्थ्यांनी एक यंत्र विकसित केले आहे. सौर उर्जा वापरून ‘सौर ऊर्जा कुंपण’ व ‘ध्वनी लहरी विस्करण’ असे यंत्राचे नाव आहे. यातील ध्वनी कंपनामुळे वन्य प्राणी, पक्षी शेतातील पिकांकडे फिरकणार नाही, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.
वन्यप्राणी, पक्षी शेतात येऊ नये, म्हणून शेतकरी विविध उपाय करतात. बुजगावणे उभे करणे, शेताच्या धुऱ्याला विविध रंगांचे कापड लावणे आदी केले जाते; पण वन्यप्राण्यांच्या त्रासापासून सुटका होत नाही. याचा अभ्यास करून वन्यप्राण्यांना आळा बसावा सेवाग्राम येथील बा.दे. अभियांत्रिकी महा.च्या इलेक्ट्रॉनिक्स विभागातील निलेश ठाकरे, स्वप्नील कुरेकर, श्रुती पुण्यप्रेड्डीवार, सरिता कुमारी या विद्यार्थ्यांनी सौर उर्जेचा वापर करून सौर ऊर्जा कुंपण व ध्वनी लहरी विस्करण यंत्र विकसित केले.
वन्यप्राण्यांच्या उपद्रवाने रात्रीतून पीक नष्ट होते. यावर उपाय करण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांशी चर्चा करून अभ्यास सुरू केला. वन्यप्राणी व पक्ष्यांना इजा होणार नाही व ते शेतात येणार नाही, असे ध्वनीकंपन यंत्र विकसित करण्याचे ठरले. विविध बाबींचा अभ्यास करून आवाजाची तिव्रता लक्षात घेतल्याचे मार्गदर्शक प्रा. निखील बोबडे यांनी सांगितले.
एक एकर परिसर या यंत्राच्या अधिपत्यात येणार आहे. शेताच्या मध्यभागी हे यंत्र लावले येईल. सौरऊर्जेचा उपयोग केल्याने विजेची बचत होईल. रात्री ७ ते ८ तास चालेल एवढा बॅटरी बॅकअप राहणार असून यंत्रातून निघणाऱ्या अल्ट्रा साऊंडमुळे कोणताही प्राणी शेतात फिरकू शकणार नाही. ध्वनीकंपनाने एखादा प्राणी जुमानला नाही आणि शेतापर्यंत पोहोचलाच तर कुंपणाला स्पर्श होताच दूर फेकला जाईल. यासाठी ४ हजार वॅटचा डिसी सप्लाय देण्यात आला आहे. यामुळे प्राण्यांना इजा होणार नाही. केवळ प्राणी दूर होईल, अशी व्यवस्था यंत्रामध्ये करण्यात आली आहे. यातून प्राण्यांचे रक्षण ही बाबही लक्षात घेण्यात आली आहे. कुंपण तोडण्याचा प्रयत्न केल्यास सायरण तर वजेलच; पण याबाबत संदेश शेत मालकाला भ्रमणध्वनीवर मिळेल. यासाठी जीआरपीएस सिस्टम वापरले आहे. शेतकऱ्यांसाठी लाभदायक असे या यंत्राचे प्रात्यक्षिक शेतात घेण्यात आले असून ते यशस्वी झाल्याचे निलेश ठाकरे याने सांगितले.
संचालक समीर देशमुख, प्राचार्य डॉ. गायकवाड यांनी विद्यार्थ्यांनी निर्मित केलेल्या शेतीपयोगी यंत्राचे कौतुक करीत तंत्रज्ञान तळागाळापर्यंत पोहोचवून शेतीक्षेत्र प्रगत करण्याचा चांगला प्रयत्न असल्याचे सांगितले. यात विभागप्रमुख डॉ. दांडेकर, डॉ. इंगळे, प्रा. वझुरकर यांनी सहकार्य केले.(कार्यालय प्रतिनिधी)
२० किलो हर्टस् आवाजाने व्यक्ती होतो अस्वस्थ
साधारणत: २० किलो हर्टस आवाजाने व्यक्ती बैचेन होतो. त्याला अस्वस्थता वाटू लागते आणि तो आवाज कधी बंद होतो, असे वाटायला लागले. प्राण्यांची आवाजाची क्षमता माणसांपेक्षा अधिक दिसून आली. माकड ५० किलो हर्टस, ससा ४२, रानडुक्कर ५०, गाय ३५, शेळी ३० फुलपाखरू ६ तर पक्षी ७.५ हर्टस आवाजाने दूर पळत असल्याचे निदर्शनास आले. याच आधारावर हे ध्वनीकंपन यंत्र विकसित करण्यासत आले आहे. या यंत्रामध्ये सायरन लावण्यात आले असून बॅटरी आणि सौरऊर्जा यंत्र बसविण्यात आले आहे. हे यंत्र रात्री सात ते आठ तास चालू शकेल एवढा बॅटरी बॅकअप देण्यात आला आहे. सुरगावचे शेतकरी राजेंद्र वानखेडे यांनी हे यंत्र उपयोगी असून निश्चितपणे याचा फायदा होईल, असे सांगितले.