पक्षांतर करणाऱ्यांना मतदारांनी लाथाडले पाहिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 03:59 PM2019-07-31T15:59:50+5:302019-07-31T16:00:58+5:30
सत्तेच्या लालसेपोटी पक्ष बदलविणाऱ्यांना मतदारांनी लाथाडले पाहिजे, अशी बोचरी टीका आमदार बच्चू कडू यांनी वर्धा येथे केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : निवडणुका तोंडावर येताच अनेक नेते पक्ष बदलवितात. इतकेच नव्हे, तर ते सत्ता भोगण्यासाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातात. हे लोक संधिसाधू असून त्यांना मतदारांनीच धडा शिकवायला हवा. सत्तेच्या लालसेपोटी पक्ष बदलविणाऱ्यांना मतदारांनी लाथाडले पाहिजे, अशी बोचरी टीका आमदार बच्चू कडू यांनी वर्धा येथे केली.
प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी राज्यव्यापी जेलभरो आंदोलन करण्यात आले. वर्ध्यात आंदोलनाचे नेतृत्व आ. बच्चू कडू, प्रहारचे जिल्हा प्रमुख विकास दांडगे यांनी केले. यावेळी त्यांनी सत्तेसाठी पक्ष बदलविणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांवर ही बोचरी टीका केली.
प्रहार मागील १५ वर्षांपासून विविध प्रश्न घेऊन संघर्ष करीत आहे. आम्ही ज्या उद्देशासाठी एकत्रित आलो, त्या उद्देशाला कधीही विकेंद्रित होऊ दिले नाही. सत्तेच्या हव्यासापोटी ज्या कुठल्या पक्षाचे राजकीय पुढारी पक्ष बदलवितात, अशा दलबदलूंना निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदारांनी लाथाडले पाहिजे. राधाकृष्ण विखे पाटील हे पाच वर्षे विरोधी पक्ष नेते राहिले; पण काँग्रेसचा विरोधी पक्ष नेताच भाजपात जात आहे. त्यामुळे काँग्रेस मोडून टाकायला हवी आणि राहुल गांधी यांच्यासह सर्व काँग्रेसच्या नेत्यांनी स्वत:ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपात सामावून घ्यायला पाहिजे, म्हणजे दुसरा राजकीय पक्षच शिल्लक राहणार नाही. आता आम्ही ठरवतोय की पक्षाचे झेंडेच शेतात पेरावे लागेल. कारण शेतात पीक पिकविल्याने शेतकऱ्यांना काही मिळत नाही. एकूणच शेतात पक्षाचे झेंडे पेरून त्यातच समाधानी राहावे लागेल, अशी आजची अवस्था असल्याचेही यावेळी आ. बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.
जनादेश यात्रेमुळे पैशाची उधळवपट्टी होईल
जनादेश आहे की ईव्हीएम, हे पहिले तपासले पाहिजे. यात्रेपेक्षा लोकांचे शेतकऱ्यांचे काही समाधान होईल याकडे लक्ष दिले गेले पाहिजे. महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात पैशाची उधळपट्टीच होणार आहे. आचार संहितेमध्ये ज्या अडचणी येतात, त्या आताच पूर्ण केल्या जाऊन नागरिकांचे लक्ष वेधण्याचे काम या निमित्ताने केले जाणार आहे. सध्या शेतकरी आत्महत्या करीत आहे. इकडे आमदारांची मेगा भरती सुरू आहे. परंतु, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांवर तलवार चालविली जात आहे, असल्याचे यावेळी आ. बच्चू कडू यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी भाजप सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कर्जमाफीचा खरपूस समाचार घेतला.