मतदान आटोपले, आज लागणार निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2022 10:05 PM2022-10-16T22:05:55+5:302022-10-16T22:06:30+5:30
मतदानापूर्वीच अहिरवाडा येथील सात, तर पिंपरी येथील एका सदस्याची बिनविरोध निवड झाली आहे. रविवारी सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली असून, सकाळी मतदानाची टक्केवारी फारच कमी होती. दुपारनंतर मतदानाची गती वाढली व सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ७८.२७ टक्के मतदान पूर्ण झाले. आता निकालाकडे लक्ष लागले असून, कोणाचे भाग्य उजळणार हे लवकरच कळणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील आर्वी आणि वर्धा तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींसाठी रविवारी सकाळपासून मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळपासून सायंकाळपर्यंत शांततेत मतदान झाले असून, ७८.२७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या ग्रामपंचायतीतील सरपंच व सदस्यांचे भाग्य ईव्हीएम बंद झाले असून, सोमवारी मत मोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे.
वर्धा तालुक्यातील सालोड (हिरपूर), बोरगाव (ना.), आर्वी तालुक्यातील मांडला, जाम, सर्कसपूर, अहिरवाडा, हैबतपूर (पु.), मिर्झापूर (नेरी) व पिपरी भुतडा पुनर्वसन या ९ ग्रामपंचायतीकरिता निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. या सर्व ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदाकरिता २७ उमेदवार रिंगणात आहे. सालोड येथे सरपंच पदाकरिता ५, तर सदस्य पदांकरिता ५०, नांदोरा येथे सरपंच पदाकरिता २, तर सदस्य पदांकरिता १४, सर्कसपूर येथे सरपंच पदाकरिता ३, तर सदस्य पदांकरिता १४, मांडला येथे सरपंच पदाकरिता ५, तर सदस्य पदाकरिता १७, अहिरवाडा येथे सरपंच पदाकरिता २, हैबतपूर (पु.) येथे सरपंच पदाकरिता ३, सदस्य पदांकरिता १४, जाम (पु.) सरपंच पदाकरिता ३, सदस्य पदांकरिता १४, पिपरी (पु.) सरपंच पदाकरिता २, तर १३ सदस्य पदांकरिता, मिर्झापूर (ने.) येथे सरपंच पदाकरिता २ उमदेवार, तर सदस्यांकरिता १४ उमेदवार रिंगणात आहेत. मतदानापूर्वीच अहिरवाडा येथील सात, तर पिंपरी येथील एका सदस्याची बिनविरोध निवड झाली आहे. रविवारी सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली असून, सकाळी मतदानाची टक्केवारी फारच कमी होती. दुपारनंतर मतदानाची गती वाढली व सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ७८.२७ टक्के मतदान पूर्ण झाले. आता निकालाकडे लक्ष लागले असून, कोणाचे भाग्य उजळणार हे लवकरच कळणार आहे.
मतदान केद्रांवर पोलिसांचा बंदोबस्त
- ३३ मतदान केंद्रांवरून मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. या ग्रामपंचायतींमध्ये १० हजार ८१९ मतदार संख्या होती. त्यातील ८ हजार ४६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या सर्व केंद्रांवर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडावी याकरिता पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. याकरिता अधिकाऱ्यांचेही भरारी पथक तयार करण्यात आले होते. या पथकानेही सतत मतदान केंद्राला भेटी देऊन आढावा घेतला. त्यामुळे ३३ मतदान केंद्रावर शांततेत मतदान झाले.
तहसील कार्यालयात होणार आज मतमोजनी
- जिल्ह्यातील वर्धा तालुक्यातील दोन तर आर्वी तालुक्यातील सात ग्रामपंचायतीकरिता रविवारी मतमोजणी आटोपली असून आता सोमवारी सकाळी दोन्ही तालुक्यातील तहसील कार्यालयामध्ये सकाळी १० वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सोमवारी तहसील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पहावयास मिळणार आहे.