विज्युक्टाच्या निवडणुकीत मतदानावरून शिक्षकांत वाद

By Admin | Published: March 27, 2017 01:05 AM2017-03-27T01:05:11+5:302017-03-27T01:05:11+5:30

जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयात शिकविणाऱ्या शिक्षकांची संघटना म्हणून विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर असोसिएशन विदर्भात कार्यरत आहे.

Voting in Vijucta election by the teachers | विज्युक्टाच्या निवडणुकीत मतदानावरून शिक्षकांत वाद

विज्युक्टाच्या निवडणुकीत मतदानावरून शिक्षकांत वाद

googlenewsNext

फेरनिवडणुकीची मागणी : मतदार याद्या नाही
वर्धा : जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयात शिकविणाऱ्या शिक्षकांची संघटना म्हणून विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर असोसिएशन विदर्भात कार्यरत आहे. या संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणीची सभा व निवडणूक रविवारी येथील न्यू इंग्लिश हायस्कूलच्या सभागृहात सुरू होती. सभेनंतर निवडणुकीला प्रारंभ होताच ही निवडणूक नियमांना अनुसरून नसल्याचा आरोप करीत काही शिक्षकांनी निवडणूक प्रक्रिया बंद पाडली. या काळात काही शिक्षकांनी मतपेटी घेत पळ काढल्याचा आरोपही सभागृहात असलेल्या शिक्षकांकडून करण्यात आला. ही निवडणूक लोकशाही पद्धतीने नाही तर हुकूमशाही पद्धतीने होत असल्याचा आरोप करीत ती पुन्हा घेण्याची माणगी संघटनेतील शिक्षकांच्या एका गटाने केली. तर दुसऱ्या गटाने होत असलेली निवडणूक नियमाला धरून असल्याचा पाढा वाचला. या आरोप प्रत्यारोपाच्या फैरीने या निवडणुकीत मतदानावरून चक्क शिक्षकांतच वाद झाल्याने एकमेकांवर आरोपाच्या फैरी झडत असल्याचे चित्र मतदान केंद्र परिसरात दिसून आले.

सभा व निवडणूक एकाचवेळी
वर्धा : जिल्हाभर पसरलेल्या विज्युक्टा संघटनेचा नवा जिल्हाध्यक्ष, दोन उपाध्यक्ष, सचिव, सहायक सचिव, कोषाध्यक्ष या पदाकरिता ही निवडणूक होणार होती. शिवाय आयोजित असलेल्या सभेत विविध विषयांवर चर्चा होणार होती. चर्चेअंती सुरू झालेल्या निवडणुकीदरम्यान काहींनी निवडणूक कक्षात काही ठराविक उमेदवारांना मतदान करण्याकरिता एक पत्र तयार करून ते सभासदांना देण्याचा प्रयत्न काही शिक्षकांनी केल्याचा आरोप केला. शिवाय निवडणूक व सभेची सूचना देण्याकरिता काढण्यात आलेल्या पत्रावर अध्यक्षाची स्वाक्षरी नाही, मतदार यादी नाही, कोणीही या कोणीही आणि मतदान करा, असा प्रकार येथे सुरू असल्याचा आरोप करीत निवडणुकीवर आक्षेप घेण्यात आला. निवडणूक प्रकीया ही नियमांना धरून नसल्याने आजही निवडणूक रद्द करून ती पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी एका गटाने केली. तर सभागृहात असलेल्या गटाने होत असलेली प्रक्रिया योग्य असल्याचे म्हणत निवडणुकीचा निर्णय लवकरच जाहीर होणार असल्याचे सांगितले. यामुळे विज्युक्टाच्या निवडणुकीत होत असलेला हा प्रकार चर्चेचा विषय ठरला होता.(प्रतिनिधी)

संघटनेच्या अध्यक्षांची चुप्पी
या निवडणुकीत होत असलेल्या घोळाच्या आरोपाबाबत कार्यरत अध्यक्ष प्रा. डॉ. नारायण निकम यांनी ‘नो कमेंट’ असा सूर आळवत चुप्पी साधली. शिवाय सूचनेवर त्यांची स्वाक्षरी नसल्याचा खुलासाही त्यांनी केला नाही. यामुळे होत असलेले आरोप योग्य आहेत अथवा अयोग्य याचा उलगडा होवू शकला नाही.

विज्युक्टा संघटनेच्या जिल्हा कार्यकारीणीकरिता होत असलेली निवडणूक नियमांचे उलंघन करून होणारी आहे. येथे नियमानुसार सूचना काढण्यात आली नाही, मतदार याद्या नाही, मतदान कक्षाजवळ काही उमेदवाराकडून प्रचार सुरू होता. यामुळे होत असलेली निवडणूक लोकशाही पद्धतीने नसून हुकूमशाही पद्धतीने होत आहे. यामुळे आजची प्रक्रिया रद्द करून ही निवडणूक पुन्हा घेण्यात यावी, अशी मागणी आहे.
- मोहन गुजरकर, सदस्य, विज्युक्टा, वर्धा.

निवडणूक नियमानुसार आहे. यात कुठलीही गडबड नाही. या निवडणुकीत ज्युनिअर कॉलेजच्या सर्वच शिक्षकांना मतदान करण्याचा अधिकार आहे, तसे घटनेत नमूद आहे. याकरिता ठराविक मतदार यादी नाही. होत असलेल्या निवडणुकीसंदर्भात सर्वच सभासदांना नोटीसी बजावण्यात आल्या आहेत. त्यानुसार त्यांनी सहभागी होत मतदान केले आहे. शिवाय होणाऱ्या निवडणुकीची माहिती पोलीस विभागालाही देण्यात आली आहे. मात्र काहींनी मतपेट्या घेवून पळ काढल्याने अडचण निर्माण झाली.
- प्रा. संतोष अंधारे, निवडणूक निर्णय अधिकारी, विज्युक्टा.

Web Title: Voting in Vijucta election by the teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.