वर्धेतील सेवाव्रती संस्था, व्यक्तींचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 10:22 PM2018-05-14T22:22:42+5:302018-05-14T22:22:42+5:30
मेधावी भारत २०१८ युवा महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात वर्धेतील सेवाव्रती व संस्था यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला आ.डॉ. पंकज भोयर, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे, उद्योजक जगदीश मिहानी, हिंगणघाट येथील नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रविकांत बालपांडे, कार्यक्रमाचे आयोजक अविनाश देव, सचिन अग्निहोत्री आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मेधावी भारत २०१८ युवा महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात वर्धेतील सेवाव्रती व संस्था यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला आ.डॉ. पंकज भोयर, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे, उद्योजक जगदीश मिहानी, हिंगणघाट येथील नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रविकांत बालपांडे, कार्यक्रमाचे आयोजक अविनाश देव, सचिन अग्निहोत्री आदी उपस्थित होते.
याप्रसंगी वैद्यकीय जनजागृती मंचचे डॉ. सचिन पावडे, जिव्हाळा संस्थेचे अतुल पाळेकर, जय पवनसुत ट्रस्टचे अध्यक्ष रविकांत बालपांडे, जनहित मंचचे सतीश बावसे, स्वामी मुक्तानंद योगा संस्थेचे डॉ. विनोद आगलेकर व ज्येष्ठ पत्रकार प्रशांत देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला मार्गदर्शक व विशेष अतिथी म्हणून पुणे येथील डॉ. अविनाश धर्माधिकारी उपस्थित होते.
यावेळी ‘स्पर्धा परीक्षेचा पासवर्ड’ या विषयावर मार्गदर्शन करताना धर्माधिकारी म्हणाले की, पहिले आपल्या आनंदाचे क्षेत्र निवडता आले पाहिजे. त्यानुसार आपण संकल्प सोडून तो सिद्धीस नेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. या कामासाठी ध्यास घेतला पाहिजे. त्यासाठी परिश्रम करण्याची तयारी हवी. विद्यार्थ्यांनीही बारावी उत्तीर्ण झाल्यावर आपण नेमके कुठे जावून शिक्षण घेतले पाहिजे, या विषयी निश्चिती करण्याची गरज आहे. बारावीनंतर वैद्यकीय शाखेकडे जावून नुसते जमणार नाही तर आता त्यात पदव्यूत्तर शिक्षण घेणे आवश्यक आहे. एमबीबीएसनंतर एका कोणत्या तरी विषयात आपल्याला विशेषतज्ज्ञ बनावे लागेल. हीच परिस्थिती अभियांत्रिकी शाखेची झाली आहे. यात आपण कुठल्या फॅकल्टीकडे वळणार आहोत, त्याला सध्या किती महत्त्व आहे, या सर्व गोष्टी जाणून घ्याव्या लागेल. आपल्याला इतरांप्रती सद्भाव व्यक्त करणारी प्रतिज्ञाही करावी लागणार आहे. तेव्हाच स्वत:बद्दल चांगला भाव निर्माण झाल्याची अनुभूती घेता येणार आहे. काही लोकांना त्यावेळी परिस्थितीमुळे शिक्षण घेता आले नाही. यामुळे आपल्याला या दृष्टीने आता प्रयत्न ठेवावे लागतील, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
२२०० लोकांना मिळाला रोजगार
सारथी बहुउद्देशीय संस्था वर्धेच्यावतीने तीन दिवसीय मेधावी भारत युवा महोत्सव हा कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला. यात ४ हजार ८०० उमेदवारांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी २ हजार २०० उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला, अशी माहिती आयोजक अविनाश देव यांनी समारोप कार्यक्रमात दिली. पूढील वर्षी असा महोत्सव ११, १२ व १३ जानेवारी या कालावधीत विवेकानंद जयंतीचा मुहूर्त साधून आयोजित केला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.