वीटभट्टीकरिता वर्धेतील माती नागपुरात
By Admin | Published: March 16, 2016 08:38 AM2016-03-16T08:38:14+5:302016-03-16T08:38:14+5:30
वीटभट्टीकरिता तालुक्यातील एका शेतातून अवैधरीत्या नागपूर येथील विटभट्टीमालक माती नेत असल्याची माहिती
रूपेश मस्के ल्ल कारंजा (घा.)
वीटभट्टीकरिता तालुक्यातील एका शेतातून अवैधरीत्या नागपूर येथील विटभट्टीमालक माती नेत असल्याची माहिती ‘लोकमत’ला मिळाली. यावरून ‘लोकमत’ने घटनास्थळ गाठून त्यांना विचारणा केली असता या ट्रॅक्टरमधील माती तिथेच टाकून ट्रॅक्टर चालकांनी पळ काढल्याने चांगलीच खळबळ उडाली. याची माहिती येथील महसूल विभागाला दिली तरी त्यांच्याकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. यामुळे या माती चोरीला त्यांची मूकसंमती तर नाही ना, असा प्रश्न समोर येत आहे.
कारंजा तालुक्यातील बोरी फाट्याजवळ असलेल्या दहा एकर शेतातून मोठ्या प्रमाणात मातीचे उत्खनन सुरू आहे. विटभट्टी मालकांनी केवळ या एका शेतातूनच नव्हे तर त्याच्या लगत असलेल्या दुसऱ्या शेतातूनही माती खोदून नेण्याचा सपाटा सुरू केला आहे. माती नेणारे तालुक्यातील वीटभट्टी मालक असल्याची चर्चा आहे. नागपूर येथील एक वीटभट्टीमालक मोठ्या प्रमाणात माती चोरी करीत असल्याचे समोर आले आहे. हा भट्टीमालक दिवसा सर्वांसमक्ष अत्यल्प तर रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात मातीचा उपसा करीत आहे. यामुळे त्याच्याकडे रॉयल्टी आहे अथवा नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या शेतमालकाने त्याच्या शेतातील माती नागपूर येथील वीटभट्टी मालकाला विकल्याचे सांगण्यात आले. असे असले तरी मातीचे उत्खनन करून त्याची वाहतूक करण्याकरिता रॉयल्टी आवश्यक आहे. तशी कुठलीही रॉयल्टी या शेतकऱ्याच्या वा नागपूर येथील कुण्या व्यापाऱ्याच्या नावे देण्यात आली नसल्याचे तहसील विभागाकडून सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यातीलच नव्हे तर नागपूर येथील वीट व्यावसायिकाला ट्रॅक्टरव्दारे सर्रासपणे मातीचे उत्खनन करण्याची छुपी मुभा येथील महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्याचे गावात बोलले जात आहे. मातीची उचल करण्याकरिता कुठलीही परवानगी दिली गेली नसताना जेसीबीने व ट्रॅक्टरच्या साह्याने माती नेली जाते. याची माहिती महसूल विभागाला देण्यात आली असताना त्यांच्याकडून संबंधितांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. यामुळे यात तालुक्याचा महसूल विभागही सामील असल्याचे बोलले जात आहे.
४नागपूर व वर्धा जिल्ह्याची मूर्ती व धर्ती हे गाव सिमेलगत आहे. याचा फायदा घेत येथील व्यावसायिक शक्कल लढवून नाममात्र काटोल तहसील कार्यालयाकडून परवाना घेऊन हजारो ब्रास मातीचे वर्धा जिल्ह्यातील बोरी येथून उत्खनन करीत असल्याचे दिसून आले आहे. यातून लाखोंच्या विटांचा व्यवसाय होत आहे. याची सखोल चौकशी केल्यास व घटनास्थळाचा तथा विटाभट्टीचा लेखाजोखा पाहिल्यास शासनाचा लाखोंचा महसूल बुडत असल्याचे उघड झाल्याशिवाय राहणार नाही. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत या अवैध उत्खननास आळा घालावा, अशी मागणी होत आहे.
शेतकऱ्याकडून मातीची खरेदी
४सदर शेत येथील शेतकरी अजाब लक्ष्मण धोटे यांच्यासह सहा जणांच्या मालकीचे आहे. सदर शेतीचा सर्व्हे क्रमांक ३८६ असून त्याची आराजी ३.७८ आहे. धोटे यांनी शेतातील माती या भट्टी मालकाला विकल्याचे बोलले जाते. हा व्यवहार झाला असला तरी मातीचे उत्खनन करण्यापूर्वी त्याची रॉयल्टी काढणे गरजेचे आहे. तशी कुठलीही रॉयल्टी तहसील कार्यालयातून देण्यात आली नाही. शिवाय उत्खननाकरिता शेती मायनिंग झोनमध्ये अनिवार्य आहे.
मायनिंग झोनशिवाय रॉयल्टी मिळणे अशक्य
४माती विक्रीचा व्यवहार हा तोंडी आहे. कुठेही तत्सम लेखी आदेश नाही. शिवाय मातीचे उत्खनन करण्याकरिता तो भाग मायनिंग झोनमध्ये असणे अनिवार्य आहे. त्याची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत होते. या शेताबाबत तशी कुठलीही घोषणा झाली नाही. शिवाय तहसील कार्यालयाकडून तसा प्रस्तावही पाठविण्यात आला नसल्याचे तहसील कार्यालयातील सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.
सध्या मी सारवाडी येथे पाणीटंचाईची पाहणी करण्याकरिता आलो आहे. या संदर्भात आता बोलण्यापेक्षा तुम्ही उद्या कार्यालयात या, काय ते सविस्तर बोलता येईल.
-एस.जे. मडावी, तहसीलदार, कारंजा (घाडगे)