गोवर अन् रुबेला निर्मूलनासाठी कसली कंबर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 11:40 PM2018-11-23T23:40:42+5:302018-11-23T23:42:41+5:30
गोवर हा संसर्गजन्य आजार असून मुलांमध्ये मृत्यू तसेच अपंगत्व आणणारा आहे. तर रुबेला या आजारामुळे जन्मत: व्यंग असलेली बालके जन्माला येतात. गोवर हा व्हायरसमुळे होणारा आजार असून संसर्गातून होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गोवर हा संसर्गजन्य आजार असून मुलांमध्ये मृत्यू तसेच अपंगत्व आणणारा आहे. तर रुबेला या आजारामुळे जन्मत: व्यंग असलेली बालके जन्माला येतात. गोवर हा व्हायरसमुळे होणारा आजार असून संसर्गातून होते. ज्या मुलांना लस मिळाली नसेल अशा रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ९० टक्के पेक्षा जास्त बालकांना हा आजार संसगार्तून होत असून या दोन्ही आजारांना हद्दपार करण्यासाठी सध्या आरोग्य यंत्रणेणे कंबर कसली आहे. मंगळवार २७ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून ९ ते १५ वर्ष वयोगटातील बालकांना प्रतिबंधात्मक लस देऊन ‘गोरव’ निर्मुलन आणि ‘रुबेला’वर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करणार आहे.
‘जर्मन मिझल’ म्हणजे रुबेला
रुबेला ज्याला जर्मन मिझल सुद्धा म्हटल्या जाते. हा सौम्य स्वरुपाचा आजार असला तरी गर्भवती मातेस हा आजार झाल्यास तिला व तिच्या बालकांमध्ये गंभीर स्वरुपाची गुंतागूंत याच्यामुळे होऊ शकते. गर्भवती मातेस पहिल्या तिमाहित हा आजार झाल्यास बालकामध्ये कंजेनायटल रुबेला सिंड्रोम हा भयंकर आजार होण्याची दाट शक्यता असते. या आजारात बालकामध्ये वेगवेगळ्या जन्मत:च व्यंग असतात. त्यामध्ये प्रामुख्याने हृदयाचे आजार तसेच बहिरेपणा आणि आंधळेपणा येऊ शकतो.
ही मोहीम २७ नोव्हेंबरपासून राबविण्यास सुरुवात केली जाणार आहे. ही मोहीम पाच आठवडे चालणार असून सुरुवातीचे दोन आठवडे प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना लस देण्यात येईल. तर त्यानंतर दोन आठवडे अंगणवाडी केंद्रातील मुला-मुलींना लस देण्यात येईल. तर पाचव्या आठवड्यात ज्यांना लस देण्यात आली नाही अशांचा शोध घेवून त्यांना लस देण्यात येणार आहे.
- अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी वर्धा.
आरोग्य विभागाच्यावतीने जिल्ह्यात २७ नोव्हेंबरपासून राबविण्यात येणाऱ्या विशेष लसीकरण मोहिमेला यशस्वी करण्यासाठी प्रत्येक अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचाºयांनी सहकार्य करावे.
- दिलीप उटाणे, राज्य कार्याध्यक्ष, म.रा.जि.प. आरोग्य सेवा कर्मचारी संघटना.
बदलती जीवनशैली ठरतेय धोक्याची
मनुष्य प्राचिन काळापासून निरोगी राहण्यासाठी प्रयत्नरत आहे. अगदी सुरुवातीला ऋषीमुनी आयुर्वेदाचे मदतीने मनुष्याचे जीवनमान उंचावण्यासाठी संशोधन करीत असत. आजच्या युगात वैद्यकीय शास्त्र खूप प्रगत झाले आहे. त्या माध्यमातून मनुष्याचे जीवन निरोगी ठेवण्याचे आव्हान स्विकारत आहे. तरीही वातावरणातील सुक्ष्मजीव, वातावरणातील बदल, मनुष्याची बदलेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव यामुळे मनुष्य आजारपणातून मुक्त होऊ शकला नसल्याचे तज्ज्ञ सांगतात.
गोवर आणि रेबेला आजाराविषयी थोडक्यात
गोवर हा माहीत असलेल्या आजारापैकी सर्वात जास्त संसर्गजन्य आजार आहे.
मुलांमध्ये मृत्यू तसेच अपंगत्व आणणारा आजार आहे.
रुबेला या आजारामुळे जन्मत: व्यंग असलेली बालके जन्माला येतात.
गोवर हा व्हायरसमुळे होणारा आजार असून संसर्गातून होतो.
ज्या मुलांना लस मिळाली नसेल अशा रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ९० टक्के पेक्षा जास्त बालकांना हा आजार संसर्गातून होतो.
गोवर आजाराच्या लक्षणामध्ये ताप, खोकला आणि अंगावर लालसर ठिपके दिसून येतात.
गोवरामुळे प्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे निमोनिया, आंधळेपणा, डायरिया व मेंदूज्वरासारखे आजार उद्धभवतात.
पाच वर्षांच्या आतील बालकांमध्ये या गुंतागुंतीचे प्रमाण खूप जास्त असते.
सदर आजारातून बालक दुरुस्त झाले तरी काही प्रमाणात त्यांच्यात अपंगत्व राहते.
गोवर रुबेलाच्या लसीमुळे यामध्ये बरीच सुधारण झाली आहे.