विषय शिक्षकांना पदोन्नती पण पदस्थापनेसाठी 'वेट अँड वॉच'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 05:19 PM2024-10-23T17:19:47+5:302024-10-23T17:21:03+5:30
आचारसंहितेमुळे अडचण : विद्यार्थ्यांचे होताहेत शैक्षणिक नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शासनासह प्रशासनाकडूनही जिल्हा परिषद शाळांतील शिक्षणाचा खेळखंडोबा चालवल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात गणित-विज्ञान विषय शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने नुकतेच २९ शिक्षकांना पदोन्नती देण्यात आली. पण, आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहितेचे कारण सांगून या शिक्षकांची पदस्थापना रोखण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची ओरड होत आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गणवेशापासूनच, तर शिक्षकांच्या संख्येपर्यंत अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. असा गोंधळ कायम असतानाही गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा तगादा लावल्या जात आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये वर्ग सहावी ते आठवीपर्यंतच्या वर्गाकरिता गणित विज्ञान विषय शिक्षकांच्या जवळपास ७२ जागा बऱ्याच दिवसांपासून रिक्त आहेत. त्यामुळे नुकताच बीएसी उत्तीर्ण झालेल्या २९ सहायक शिक्षकांचे १५ दिवसांपूर्वी समुपदेशन घेऊन पदोन्नती देण्यात आली. अर्धे सत्र उलटले, तरीही विषय शिक्षक नसल्याने आता तरी विद्यार्थ्यांना विषय शिक्षक मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, पदोन्नतीचे आदेशच उशिराने निघाले. त्यातच आचारसंहिताही लागल्याने आता पदस्थापनेचे काम रखडले असून, आचारसंहिता संपेपर्यंत शाळांना विषय शिक्षकांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. तोपर्यंत आणखी विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसानीची झळ सोसावी लागणार असल्याने रोष व्यक्त होत आहे.
अध्ययन-अध्यापनात अडथळा
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गणित-विज्ञान विषयाच्या शिक्षकांची कमतरता आहे. त्यामुळे शाळांतील शिक्षकांकडूनच या विषयाचे धडे दिल्या जात आहे. आता अर्धे सत्र संपत आले तरीही नियुक्ती न मिळाल्याने अध्ययन-अध्या- पनात अडचणी निर्माण होत आहे.
"जिल्ह्यामध्ये एकूण विषय शिक्षकांच्या ७२ जागा रिक्त असून, नुकतेच २९ विषय शिक्षकांना पदोन्नती देण्यात आली आहे, परंतु सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे शिक्षकांना त्यांच्या शाळांतून कार्यमुक्त करणे सोयीचे ठरणारे नाही. त्यामुळे आचारसंहिता संपतेपर्यंत शिक्षकांना कार्यमुक्त करता येणार नाही. "
- डॉ. नीतू गावंडे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक