बोंडअळीच्या अनुदानाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 12:26 AM2018-06-06T00:26:56+5:302018-06-06T00:26:56+5:30
गतवर्षी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे परिसरातील बळीराजा पुरता हादरला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी कोणते पीक घ्यावे या विवंचनेत परिसरातील शेतकरी आहे. त्याला कपाशीला पर्याय मात्र मिळालेला दिसत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनार : गतवर्षी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे परिसरातील बळीराजा पुरता हादरला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी कोणते पीक घ्यावे या विवंचनेत परिसरातील शेतकरी आहे. त्याला कपाशीला पर्याय मात्र मिळालेला दिसत नाही. सोयाबीन हे हमखास उत्पन्न देणारे पीक राहिले नसून गेल्या ४ वर्षांपासून सोयाबीनचीही नापिकी होत आहे. अवघ्या काही दिवसात शेतकरी पेरणीच्या कामाला वेग देणार असून अद्यापही त्यांना बोंडअळीने केल्याने नुकसानीची शासकीय मदत मिळाली नाही. ती त्वरित मिळावी यासाठी जिल्हा पातळीवरील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य पावले उचलण्याची मागणी आहे.
कोरडवाहू शेतकरी एकट्या सोयाबीन पिकावरही अवलंबून राहू शकत नाही. दोन वर्षांपूर्वी दहा हजार रूपये क्विंटल एकढा भाव मिळालेली तूर यंदा नाफेडला देता देता तूर उत्पादकांच्या नाकात दम आला आला आहे. परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या घरी अजूनही तूर पडून आहे. ज्यांनी तूर विकली त्यांना नवीन हंगाम जवळ येऊनही पैसे मिळालेले नाही. या दृष्टचक्रात सापडलेला शेतकरी सध्या हवालदिल झाला आहे. परिसरातील कृषी केंद्रातही सध्या पाहिजे तशी गर्दी शेतकरी बियाणे खरेदी करण्यासाठी करीत नसल्याचे दिसते. परंतु, येत्या काही दिवसात ही परिस्थिती बदलेल अशी चर्चा होत आहे. यंदाही कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कायम राहिल काय व आपले नुकसान होईल काय अशी चर्चा सध्या शेतकऱ्यांमध्ये होत आहे. कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी या भागातील शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी तात्काळ पावले उचलावीत. तसेच नुकसानग्रस्तांना तात्काळ शासकीय मदत मिळावी यासाठी संबंधितांनी प्रयत्न करावे, अशी मागणी आहे.
कृषी केंद्रातही गर्दी नाहीच
पूर्वी मे महिन्याच्या अखेरीस व जून महिन्याच्या सुरूवातीला बियाणे व खत खरेदीसाठी शेतकरी कृषी केंद्रांमध्ये गर्दी करीत होते. परंतु, यंदा कपाशीची लागवड करावी की इतर दुसऱ्या पिकाची लागवड करावी, अशी परिस्थिती शेतकºयांसमोर असल्याने जून महिन्याची चार तारीख लोटूनही कृषी केंद्रात गर्दी होताना दिसत नाही.
दरवर्षी आजपावेतो ५५ ते ३० टक्के बियाणाची विक्री होत असते. परंतु, यावर्षी एकही शेतकरी दुकानाकडे मागणी करण्यास आलेला नाही. त्यामुळे या वर्षी कपाशीची लागवड कमी होईल, असे दिसते. खताच्याही किंमती वाढल्यामुळे शेतकºयामध्ये नाराजी असल्याचे दिसते.
- पंढरी ढगे, कृषी व्यावसायिक पवनार.
गेल्या वर्षी निकृष्ट बियाणे दिल्याची ओरड झाली. उत्पन्नात कमालीची घट झाली. शेतीत लावलेले पैसेही मिळाले नाही. तेव्हा कपाशीची लागवड करावी की नाही या विवंचनेत आहो.
- रामदास चोंदे, शेतकरी, पवनार.
बोंडअळीचा प्रकोप होऊ नये यासाठी शासनस्तरावर जोरदार मोहीम राबविण्यात येत आहे. वेळोवेळी सर्वेक्षण करण्यासाठी कृषी विभागाने तज्ञांच्या वेगळ्या चमु तयार केल्या आहे. त्यावर ते वेळोवेळी लक्ष ठेवतील. शेतकºयांनी लवकर येणाºया जातींची निवड करावी व तणनाशक (ग्लायफोसेट) फवारू नये.
- प्रशांत भोयर, कृषी सहायक, पवनार.