वणा नदी पात्राला स्वच्छतेची प्रतीक्षा
By admin | Published: July 17, 2015 02:10 AM2015-07-17T02:10:15+5:302015-07-17T02:10:15+5:30
भारतीय जनता पार्टीने सत्तेवर येण्यापूर्वी नदी जोड प्रकल्प व नदी स्वच्छता अभियान राबविण्याबाबत वाच्यता केली होती. गंगा सफाई अभियानाच्या रूपाने त्याला सुरूवातही झाली;
वनस्पतीसह गाळाचाही प्रकोप : नदी स्वच्छता अभियान कागदावरच
वर्धा : भारतीय जनता पार्टीने सत्तेवर येण्यापूर्वी नदी जोड प्रकल्प व नदी स्वच्छता अभियान राबविण्याबाबत वाच्यता केली होती. गंगा सफाई अभियानाच्या रूपाने त्याला सुरूवातही झाली; पण या अभियानाची हवाही विदर्भाला शिवली नाही. वर्धा जिल्ह्यातील सर्वच नद्या स्वच्छतेकरिता आसुसलेल्या आहेत. हिंगणघाट तालुक्याची जीवनदायिनी वणा नदी सध्या घाणीच्या विळख्यात अडकली आहे. या नदीचे पात्र कधी स्वच्छ होणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर स्वच्छता अभियान राबविण्याचे आवाहन केले. यावरून वर्धा जिल्ह्यातही अभियान राबविल्याचा फार्स निर्माण करण्यात आला. यामुळेच जिल्ह्यात स्वच्छता अभियान प्रत्यक्षात साकारले नाही. पवनार येथील धाम नदीपासून नदी पात्राच्या स्वच्छतेच्या मोहिमेचाही शुभारंभ करण्यात आला होता. पवनार ग्रा.पं. ने जरी हा उपक्रम राबविला तरी तो प्रशासनाने पूढे नेणे गरजेचे होते. या अभियानाचा प्रारंभ पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत झाला; पण तोही केवळ फार्सच ठरला. धाम नदीची कुठलीही स्वच्छता झाली नाही. ग्रामपंचायतीने विशेष सफाई केली नाही आणि जिल्हा प्रशासनानेही ती मोहीम पूढे नेली नाही. यामुळे वर्धा जिल्ह्यातील अन्य नद्यांना केवळ प्रतीक्षाच करावी लागत असल्याचे दिसते.
जिल्ह्यात वर्धा, बोर, धाम, वणा, यशोदा, बाकळी, भदाडी या नद्या आहेत. या नद्यांचे पात्र सध्या गाळाने बुजलेले आहेत. वर्धा नदीमध्ये अनेक ठिकाणी गाळ साचला असून रेतीच्या उपस्यामुळे खड्डे पडले आहेत. शिवाय अनेक ठिकाणी जलपर्णीत वाढ झाली असून बेशरमही वाढले आहे. बोर, धाम नदीमध्येही अनेक ठिकाणी गाळ साचला आहे. वणा नदीचे पात्रही घाणीने माखले आहे. हिंगणघाट शहरात असलेल्या वणा नदीच्या पात्रात अनेक ठिकाणी जलपर्णींची वाढ झाली आहे. काही ठिकाणी बेशरमची झाडे वाढली असून गाळही साचला आहे. यामुळे नदी पात्राचा जलस्तर अत्यंत कमी होत असल्याचेही दिसून येत आहे.
बाकळी, यशोदा आणि भदाडी नदीही घाणीच्या विळख्यात सापडली आहे. कित्येक वर्षांपासून नद्यांचे पात्रच साफ करण्यात आले नाही. यामुळे प्रत्येक पावसाळ्यात केवळ वर-वर पाणी वाहून जात असल्याचे दिसते. काही नद्यांना तर अनेक ठिकाणी डबक्यांचे स्वरूप आल्याचेच दिसून येते. बहुतांश नद्यांवर ग्रामीण पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहे. नदी पात्रामध्ये गाळ साचला की पाणी पुरवठा योजनेवरही विपरित परिणाम होतो. नागरिकांना पिण्याकरिता तसेच उद्योगांना पाणी पुरविणाऱ्या नद्यांच्या स्वच्छतेकडेच प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. नदीपात्र उथळ होत असल्यानेच पुराचा धोकाही वाढला आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देत नदी स्वच्छता मोहीम हाती घेणे गरजेचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
जिल्ह्यातील प्रकल्प, नद्या, नाले ही संपूर्ण संपत्ती पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत येत असली तरी त्यावर काही करार करण्यात आलेले आहेत. यात वर्धा नदीचे पाणी ज्या-ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडून वापरले जाते, त्यांनी नद्यांची स्वच्छता राखण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे; पण तसे होताना दिसत नाही. जिल्ह्यात कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेकडून नदी स्वच्छता अभियान राबविण्याकरिता पुढाकार घेतला जात नसल्याचेच दिसते. यामुळेच जिल्ह्यातील नद्यांचे पात्र उथळ झाले असून गाळाने बुजले आहे. वणा नदीच्या पात्रात अनेक ठिकाणी गाळ साचला असून घाणीचे साम्राज्य पसरले आहे. नदी पात्रांच्या स्वच्छतेकडे जिल्हा प्रशासनाचेही दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. परिमामी, जलसंकट अधिक गंभीर होत असल्याचे दिसून येते. किमान जलयुक्त शिवार अभियानात नद्यांचा समावेश करणे गरजेचे आहे.