वर्धा नदीला स्वच्छता अभियानाची प्रतीक्षा
By admin | Published: May 25, 2017 01:03 AM2017-05-25T01:03:22+5:302017-05-25T01:03:22+5:30
केंद्र शासन नदी स्वच्छता अभियान राबवित आहे. या अंतर्गत गंगा, यमुना अशा मोठ्या नद्यांची स्वच्छता होत आहे.
वनस्पतींचा विळखा : प्रशासनाचे कायम दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : केंद्र शासन नदी स्वच्छता अभियान राबवित आहे. या अंतर्गत गंगा, यमुना अशा मोठ्या नद्यांची स्वच्छता होत आहे. येथील वर्धा नदीकरिता स्वच्छता अभियान राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. एकेकाळी बारमाही वाहणाऱ्या वर्धा नदीपात्रालगत बेशरम, काटेरी झुडपे वाढले असून कचरा पाण्यात वाढलेले शेवाळ, जलपर्णी, निर्माल्यामुळे नदीचा प्रवाह प्रभावीत होऊन जलस्त्रोत आटत आहे. नदीपात्राच्या स्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते.
शहरालगत वाहणारी वर्धा नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेली आहे. अद्यापही नदीच्या स्वच्छतेची प्रतीक्षा आहे. नदीच्या पंचधारा पौराणिक इतिहासाची साक्ष देणारे असून चारशे वर्षांपूर्वीचे भोसलेकालीन शिवमंदिर आहे. बारामाही वाहणाऱ्या या नदी काठावर हरतालिका, नारळी पौर्णिमा, सोमवती अमावस्या, पुरूषोत्तम मास, कार्तिक मास यानिमित्त अभ्यंग स्नानासाठी महिला व भाविक मोठी गर्दी करतात. नदीवर असलेल्या घाटावर आबालवृद्धही आरोग्याच्या दृष्टीने जलक्रिडा करीत आनंद लुटत होते. मात्र वाढत्या प्रदूषणामुळे नदीच्या पाण्यात स्नान करणे शक्य होत नाही.
पुलगाव शहर, केंद्रीय दारूगोळा भांडारासह परिसरातील ग्रामीण भागाला या नदीतून पाणीपुरवठा केल्या जातो. नदी काठावरील शेत हिरवीगार राहुन शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतमालाचे उत्पादन घेत होता. लाखो शेतकऱ्यांची शेती फुलविणारी, परिसरात हरितक्रांती घडविणाऱ्या या वर्धा माईला आता प्रदूषणाचा विळखा पडला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पुलगावजवळ नदीचे पात्र कोरडे होते. त्यामुळे नदीच्या स्वच्छतेची गरज असून स्त्रोत पुनर्जिवीत करण्याची आवश्यकता आहे.
नदीत मुबलक पाणी वाहते राहत असलेल्या या घाटावर स्नानासाठी व जलक्रिडेसाठी मोठी गर्दी असायची. कालौघात ही गर्दी ओसरल्याचे दिसते. गणपती दुर्गा विसर्जन प्रसंगी पाण्याचा साठा राहत असल्यामुळे विसर्जन करणे सुलभ होत असे. मात्र चार दशकांपूर्वी या नदीवर मोर्शी येथे अप्पर वर्धा व धनोडी येथे लोअर वर्धा धरण बांधण्यात आले. परिणामी बारमाही वाहणाऱ्या नदीचा प्रवाह खंडित झाला. धरणाचे पाणी सोडले तरच नदी वाहती असते. अन्यथा नदीचे पात्र ठणठणीत कोरडे पडते. परिणामी शहरासह परिसरातील ग्रामीण भागाला पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
नदीचे पौराणिक महत्व लक्षात घेता १९२८ मध्ये बिकानेर निवासी स्व. जोहारमल सोमाणी यांची पत्नी व शेठ शिवाजी मुंधडा यांची कन्या सीताबाई यांनी घाट बांधला. म्हणून या घाटाला सिताघाट म्हणतात. तर १९३४ साली स्व. गंगादीन केसरवाणी यांनी दुसरा घाट बांधला. जमनादास मदनमोहता केला यांनी ९ मे १९३५ रोजी मदनमोहन घाटाची येथे निर्मिती केली. या नदीत पाणी नसल्याने शहरावासीयांच्या धार्मिक परंपरा देखील बंद झाल्या. आजही नदी कोरडी पडलेली असून यात वाढलेली बेशरम, शेवाळ व जलपर्णीमुळे नदीचे पाणी दूषित होत आहे. काही वर्षापूर्वी शहरात आलेले पोलीस निरीक्षक पुंडलीक सपकाळ यांनी शहरातील सामाजिक संस्थांच्या सहकार्याने नदी घाट व परिसराची सफाई केली. त्यानंतर प्रशासनाकडून नदी स्वच्छताबाबत कोणतीच मोहीम राबविण्यात आली नाही. नदीपात्र प्रदूषणमुक्त करण्याची मागणी आहे.
मूर्ती विसर्जनाने होते पाणी प्रदूषित
गणेश व दुर्गा विसर्जनाच्यावेळी नदीत प्लास्टर आॅफ पॅरीसच्या मूर्त्यांचे विसर्जन केले जाते. पाणी ओसरले की, भग्नावस्थेत या मूर्त्या काठावर दिसून येतात. नदीत टाकलेले निर्माल्य व अन्य केरकचऱ्यामुळे पाणी प्रदूषित होते. तसेच मूर्त्यांमध्ये वापरलेले रासायनिक रंग व अन्य साहित्यामुळे नदीतील पाण्यावर तवंग दिसतात. ही बाब नागरिकांच्या आरोग्याचे दृष्टीने घातक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. उन्हाळ्यात दिवसात पाण्याच्या शोधात भटकणारे गुरे, श्वापद हे प्रदूषणयुक्त पाणी पित असल्याने प्राण्यांच्या आरोग्याला धोका आहे.
वर्धा नदीवर बांधलेल्या दोन प्रकल्पामुळे नदीचा प्रवाह खंडित झाला. नदीवर बांधण्यात येत असलेल्या पुलगाव बॅरेजच्या बांधकामामुळे काही ठिकाणी पाण्याचा साठा असतो. मात्र प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे नदीच्या या पाण्यात शेवाळ, लव्हाळ, बेशरम, प्लास्टीक आढळतात. या कचऱ्यामुळे नदीपात्र व्यापलेले आहे. एकेकाळी स्वच्छ राहणारे घाट घाणीने बरबटले आहे. काठावर बेशरमचे झाड व काटेरी झुडपे वाढली असून नदीच्या स्वच्छतेची गरज निर्माण होत आहे.