अपक्षांना प्रचारासाठी पाच दिवसांची प्रतीक्षा

By admin | Published: February 3, 2017 01:56 AM2017-02-03T01:56:46+5:302017-02-03T01:56:46+5:30

जिल्हा परिषद व पंचायत समितीकरिता नामांकन अर्ज दाखल होताच रिंगणात असलेल्या विविध पक्षाच्या

Waiting for five days to campaign for independents | अपक्षांना प्रचारासाठी पाच दिवसांची प्रतीक्षा

अपक्षांना प्रचारासाठी पाच दिवसांची प्रतीक्षा

Next

पक्षीय उमेदवारांचा प्रचार सुरू : ७ फेब्रुवारीला होणार अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप
रूपेश खैरी   वर्धा
जिल्हा परिषद व पंचायत समितीकरिता नामांकन अर्ज दाखल होताच रिंगणात असलेल्या विविध पक्षाच्या उमेदवारांनी त्यांच्या प्रचाराचा नारळही फोडला. त्यांची प्रचार कार्यालयेही गजबजू लागली आहेत. तेथे येणाऱ्या जाणाऱ्यांची आवभगत करणेही सुरू झाले आहे. मात्र अपक्ष उमेदवारी दाखल करणाऱ्यांना प्रचाराकरिता आणखी पाच दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. चिन्ह वाटप ७ फेब्रुवारीला होणार आहे. चिन्ह मिळणार नाही तोपर्यंत अपक्षांना प्रचार करणे शक्य होणार आहे.
निवडणुकीची घोषणा झाली त्या काळापासूनच इच्छुकांनी आपण गट किंवा गणाच्या मैदानात उतरणार असल्याचे बिगुल फुंकले होते. त्यांच्याकडून पक्षाची उमेदवारी आपल्यालाच मिळावी याकरिता दावेदारी सिद्ध केली होती. अशांनी उमेदवारी आपलीच म्हणून नामांकनाच्या पूर्वीच प्रचार सुरू केला होता. परिसरात गावसभा घेणे सुरू केले होते. ज्यांना उमेदवारी मिळाली त्यांनी त्या भागात उघडलेले प्रचार कार्यालय आता नियमित केले.
ज्यांना उमेदवारी नाकारली अशातील काहींनी पक्षनिष्ठा धाब्यावर बसवून दुसऱ्या पक्षात जात उमेदवारी मिळवून आपला प्रचार कायम ठेवला. तर काहींनी बंडखोरी करीत अपक्ष दावेदारी दाखल केली. त्यांनी पक्षाच्या नावावर गावात गाठीभेटी घेतल्या असताना अचानक अपक्ष दावेदारी दाखल केली, ती कशामुळे याचा खुलासा करण्याकरिता त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नामांकन दाखल करण्याच्या अंतिम दिवशी एकूण ९९६ जणांनी नामांकन दाखल केले. यात जिल्हा परिषदेच्या ५० जागांकरिता तब्बल ३६६ तर पंचायत समितीकरिता ६३० जणांनी नामांकन दाखल केले. यात अपक्षांचा भरणाही अधिक आहे. एक वर्धा तालुक्यात नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी जिल्हा परिषद व पंचायत समितीकरिता तब्बल ६० अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. यात जिल्हा परिषदेकरिता २५ तर पंचायत समितीकरिता ३५ जणांचा समावेश आहे. यातील काहींची उमेदवारी पक्षाने नाकारलेल्या तिकिटामुळे झालेल्या नाराजीतून तर काहींची केवळ हौशेपाटी असल्याचे दिसून आले आहे. रिंगणात असलेल्या अपक्षांपैकी किती जण कायम राहतात हे नामांकन अर्ज परत घेण्याच्या दिवशीच कळणार आहे.
चिन्ह वाटपानंतर अपक्ष उमेदवारांना प्रचाराकरिता केवळ आठ दिवस मिळणार आहेत. या आठ दिवसात चिन्ह परिसरातील मतदारांपर्यंत पोहोचविण्याकरिता चांगलीच कसरत करावी लागणार आहे. या तुलनेत राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला प्रारंभ केला आहे. त्यांचा छापिल जाहीरनामा तयार झाला असून तो मतदारांपर्यंत पोहोचविण्याकरिता यंत्रणा तयार झाली आहे. राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी वॉर्ड सभा घेण्याचे नियोजन तयार केले आहे. या उलट अपक्ष उमेदवारांची प्रचाराकरिता गोची होत असल्याचे पाहायला मिळते.

Web Title: Waiting for five days to campaign for independents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.