तहसीलच्या नव्या इमारतीला उद्घाटनाची प्रतीक्षा
By admin | Published: July 27, 2016 12:05 AM2016-07-27T00:05:21+5:302016-07-27T00:05:21+5:30
तहसील कार्यालयाची नवीन वास्तू बांधून तयार आहे. याला आठ महिन्यांचा कालावधी झाला तरी इमरतीचे उद्घाटन झाले नाही.
बांधकामावर साडेतीन कोटींचा खर्च : आठ महिन्यांपासून इमारत धूळ खात
हिंगणघाट : तहसील कार्यालयाची नवीन वास्तू बांधून तयार आहे. याला आठ महिन्यांचा कालावधी झाला तरी इमरतीचे उद्घाटन झाले नाही. उद्घाटनाला आणखी किती काळ लागेल याचा नेमका अंदाज येणे सध्या कठीण आहे. उद्घाटनाचा मुहूर्त ‘व्ही व्ही आयपी’च्या तारखेवर ठरणार असल्याची चर्चा गावात आहे.
३ करोड ५१ लाख रुपये खर्च करून महाराष्ट्र शासनाच्यावतीने १ मार्च २०१३ पासून हिंगणघाट तहसील कार्यालयासाठी नव्या इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले. ही इमारत १३ महिन्यात पूर्ण बांधावयाची होती. या बांधकामाकरिता ३ वर्षांचा कालावधी लागला. आता ती इमारत बांधून तयार झाली असून विद्युतीकरण तसेच रंगरंगोटी पूर्ण झाले आहे. इमारत कार्यालयीन उपयोगात आणता येईल असे, बांधकाम विभागाचे म्हणणे आहे.
उद्घाटनाअभावी ही प्रशासकीय इमारत सध्या प्रतीक्षेत असून पुढे याला आणखी किती वेळ लागेल याचा नेमका अंदाज राज्याच्या मुख्यामंत्र्यांच्या उद्घाटनासाठी मिळणाऱ्या तारखेवर अवलंबून असल्याने अनिश्चितेत भर पडत आहेत.
जुन्या इमारतीच्या अपुऱ्या जागेत कार्यालयीन कामकाज कसेबसे उरकविण्यात येत आहे. या इमारतीत असलेल्या अव्यवस्थेने कर्मचारी त्रस्त झाले असून लवकरात लवकर कार्यालय नविन इमारतीत जावून होणारी गैरसोय, सुविधा टाकण्याची अपेक्षा सर्वांद्वारे केल्या जाता आहे.
तहसील कार्यालयाची जुनी इमारत ही ब्रिटीश कालीन असून तिला शंभर वर्षांचा कालावधी होत असल्याचे बोलले जात आहे. ती इमारत लहान व अपुऱ्या जागेत असून अनेक ठिकाणी जिर्ण झाली आहे. तहसील कार्यालयात प्रचंड गर्दी होत असल्याने जागा कमी पडत असून नागरिकांना अडचणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)