गवळाऊ पशुपैदास केंद्राला गतवैभवाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 06:00 AM2020-01-24T06:00:00+5:302020-01-24T06:00:10+5:30
विदर्भातील गवळाऊ गायीची प्रजाती टिकावी व तिचे संवर्धन व्हावे, याकरिता १९४६ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत लाखो रुपये खर्चून कारंजा तालुक्यातील हेटीकुंडी येथे ३२८ हेक्टर परिसरात पशुपैदास केंद्राची निर्मिती केली. कार्यालयाची इमारत, गाय-वासरांचे गोठे,वैरण कोठ्या व कर्मचाऱ्यांची घरे बांधण्यात आली होती. केंद्राच्या ३२८ हेक्टर सुपीक जमिनीपैकी तब्बल १०० हेक्टरवर गुरांच्या वैरणाची पेरणी केली जायची.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : विदर्भाचे वैभव असलेल्या गवळाऊ गायींच्या संगोपण व संवर्धनाकरिता कारंजा (घाडगे) तालुक्यातील हेटीकुंडी येथे शासकीय पशुपैदास केंद्राची निर्मिती करण्यात आली. मात्र याकडे शासनाचे झालेले दुर्लक्ष आणि लोकप्रतिनिधींची उदासिनता यामुळे या प्रकल्पाला अखेरची घरघर लागली आहे. त्यामुळे विदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण गवळाऊ पशुधन नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आता जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार हे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे मंत्री असल्याने त्यांच्याकडून या प्रकल्पाला पुनरुज्जीवन देण्याकरिता प्रयत्न व्हावे, अशी अपेक्षा गोपालकांकडून व्यक्त केली जात आहे.
विदर्भातील गवळाऊ गायीची प्रजाती टिकावी व तिचे संवर्धन व्हावे, याकरिता १९४६ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत लाखो रुपये खर्चून कारंजा तालुक्यातील हेटीकुंडी येथे ३२८ हेक्टर परिसरात पशुपैदास केंद्राची निर्मिती केली. कार्यालयाची इमारत, गाय-वासरांचे गोठे,वैरण कोठ्या व कर्मचाऱ्यांची घरे बांधण्यात आली होती. केंद्राच्या ३२८ हेक्टर सुपीक जमिनीपैकी तब्बल १०० हेक्टरवर गुरांच्या वैरणाची पेरणी केली जायची. या वैरणावर तत्कालीन ४०० हून अधिक गवळाऊ प्रजातीचे वासरे, कालवडी, गाई, दोन वळ व चार बैलजोड्या जगत होत्या. मात्र कालांतराने देशातील एकमेव पशुपैदास केंद्राकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याने सध्या हे पशुपैदास केंद्र भकास झाले आहे. सध्या या केंद्रात २६ दुधाळ गायी, ३३ भागड गायी, १० कालवडी, ४८ मादी वासरे, २५ नर वासरे, ३ वळू व ३ बैल असे एकूण १४८ जनावरेच राहिली आहेत. पुरेसा कर्मचारी वर्गही नसल्याने जनावरांच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. येथील इमारत, गायींचे गोठे व वैरण कोठ्या आता मोडकळीस आल्याने गतकाळचे वैभव हरवत आहे. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे मंत्री या ऐतिहासिक प्रकल्पाकडे लक्ष देतील का? याकडे गोपालकांसह अनेकांचे लक्ष लागले आहे.
केवळ तीन कर्मचाऱ्यांवरच केंद्राची भिस्त
शासनाच्या दुर्लक्षीतपणामुळेच या पशुपैदास केद्रावर अवकळा आली आहे. या केंद्रामध्ये एक अधीक्षक, तीन सहाय्यक पशुधन विकास अधिकारी तसेच सहाय्यक वैरण विकास अधिकारी, वैरण विकास अधिकारी, वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक व शिपाई यांचे प्रत्येकी एक पद आणि मार्फ मजदूर यांचे १९ असे एकूण २८ पदे मंजूर आहे. मात्र त्यापैकी केवळ ३ फार्म मजूरच कार्यरत असल्याने येथील जनावरांचा प्रश्न बिकट झाला आहे.
पतंजलीला देण्याचा प्रयत्न फसला
बहुगुणी गवळाऊ गायीचे संगोपण व वंशविस्तार व्हावा याकरिता इंग्रज राजवटीत हेटीकुंडी येथे गौळाऊ पशुपैदास केंद्राची निर्मिती करण्यात आली होती. राज्य सरकारने या केंद्राची देखभाल करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेऐवजी पशुसंवर्धन विभागाकडे सोपविली. तेव्हापासूनच या केंद्राला अखरेच्या घटका सुरु झाल्या. गेल्या युती सरकारच्या काळात हे केंद्र पतंजली उद्योग समुहाला सोपविण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान पतंजलीचे आचार्य बालकृष्ण हे केंद्राची पाहणी करण्यासाठी १७ डिसेंबर २०१७ रोजी या केंद्रात आले होते. तेव्हा त्यांनी केंद्राच्या शंभर हेक्टर जमिनीवर गवळाऊ व अन्य वाण विकसित करण्याचा विचार केला होता. मात्र तत्कालीन आमदारांनी हे सरकारचे षडयंत्र असल्याचा आरोप करीत हा प्रयत्न हाणून पाडला.
अधिकाऱ्यांच्या असमन्वयाने १८ कोटींचा निधी परत
देशातील एकमेव असलेल्या पशुपैदास केंद्राचे पुनर्जीवन करण्याकरिता तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १८ कोटींच्या निधीला अर्थसंकल्पात मंजुरी दिली होती. तो निधीही उपलब्ध करुन देण्यात आला होता. हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळता करुन खर्च करायचा होता. मात्र पशुसंवर्धन विभागाच्या तत्कालीन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सतिश राजू यांनी हा निधी खर्च करण्यास आम्ही सक्षम असल्याचे सांगून तो निधीच खर्च केला नाही. तत्कालीन पशुसंवर्धन आयुक्त आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी या दोघांच्या दुर्लक्षामुळे हा निधी निहित कालावधीच खर्च झाला नसल्याने तो शासनाला परत करावा लागला. त्यामुळे या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाकुळे या पशुपैदास केंद्राचे मातेरे झाल्याचे बोलले जात आहे.