एका परिपूर्ण उद्यानाची प्रतीक्षा संपली
By Admin | Published: March 20, 2017 12:47 AM2017-03-20T00:47:02+5:302017-03-20T00:47:02+5:30
हरीत वर्धा या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन स्थानिक नगर परिषदेच्यावतीने येथील महावीर उद्यानाचा कायापालट करण्यात आला आहे.
आजी-माजी खासदारांच्या उपस्थितीत नागरिकांसाठी महावीर उद्यान झाले खुले
वर्धा : हरीत वर्धा या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन स्थानिक नगर परिषदेच्यावतीने येथील महावीर उद्यानाचा कायापालट करण्यात आला आहे. शनिवारी पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात आजी-माजी खासदारांच्या उपस्थितीत हे उद्यान लोकांसाठी खुले करण्यात आले.
व्यासपीठावर खा. रामदास तडस, माजी खासदार दत्ता मेघे, नगराध्यक्ष अतुल तराळे, उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर, न. प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय मगर, पालिकेच्या शिक्षण सभापती श्रेया देशमुख, पाणी पुरवठा सभापती सुमित्रा कोपरे, नगर सेविका शुभांगी कोलते, रंजना पट्टेवार, वंदना भुते यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
मार्गदर्शन करताना खा. तडस यांनी केंद्र व राज्य सरकार शहराच्या सौंदर्यीकरणासाठी कटीबद्ध आहे. वर्धा शहराला कोणत्याही परिस्थित निधी कमी पडू देणार नाही. शहरात आणखी अश्याच प्रकारे उद्यानाची निर्मिती करण्यात येईल आणि त्यासाठी आवश्यक ते प्रयत्नही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
महावीर उद्यानाचा विकास म्हणजे वर्धा नगर परिषदेचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. गत २५ वर्षांपासून आम्ही याचा पाठपुरावा करीत होतो. आज या उद्यानाचा नवीन चेहरा वर्धा शहरातील नागरिकांना अर्पण करण्यात येत आहे, असे नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी सांगितले. जनहित मंचाने महावीर उद्यानाच्या विकासासाठी भरपूर परिश्रम घेतल्याबद्दल त्यांनी जनहित मंचाचे आभार व्यक्त केले.
महावीर उद्यानाचाच विकास करुन ते वर्धा नगरीला अर्पण करणे हे आमचे ध्येय होते. ते आज या ठिकाणी आम्ही साध्य केले आहे. असाच विकास शहरातील अनेक उद्यानाचा करायचा आहे. तेही आम्ही करणार असल्याचे यावेळी न. प. उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकुर यांनी सांगितले.
न.प.अंतर्गत हरित वर्धा साकारण्यासाठी नगर परिषदेने टाकलेलं हे एक पाऊल आहे. शहराच्या विकासासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांनी केले. यावेळी माजी खासदार दत्ता मेघे यांनीही मार्गदर्शन केले.
श्यााम टिबडा आणि अतुल टिबडा यांच्या परिश्रमातून साकरलेल्या या उद्यानात अॅम्युजमेंट पार्क, फूड झोन, फन झोन, विशाल इंद्रधनुषीय पाण्याचा कारंजा, मुलांसाठी फ्री प्ले-झोन, पिण्याचे थंड पाणी, शौचालय इत्यादी सोयी सुविधा आहेत. त्याच बरोबर बुल राईड, भूत बंगला, ७ डी अॅडव्हेंचर राईड, जम्पर, एटीव्ही बाईक राईड, मिनी बोटिंग, सेगवे राईड, मिनी फेरीस व्हील, गेम झोन या आणि इतर अनेक मजेदार व करमणूक प्रदान व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वर्धा न.प.च्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन उत्तम हापसे यांनी केले तर आभार लिखिता ठाकरे यांनी मानले. कार्यक्रमाला वर्धा नगर परिषदेचे सर्व नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते. वर्धा शहरातील महावीर उद्यानाचा चेहरामोहरा बदलल्याने वर्धेतील निसर्ग प्रेमींची एका परिपूर्ण उद्यानाची प्रतीक्षा थांबली आहे.(शहर प्रतिनिधी)