रेतीच्या २३ ठिय्यांवरील कार्यवाहीसाठी अहवालाची प्रतीक्षा
By admin | Published: August 28, 2016 12:40 AM2016-08-28T00:40:39+5:302016-08-28T00:40:39+5:30
रेतीची साठवणूक करण्यास शासनाकडून मज्जाव करण्यात आला आहे. असे असले तरी पुलगाव शहरात सभोवताल रेतीची साठवणूक केल्याचे दिसून येते.
तहसीलदारांनी केली जप्ती : बहुतांश रेती अवैध मार्गातूनच
वर्धा : रेतीची साठवणूक करण्यास शासनाकडून मज्जाव करण्यात आला आहे. असे असले तरी पुलगाव शहरात सभोवताल रेतीची साठवणूक केल्याचे दिसून येते. पुलगाव परिसरात सुमारे २३ रेतीचे साठे आढळून आले आहेत. हे साठे तहसीलदार तेजस्वीनी जाधव यांनी काही दिवसांपूर्वी सिल केल्याची माहिती प्राप्त झाली; पण यातील कुणावरही अद्याप कार्यवाही करण्यात आली नाही. अहवालासाठी ही कार्यवाही थांबविण्यात आल्याची असल्याची माहिती देण्यात आली.
रेतीचे साठे तीन प्रकारे केले जातात. यात स्टॉक लायसन्स धारक, रेतीघाट धारक आणि खासगी असे प्रकार आहेत. पुलगाव शहरात सभोवताल शेतांमध्ये, नदीच्या परिसरात तसेच खासगी के्रशरमध्ये रेतीची साठवणूक करण्यात आलेली आहे. ही रेती थोडी थोडकी नव्हे तर एका साठ्यामध्ये सुमारे ५० ते १०० ट्रक रेतीचा साठा आढळून येतो. याबाबत तक्रारी प्राप्त होताच देवळीच्या तहसीलदार व कर्मचाऱ्यांनी पाहणी करीत रेतीचे साठे सिल केलेत. याबाबत बांधकाम विभाग आणि खनिकर्म विभागाला पत्र देण्यात आले आहे. यात रेतीसाठा परवाना धारकांची माहिती मागविण्यात आली आहे. याबाबत बांधकाम विभागाचा अहवाल प्राप्त होताच कार्यवाही करण्यात येणार आहे. शिवाय खासगी रेती साठा धारकांची चौकशी करून कार्यवाही करण्यात येणार आहे. रेती घाट धारकांच्या परवाना, किती ब्रास रेती उपस्याची परवानगी होती आणि साठ्यांसाठी परवानगी घेण्यात आली काय, याबाबत खनिकर्म विभागाकडून अहवाल मागविण्यात आला आहे. दोन्ही विभागांकडून अहवाल प्राप्त होताच कार्यवाही करण्यात येणार आहे. यात स्वत:चा साठा असल्यास दंड, दुसऱ्याने ठेवला असल्यास जप्ती व दंड तसेच लिलाव आदी प्रकार कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार जाधव यांनी दिली.(कार्यालय प्रतिनिधी)