सिंदीविहिरा-तरोडा रस्ता प्रतीक्षेत
By admin | Published: May 15, 2017 12:40 AM2017-05-15T00:40:19+5:302017-05-15T00:40:19+5:30
स्थानिक नगर पंचायतमध्ये समाविष्ट असलेल्या सिंदीविहिरा या २० कुटुुंबाच्या गावापासून तरोडापर्यंत रस्ता निर्माण करावा,
नगर पंचायतचे दुर्लक्ष : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत समाविष्ट करण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : स्थानिक नगर पंचायतमध्ये समाविष्ट असलेल्या सिंदीविहिरा या २० कुटुुंबाच्या गावापासून तरोडापर्यंत रस्ता निर्माण करावा, ही मागणी ६५ वर्षांपासून होत आहे; पण ती अद्याप प्रलंबित आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यास आष्टी येथून तरोडा-सारवाडीपर्यंत जाताना २५ किमी अंतर वाचणार आहे. सदर रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत समाविष्ट करण्याची मागणी ग्रामस्थांनी निवेदनातून शासनाकडे केली आहे.
आष्टी ते सिंदीविहिरा हा २ किमर रस्ताही पूर्ण झाला आहे. या दोन्हीच्या मधोमध असणारा सिंदीविहिरा ते तरोडा हा आठ किमी लांबीचा रस्ता ६५ वर्षांपासून अद्यापही झाला नाही. या रस्त्याला दोन्ही बाजूने घनदाट जंगल आहे. वनविभागाचे कंपारमेंट क्र. ४९/१ पी.एफ.मध्ये सागवान विस्तीर्ण पसरले आहे. मधोमध बाकळी नदी वाहते. या नदीवर बंधारा करून रस्ता झाल्यास वाहतूक सुलभ होऊ शकते.
सिंदीविहिरा ते तरोडापर्यंत ४०० हेक्टर शेती आहे. रस्ता नसल्याने व जंगलातील वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे बऱ्याच प्रमाणात शेती पडिक आहे. शेतकरी एवढी शेती असताना दुसरीकडे मजुरीला जाणे पसंत करताना दिसतात. शासनाने प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून बरीच कामे मार्गी लावली; पण हा रस्ता सुटला आहे. ग्रामीण रस्तेमध्ये समाविष्ट असलेला मार्ग केवळ निधीअभावी खितपत पडला आहे. सध्या आष्टी येथून थार-पार्डी-सारवाडी, आष्टी-थार-चामला सारवाडी, आष्टी-तळेगाव-सारवाडी, असा उलट प्रवास अधिक अंतर पार करावे लागते. तोच प्रवास सुलभ करण्यासाठी सिंदीविहिरा-तरोडा रस्ता झाल्यास २५ किमीचा फेरा होणार नाही. शेती करण्यास शेतकरी पुढाकार घेतील. यासाठी सिंदीविहिरा वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर उईके, शेतकरी अंकुश पोकळे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री, ग्रामविकास मंत्री यांना निवेदन पाठविले आहे. या रस्त्याचे काम त्वरित मंजूर करून मार्गी लावावे आणि शेतकरी तसेच प्रवाशांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
बंधारा बांधल्यास वाहतूक होईल सुकर
वनविभागाच्या कम्पारमेंट क्र. ४९/१ पी.एफ.मध्ये सागवान विस्तीर्ण पसरले आहे. मधोमध बाकळी नदी वाहते. या नदीवर बंधारा करून रस्ता झाल्यास वाहतूक सुलभ होईल.
सिंदीविहिरा ते तरोडा या आठ किमी रस्ता बांधकामासाठी दहा कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मी गेल्या अनेक वर्षांपासून शासनदरबारी मागणी करीत आहे. यावर लवकरच मंजुरीची मोहोर उमटणार आहे.
- दादाराव केचे, माजी आमदार, आर्वी.