शेतकऱ्यांना कापूस विक्रीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 05:00 AM2020-04-17T05:00:00+5:302020-04-17T05:00:13+5:30

लॉकडाऊनमुळे शेतमालाचे मार्केट बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कापूस, गहू, चणा आदी शेतमाल शेतकऱ्यांनी घरातच साठवून ठेवला आहे. घरात जागा नसतानाही तेथेच माल आणि कशीबशी राहण्याची व्यवस्था आहे. अशा स्थितीत साठवून असलेल्या कापसावर अळ्या, किड्यांचा प्रादुर्भाव वाढला असून अंगाला लाल रंगाचे पुरळ, धामे येऊन खाज सुटली आहे. ग्रामीण भागात लहान मुलांना या खाजेच्या रोगाची लागण मोठ्या प्रमाणात होत आहे.

Waiting to sell cotton to farmers | शेतकऱ्यांना कापूस विक्रीची प्रतीक्षा

शेतकऱ्यांना कापूस विक्रीची प्रतीक्षा

Next
ठळक मुद्देसाठविलेल्या कापसामुळे सुटलीय खाज : शासनाने तातडीने खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे कृषी बाजारपेठ बंदचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतातील कापूस घरीच साठवून असल्याने खाजेसारख्या रोगाची लागण होत असल्याने शेतकरी कुटुंबे हैराण झाले आहे. शासनाने तातडीने कापूस खरेदी सुरू करावी, अशी मागणी सर्वत्र होत आहे.
लॉकडाऊनमुळे शेतमालाचे मार्केट बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कापूस, गहू, चणा आदी शेतमाल शेतकऱ्यांनी घरातच साठवून ठेवला आहे. घरात जागा नसतानाही तेथेच माल आणि कशीबशी राहण्याची व्यवस्था आहे. अशा स्थितीत साठवून असलेल्या कापसावर अळ्या, किड्यांचा प्रादुर्भाव वाढला असून अंगाला लाल रंगाचे पुरळ, धामे येऊन खाज सुटली आहे. ग्रामीण भागात लहान मुलांना या खाजेच्या रोगाची लागण मोठ्या प्रमाणात होत आहे.
कापूस साठवून अधिक दिवस ठेवल्यास खाजेसारखा रोग येतो, हा शेतकऱ्यांचा नेहमीचा अनुभव आहे. अध्या अंगावर आलेले लाल पुरळ आणि खाजेमुळे शेतकरी कुटुंबातील सदस्य हैराण झाले आहेत.
कापसाची खरेदी येत्या दोन-तीन दिवसात सुरू न झाल्यास अंगाला खाज सुटण्याचा रोग पाय पसरवू शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण आहे. ग्रामीण भागात लहान मुलांच्या आरोग्याचा विचार करून शासनाने कापूस खरेदी त्वरित सुरू करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
सध्यातरी शेतमाल विक्रीची कसलीही व्यवस्था नसल्याने संपूर्ण माल घरातच साठवून ठेवला आहे. त्यामुळे शेतकरी कुटुंबासह शेतमालही घरातच लाकडाऊन झाल्याची प्रचिती येत आहे. या शेतमालामुळे घरातील जागाही गुंतून पडली आहे.

मजुरांअभावी अखेरचा कापूस झाडालाच
पोहणा : कोरोनाच्या प्रादुभार्वाने शेतमजुरांनी शेतात जाणेच टाळल्याने अनेक शेतकऱ्यांनी मजुराअभावी शेवटचा कापूस वेचलाच नाही. परिसरात मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड केली जात असून मजुरांची कमतरता लक्षात घेता दरवर्षी विदर्भातील वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांसह मराठवाडा व मध्य प्रदेशातील मजूर ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात परिसरातील अनेक गावांत दाखल होतात. सोयाबीन, चणा, गहू पिकांच्या सवंगणीसह कपाशीचा वेचा पूर्ण करून एप्रिल महिन्यात आपापल्या गावी निघून जातात. यावर्षी मात्र कोरोनाने थैमान घालताच लॉकडाऊनच्या भीतीने सर्वच मजूर निघून गेल्याने कपाशीचा शेवटचा वेचा शेतातच राहीला. परिसरात मजुरांची संख्या कमी असल्याने अनेक शेतकºयांना कापूस न वेचताच शेतात जनावरे सोडावी लागली. कापूस खरेदी केंद्र बंद असल्याने अनेक शेतकºयांचा कापूस घरीच साठवून आहे. त्याची विल्हेवाट कशी लावायची, हा यक्षप्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.

जिनिंगमधील खरेदी बंद असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात
तळेगाव (श्या.पं.): कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. यामुळे उद्योगासह शेतमाल विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. हजारो क्विंटल कापूस घरीच पडून आहे. शासनाने कापसाला पाच हजार पाचशे रुपये हमीदर जाहीर केले. महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ आणि सीसीआयने राज्यात काही केंद्रांवर हमी दराने कापूस खरेदी सुरू केली. गेल्या हंगामात पावसाळा लांबल्याने शेतकऱ्यांची उशिरापर्यंत म्हणजे मार्च महिन्यापर्यंत कापूस वेचणी सुरच होती. त्यामुळे शेतकºयांकडे आजही हजारो क्विंटल कापूस पडून आहे. लॉकडाऊनमुळे शेतमाल विकता येत नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. यावर्षी कपासीच्या भावात सतत चढ उतार झाल्याने शेतकºयांची त्या भावात विकण्याची मानसिकता नव्हती. सुरुवातीला खासगी जिनिंगमध्ये कापूस खरेदीच्या मुहूर्ताला ५,२०० ते ५,४०० रुपये प्रतिक्विंटल भाव होता. त्या भावाला उतरती कळा लागत ४७०० ते ४८०० रुपयांवरच भाव आला होता. नविन आर्थिक वर्षात कपाशीचे भाव प्रतिक्विंटल ६ हजारांपर्यंत जाईल, अशी शेतकºयांना आशा होती. त्यामुळे कापूस विकला नाही. त्याचाही परिणाम कापूसविक्रीवर झाला आहे. अडचणीत सापडलेल्या कापूस उत्पादक शेतकºयांना दिलासा देण्यासाठी शासनाने टप्प्याटप्प्याने कापूस खरेदी करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकºयांतून केली जात आहे. तळेगाव परिसरात कोरडवाहू व ओलिताच्या शेतीचे प्रमाण सारखे आहे. त्यामुळेच या भागातील सर्व पिके पावसावर अवलंबून आहेत. म्हणूनच येथील शेतकरी कापूस, सोयाबीनसारखी पिके घेतात; परंतु यावर्षी कोरोनामुळे खरेदी बंद असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. आगामी दीड महिन्यात नवीन हंगाम सुरु होत आहे. शासनाने तातडीने खासगी व शासकीय खरेदी केंद्रे सुरू करून मदत करावी, अशी मागणीही शेतकरी करीत आहेत.

Web Title: Waiting to sell cotton to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती