उंच पुलासाठी तीन वर्षांपासून प्रतीक्षाच
By admin | Published: March 9, 2016 03:06 AM2016-03-09T03:06:42+5:302016-03-09T03:06:42+5:30
तालुक्यातील सेलगाव (लवणे) या गावाला जोडणाऱ्या रस्त्यावरील पूल खचला आहे.
सेलगाव (लवणे) जवळील पुलाचे खस्ताहाल : मंजुरीकरिता प्रस्ताव राज्य शासनाकडे पडून
कारंजा (घा.) : तालुक्यातील सेलगाव (लवणे) या गावाला जोडणाऱ्या रस्त्यावरील पूल खचला आहे. यामुळे पुलावरील रहदारी धोक्याची ठरत आहे. गत तीन वर्षांपासून येथे उंच पुलाची मागणी होत आहे. तत्सम प्रस्तावही बांधकाम विभागाने पाठविला; पण त्यास अद्याप राज्य शासनाची मंजुरी आली नाही. यामुळे ग्रामस्थांना पुलाची प्रतीक्षाच करावी लागत आहे.
जड वाहन गेल्यास सदर पूल जमिनीत रूतण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सदर पूल जमिनीवरच बांधण्यात आल्याने त्याची उंची वाढविणेही गरजेचे आहे. पावसाळयात या पुलावरून पाणी वाहत असल्याने किरकोळ अपघात होतात. गावनदीचे पात्र मोठे असल्याने पाणी वाहत असते. पुलावर शेवाळ साचत असल्याने पूल ओलांडताना त्यावरून घसरून अपघात होतात. कारंजा येथे ये-जा करण्याकरिता सेलगाव (लवणे) व जऊरवाडा येथील नागरिकांना याच रस्त्याने जावे लागते. या मार्गावर बिहाडी, मदनी, खैरी प्रकल्पाकडे जाण्यासही या मार्गाचा वापर होतो. उन्हाळयात वाहतूक सोपी असली तरी पावसाळा, हिवाळ्यात पाण्याच्या प्रवाहात वाहून जाण्याच्या भीतीने वाहतूक ठप्प असते. सदर पुलाची उंची वाढविल्यास हा धोका दूर होऊन नागरिकांचे दळणवळण करणे सोयीचे होईल. सदर पुलाची उंची वाढविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तीन वर्षांपासून सतत शासनाकडे प्रस्ताव पाठविला जात आहे; पण अद्यापही बांधकामाला मंजुरी मिळाली नाही. यामुळे ग्रामस्थांना उंच पुलाची प्रतीक्षाच करावी लागत आहे. शासन, प्रशासनाने उंच पुलाच्या बांधकामास मंजुरी देऊन नागरिकांना रस्ता बहाल करावा, अशी मागणी होत आहे.(शहर प्रतिनिधी)