‘त्या’ महिलेच्या अहवालाची आरोग्य यंत्रणेला प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 05:00 AM2020-04-26T05:00:00+5:302020-04-26T05:00:36+5:30
नागपूरच्या सतरंजीपुरा येथील एक महिला रुग्णवाहिकेत लपून वर्ध्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर महसूल, पोलीस आणि आरोग्य विभागाने संयुक्तपणे मोहीम राबवून त्या महिलेला ताब्यात घेतले. लॉकडाऊनच्या काळात नियमाचा भंग केल्यामुळे महिलेसह तिला आसरा देणाऱ्या तिच्या कुटुंबीयांसह रुग्णवाहिकेच्या चालकासह मालकाविरुद्ध शुक्रवारी वर्धा शहर पोलीस ठाण्यात साथरोग प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नागपूर येथील सतरंजीपुरा भागात कोरोनाने चांगलेच थैमान घातले आहे. परंतु, याच भागातील रहिवासी असलेली एक महिला रुग्णवाहिकेत लपून वर्ध्यात आली. ही बाब वर्धा जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास येताच तिला व रुग्णवाहिकेच्या चालकाला पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले. त्यानंतर दक्षता म्हणून एकूण तिघांना आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांच्या उपस्थितीत इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर नागपूरवरून वर्धेत आलेल्या महिलेचा स्वॅब तपासणीसाठी शुक्रवारी नागपूर येथे पाठविण्यात आला आहे. त्याच्या अहवालाची वर्ध्याच्या आरोग्य यंत्रणेला प्रतीक्षा आहे.
नागपूरच्या सतरंजीपुरा येथील एक महिला रुग्णवाहिकेत लपून वर्ध्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर महसूल, पोलीस आणि आरोग्य विभागाने संयुक्तपणे मोहीम राबवून त्या महिलेला ताब्यात घेतले. लॉकडाऊनच्या काळात नियमाचा भंग केल्यामुळे महिलेसह तिला आसरा देणाऱ्या तिच्या कुटुंबीयांसह रुग्णवाहिकेच्या चालकासह मालकाविरुद्ध शुक्रवारी वर्धा शहर पोलीस ठाण्यात साथरोग प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसला तरी दक्षता म्हणून या महिलेसह तिच्या संपर्कात आलेल्या एकूण तिघांना आरोग्य विभागाच्या वतीने वर्धा शहरातील आयटीआय टेकडी भागातील कोविड सेंटर येथे इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे.
या तिघांवर आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञांसह पोलीस विभाग लक्ष ठेवून आहे. क्वारंटाईन करण्यात आलेल्या या महिलेचा स्वॅब शुक्रवारीच तपासणीसाठी नागपूरच्या प्रयोग शाळेत पाठविण्यात आला आहे. शनिवारी रात्री उशीरा किंवा रविवारी या महिलेचा तपासणी अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त होईल, असे सांगण्यात येत आहे. या महिलेचा अहवाल नेमका काय येतो याबाबत नागरिकांमध्येही उत्सुकता आहे.
रुग्णवाहिकेचा परवाना निलंबनाचा पाठविला प्रस्ताव
शहर पोलिसांनी सदर प्रकरणी गुन्ह्याची नोंद घेतल्यानंतर ज्या रुग्णवाहिकेतून ही महिला वर्ध्यात पोहोचली, त्या रुग्णवाहिकेचा परवाना निलंबित करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनासह उपप्रादेशिक परिवहन विभागाला पाठविला आहे. सदर लेखी प्रस्ताव उपप्रादेशिक परिवहन विभागाला प्राप्त होताच दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. अशा अनेक रुग्णवाहिका असून त्या कोरोनाबाधित जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात येत आहेत. त्याची तपासणी करणाºया यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.